Monday, July 29, 2013

साळू...


नुकत्याच न्हालेल्या केसांना घाईगडबडीत ती कशीबशी बांधून घेते...
बसमध्ये खिडकीत बसल्यावर तो उनाड वारा...
वेड्य़ा भ्रमरासारखा तिच्या केसांच्या बटांभोवती लडीवाळपणे पिंगा घालतो...
तो मुधोळ वारा तीच्या बटा विस्कटल्याशिवाय मात्र राहत नाही...
कशीबशी ती त्या बटांना सावरण्याचा प्रयन्त करते...
बसमधून उतरल्यावर हलकेच त्यावरून हात फिरवते...
स्वत:चीच पुन्हा पुन्हा खात्री पटवून घेते...

सेक्शनमध्ये गेल्यावर पुन्हा झटपट केस विंसरण्याचा प्रयत्न करते...
तीचे टपोरे डोळे हलकेच चमकतात, बावरतातही...
तीच्या नकळतंच तीचे पाकळ्यांसारखे ओठ थरथरतात...
त्या लाजवट भावांमध्ये ती दृष्ट लागण्याइतकीच गोड दिसते...
याच मोहक लाजऱ्या रुपाला दृष्ट लागू नये म्हणूनच की काय...
ती कोणासही दिसणार नाही इतक्या सहजतेनं काजळ भरते...

त्या रुपांत कोणालाही हेवा वाटावा इतकी सुंदर दिसते...
नुकत्याच फुललेल्या टपोऱ्या फुलासारखी...
सेक्शनमधल्या बाय़काही तीचा हेवा करतात...
तीच्या लखलख तेजाचा, तीच्या सात्विक सौंदर्याचा...
तीचं सौंदर्य चांदण्याहूनही शितल आणि मोहक वाटतं...
तीच्या निर्मळ अंतर्मनासारखंच...

संध्याकाळी तो वारा पुन्हा तीला छेडण्याचीच वाट बघत असतो..
आता मात्र तो थोडासा खट्याळ आणि अवखळ बनतो..
तीच्या केसांच्या बटांकडे चक्क दुर्लक्ष करुन तीच्या शरीराभोवतीच पिंगा घालत..
तीच्या पदराशीच चाळा करू पाहतो...

Friday, July 26, 2013

भटकंती...

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकण्याची ओढ कधी आणि कशी लागली हे आता नक्की आठवत नाही... वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही असं म्हणतात, पण सह्याद्रीच्या या भटकंतीनं मला मात्र इतिहासाचं वेड लावलं. त्याच वेडात मग इतिहासात पदवी तर मग प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये एम ए केलं.



माझा पहिला ट्रेक होता तो किल्ले शिवनेरी, अष्टविनायकामधल्या लेण्याद्रीच्या  डोंगररांगांमधला, जुन्नर खोऱ्यातला किल्ले ह़डसर, नानाचा अंगठा आणि नाणेघाट... त्या पहिल्या ट्रेकनंतर मग सह्याद्रीनं वेडच लावलं. शनिवार, रविवारी खांद्यावर सॅक घेऊन नेहमीच सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वेड्यासारखं भटकलो.



सुरुवातीला एक मोठ्ठा ग्रुप होता, पण कालांतराने मग एकट्यानंच सुरुवात झाली. आणि ट्रेकिंगमधला माझा भरवशाचा साथीदार झाला होता तो म्हणजे संदीप लाड. भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC, Central Govt. Of India) नोकरी करत असताना शनिवार, रविवारची हमखास सुट्टी असायची. त्या सुट्ट्यांचा आम्ही पुरेपूर फायदा उठवला. शुक्रवारी रात्रीच आमची जोडगोडी खांद्याला सॅक अ़डकवून कुठच्या तरी किल्ल्याच्या मोहिमेवर निघालेली असायची. त्या चार वर्षात किती किल्ले पालथे घातले आता आठवतही नाही. पण एका किल्ल्यानं मात्र नेहमीच वेड लावलं. तो म्हणजे 'राजांचा गड आणि गडांचा राजा' राजगड...

‘किल्ले रायगड’ ही हिंदवी स्वराज्याची अधिकृत राजधानी. पण त्याआधी राजगडनं राजधानीचं काम पाहिलं होतं. किल्ले रायगडपेक्षा राजगड सर करण्यासही कठीण. पण नेहमीच वेगवेगळ्या वाटांनी राजगड सर करायला मज्जा आली. कधी चोर दरवाजानं, कधी गुंजवणे तर कधी पाली दरवाज्यातून... राजगडावर आतापर्यंत आठवेळा भेट दिली, पण प्रत्येक वेळी त्याचं रुप वेगळंच भासतं. गुगल मॅपमध्ये किंवा हेलिकॉप्टरनं पाहायचं तर राजगड म्हणजे एखाद्या सिलिंग फॅनसारखा दिसतो. तीन माच्या आणि अभेद्य असा बालेकिल्ला..

