#goldengirl #मराठमोळी सुवर्णकन्या
सुवीचा आज वाढदिवस... खरं तर हा आठवडाच तिच्या आयुष्यात आनंद
फुलवणारा... त्याबद्ल तिला खूप खूप शुभेच्छा.
(सुवर्णा बारटक्के)
भारताला पहिला वहिला कबड्डी विश्वचषक
जिंकवून देण्यात मोलाचा वाटा असलेली मराठमोळी सुवर्णकन्या... आज सुवी क्रीडा आणि
युवक सेवा संचालनालयामध्ये सहाय्यक संचालक
म्हणून सेवा बजावतेय... पण हा तिचा प्रवास सोप्पा नव्हता... सुवी एका दहा बाय दहाच्या
खोलीत आपल्या कुटुंबासह राहायची... पण त्या खोलीतून दिसायचं शिवनेरीचं प्रसिद्ध
क्रीडांगण... कबड्डीपटू होण्याची स्वप्नं तिनं इथंच बघितली... आज तिचं यश दिसतंय..
पण या यशाला किनार आहे संघर्षाची, जिद्दीची आणि मेहनतीची... सुवीची पहिली भेट झाली ती
शिवछत्रपती कबड्डी स्पर्धेत... खरं तर माझी कबड्डीची ओळख झाली तीही सुवीमुळेच...
प्रामाणिकपणे सांगायचं तर त्याआधी कबड्डी कधीतरी पाहिलेली होती... महिला कबड्डी
विश्वचषक संघात निवड झालेल्या महाराष्ट्राच्या तिघीच... पुण्याची दीपिका जोसेफ आणि मुंबईची अभिलाषा
म्हात्रे आणि सुवर्णा बारटक्के... खरं तर दीपिकावर स्टोरी करायची होती, पण दीपिका
पुण्याला राहायची... तेव्हा तिच्यावर स्टोरी करणं शक्य नव्हतं... मग राहिल्या
सुवर्णा आणि अभिलाषा... त्यात सुवर्णाची असाईनमेंट माझ्याकडे... आणि याच
असाईनमेंटनंतर मीसुद्धा कबड्डीकडे वळलो.. तिची कहाणी संघर्षाची होती... शिवछत्रपती
चषक कबड्डी स्पर्धेची फायनल...
समोर होता रेल्वेचा बलाढ्य संघ... ममता पुजारीच्या
नेतृत्वाखाली खेळणारा... पण दडपण होतं ते महाराष्ट्राच्या संघावर... कारण
रेल्वेकडून पराभव स्वीकारण्याची परंपरा कायम होती... पण हा इतिहास बदलण्याचा
निर्धार करून सुवी मैदानात उतरली... डोक्यावर सफेद रंगाचा बँड... केसाचा पोनीटेल
बांधलेला.. तिचा आवेश जबरदस्त होता... टीममध्ये होत्या स्नेहल साळुंखे, दीपिका
जोसेफ, हर्षला मोरे तेव्हाच्या ज्युनियर स्नेहल शिंदे आणि नेहा घाटगे...
(छत्रपती शिवाजी चषकमधला महाराष्ट्राचा संघ - डावीकडून दीपिका जोसेफ, सुवर्णा बारटक्के, उजवीकडून नेहा घाटगे, स्नेहल साळुंखे, खाली बसलेल्या उजवीकडून पहिली हर्षला मोरे, मधोमध बसलेली स्नेहल शिंदे)
संघर्ष
झाला... दोन्ही टीम त्वेषानं खेळल्या... पण ममता पुजारी आणि अभिलाषा म्हात्रेच्या
रेल्वेनं महाराष्ट्राला पुन्हा पराभवाची धूळ चारली.. त्या पराभवाचं शल्य सुवीच्या कायम
मनात होतं.. पराभवानंतर तिचे डोळे डबडबून आले.. पण त्या अश्रूंमध्ये होता अंगार...
खचून न जाण्याचा...
आणि काही काळानंतर हीच सुवी रवाना होत होती पहिल्या वहिल्या महिला
कबड्डी विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी... त्या
निमित्तानं तिची स्टोरी करायची होती... शिवनेरी क्रीडा मंडळाच्या शेजारचीच इमारत
शिवनेरी... देशाचं प्रतिनिधित्व करणारी ही चॅम्पियन राहात होती दहा बाय दहाच्या
खोलीत... सुवीच्या कर्तृत्वाच्या पोचपावती असलेल्या ट्रॉफी ठेवालयाही घरात जागा नव्हती.. पण तिच्या स्वप्नांना ते रोखू
शकत नव्हतं... संघर्षातून, दुखापतींचा सामना करत ती जिद्दीनं खेळत होती... आणि आज
ती देशाचं प्रतिनिधित्व करायला रवाना होत होती...
अपेक्षेप्रमाणे सुवर्णासह दीपिका आणि अभिलाषानं देशाला सोनेरी यश
मिळवून दिलं...
(भारतीय टीमची कर्णधार ममता पुजारी, मराठमोळी सुवर्णकन्या सुवर्णा बारटक्के)
सुवर्णासह सर्वांचंच जल्लोषात स्वागत झालं... तरीही सुवीचा संघर्ष
संपला नव्हता... सरकारनं नोकरीचं आश्वासन दिलं... पण त्यासाठी लागणारी शैक्षणिक
पात्रता पूर्ण करायची होती.. सुवर्णानं हे आव्हान स्वीकारलंही आणि पूर्णही केलं...
सुरुवातीला कॅमे-यासमोर लाजणारी सुवी आज आत्मविश्वासानं कॅमे-यासमोर
बोलते... तिला आता सूचना द्याव्या लागत नाहीत... कारण आधी ती खूप लाजायची.. काय
बोलायचं असं मलाच विचारायची... 'लक्ष्मणरेषा' या झी मराठीच्या सीरियलमध्ये तिने काम
केलं होतं... तरीही कॅमे-यासमोर तिला आत्मविश्वास नव्हता... खूप गोंधळायची.. पण आज
तिची सगळी भिड चेपलीय.. तिची ही प्रगती
सुखावह आहे... कारण पुढच्या काळात तिला कबड्डी कॉमेंटेटरचं ऑप्शन खुलं आहे...
सुवीला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.. तिचं ते
स्वप्नसुद्धा साकार झालं..
(क्षण अभिमानाचा, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार स्विकारताना)
आज ती क्रीडा विभागात एका चांगल्या पोस्टवर काम करतेय, पण तिच्यातली
कबड्डी खेळाडू अजूनही जीवंत आहे.. तिनं खूप मोठं व्हावं... तिच्या पदाचा, तिच्या
अनुभवाचा उद्योन्मुख खेळाडूंना फायदा व्हावा हीच अपेक्षा... सुवी एक उत्तम खेळाडू
आणि खूप छान मैत्रीण आहे... पण त्याहीपेक्षा सुवीमुळेच मला आणखी एक जीवलग मैत्रीण
मिळाली... venus...
(डावीकडून अभिलाषा म्हात्रे, सुवर्णा बारटक्के, मी आणि दीपिका जोसेफ)
या #goldengirl ला खूप सा-या आभाळभर शुभेच्छा...