महाराजांनी तोरणा किल्ला घेतल्यावर त्यांचं लक्ष मुरुंबदेवाच्या या डोंगराकडे गेलं, आणि वयाच्या सोळाव्या वर्षी महाराजांनी एखाद्या निष्णात architect सारखी या गडाच्या बांधकामाची रेखाटनं केली. आणि तयार झाला अभेद्य असा किल्ले राजगड...

महाराजांसह जिजाऊसाहेब आणि त्यांचा कबीला तब्बल पंचवीस वर्ष या गडावर नांदला. स्वराज्याच्या सर्वच महत्वाच्या मोहिमा इथूनंच निघाल्या. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सईबाईंसोबत राजांचा संसार फुलला, बहरला तो इथंच.

सईबाई म्हणजे राजांच्या पहिल्या पत्नी आणि सर्वात आवडत्या. सईबाई आणि राजांच्या संसारवेलीवर सखुबाईंच्या रुपानं पहिली कळी उमलली ती राजगडावरच.. संभाजी राजांच्या बाळंतपणाचं निमित्त झालं आणि अगोदरच नाजूक असलेल्या सईबाईंची तब्येत आणखीनंच खालावली.

सईबाई आजारी असतानाच अफझलखान नावाचा दैत्य स्वराज्यावर चालून आला. जीवापाड प्रेम केलेल्या सईबाईंना आजारपणात तसंच सोडून महाराजांना प्रतापगडावर मोहिमेवर कूच करावी लागली. राजांना ज्या विचाराची कल्पनाही करवत नव्हती तो विचार अखेर खरा ठरला, नियतीनं डाव साधला.

सईबाई राजगडावर अखेरच्या घटका मोजत होत्या. शिवाजी सावंतांनी आपल्या कादंबरीत हा अखेरचा क्षण अगदी जिवंत केलाय. सईबाईंचा कोमेजलेला हात राजांनी आपल्या हातात घेतला. अखेरच्या क्षणी सईबाईंनी राजांकडे एकच वचन मागितलं. माझ्या शंभूला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपा. एवढं बोलूनंच सईबाईंनी अखेरचा श्वास घेतला.

सईबाई गेल्यानंतर त्या रात्री राजांनी अन्नपाणी घेतलंच नाही. राजमहालात उभे असताना राजांना अचानक सईबाईंचा भास झाला. राजांनी सईबाईंना प्रेमानं दिलेल्या पैंजणांचा नाद हलकेच ऐकू येऊ लागला. सईबाईंचे ते अखेरचे बोल राजांना आठवले. राजे गहिवरले... राजांनी पुन्हा एकवार आश्वासन दिलं. सई, तू काळजी करु नकोस. शंभूला मी माझ्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेन. एवढं बोलल्यावर पैजणांचा तो नाद हवेत विरला. राजांनी टाहो फोडला, सई तू जाऊन शंभू पोरका झाला नाही, आम्ही पोरके झालो, सई... आम्हीं...

राजगड सोडतानाही सईंबाईंच्या आठवणीनं राजांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या होत्या.
किल्ले रायगडाच्या राजधानीचं बांधकाम पूर्ण झालं. भव्य प्रवेशद्वार, राजवाडा, नगाऱखाना, तटबंदीयुक्त शेला पागोट्यांनी नटलेला रायगड पाहिल्यावर राजेही भारावून गेले. पण राजवाड्याच्या पाठीमागं असलेला राणीमहाल न्याहाळताना राजांच्या डोळ्यांत पुन्हा पाणी दाटलं. कारण तिथं फक्त सातच राणीमहाल होते. राजांच्या मनातला सईबाईंचा राणीमहाल तिथं नव्हता.. कदाचित सईबाई असत्या तर शिवाजी महाराजांच्या इतिहासाला वेगळं वळण लागतं... पण सईबाई गेल्या आणि राजे खऱ्या अर्थानं पोरके झाले. म्हणूनच रायगडापेक्षा माझंही मन रमंत ते राजगडावरच. राजगडावर सईबाईंच्या समाधीपुढं डोकं ठेवल्याशिवाय माझं पाऊलही हलत नाही.

राजगडावर सईबाईंची ही आठवण नेहमीच माझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या करते. पण राजगडाचं रौद्र रुपही कधीकधी आपल्या डोळ्यांतून पाणी आणायला कमी करत नाही. असच एकदा आषाढात मी आणि संदीपनं राजगडची वाट धरली होती. कांदेपोह्यासारखा नाश्ता करुन गुंजवणेमार्गे चोरदरवाजानं राजगड सर करायचा असा बेत ठरला. पुणे वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरून तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते.ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात.माहितगारा शिवाय या वाटेचा उपयोग करू नये अशी नोंद अनेक ठिकाणी आढळते. पण आव्हान पेलणं ही आमची जूनी खोड. यावेळेस मात्र निसर्गानं आम्हांला त्याच्या ताकदीची कल्पना दाखवून दिली.

ऐन आषाढात गुंजवणेचा परिसर मात्र वैशाख वणव्यासारखा भासत होता. पावसाचा मागमुस नव्हता. त्यातच वाटेत खाल्लेले कांदेपोहे आता भारी पडू लागलेले. घटाघटा पाणी पिऊन सुद्धा तहान भागत नव्हती. जवळची इलेक्ट्रोलची तीन पाकिटंसुद्धा घशाखाली रिचवली. पण घसा पुन्हा पुन्हा कोरडा पडत होता. वाट अवघड आणि त्यात ही नामुष्की. संदीपनं ऐन मध्यावरती हार मानली. बस्स झालं असं म्हणत एका जागी त्यानं अंग टाकलं. पण इतक्यात हार मानणं हे कबुल नव्हतं.

चादरी अंथरल्या. संदीपला तासभर विश्रांती कर म्हणालो. माझ्या डोक्य़ात मात्र पुढे काय करायचं याचाच विचार सुरु होता. तासभर विश्रांती केल्यानं संदीपही ताजातवाना झाला. मग पुन्हा पुढचं मार्गक्रमण सुरु झालं. माझ्या सॅकबरोबरच संदीपची सॅकही माझ्याच खांद्यावर अडकवली होती. झपाझप पावलं टाकत चोरदरवाजा गाठला... गोब्राम्हण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक प्रौढ प्रताप पुरंदर शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय!!!! जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेवचा घोष घुमला आणि अंगात नवचैतन्य संचारलं. समोरच काठोकाठ भरलेला पद्मावती तलाव होता. एखाद्या जंगली श्वापदासारखं अगं झोकून घटाघटा पाणी प्यायलो..



पण संदीप मात्र खरोखरच थकला होता. पद्मावती मंदिरात दर्शन घेतलं. खरंतर राजगडावर राहायचा बेत होता, पण संदीपची अवस्था केविलवाणी झाली होती. सॅकमधला खाऊ बाहेर काढला आणि त्याच्यावर ताव मारला. थोडा वेळ पुन्हा विश्रांती घेतली. आणि पाली दरवाजाच्या दिशेनं कूच केली. संध्याकाळचे चार वाजलेले, त्यामुळं झपाझप पावलं टाकणं क्रमप्राप्त होतं. वेल्ह्याहून पुण्याला जाणारी संध्याकाळी सा़डेपाचची शेवटची एस टी होती.

पण आज राजगडानं आमची परिक्षा घ्यायचीच असं बहुदा ठरवलं होतं. मघाशी पावसाचा मागमुसही नसलेला राजगडचा परिरस काळ्याकुट्ट ढगांनी वेढला गेला. आणि अपेक्षेप्रमाणे त्यानं धो धो बरसायला सुरुवात केली. त्यामुळे आधीच कठिण उतरण असलेला पाली दरवाजाचा रस्ता आणखीनंच कठीण होऊ लागला. पाण्याचे लोट अनेक ठिकाणी मार्गात अडथळा आणत होते, आणि होऊ नये तेच झालं. संदीपला बुट लागला आणि रक्ताचा प्रवाह वाहु लागला. पुढे मार्गक्रमण करणं अतंत्य कठीणंच होतं.

कसंबसं करत वेल्हे गावी पोहोचलो. संध्याकाळचे पावणे सात वाजले होते. अंधार दाटून आला होता. पुण्याला जायची शेवटची एस टी तर कधीच निघून गेली होती. गुरं ढोरं आपापल्या घरी परतत होती. एक टाटा सुमो दिसली आणि हायसं वाटलं. पण कसलं काय, पुण्याला जायचं तर म्हणे हजार रुपये काढा. संदीप तयार झाला, पण मी मात्र ठाम विरोध केला. संदिपला म्हटलं एखाद वेळी एखाद्या गरजू माणसाला हजार रुपये देऊ, पण अडचणीत असताना लुटणाऱ्यांना काहीच देणार नाही. जवळंच एक मंदिर दिसत होतं. निश्चय पक्का केला, त्या  मंदिरात रात्र काढण्याचा. आणि देवच पावला. रस्त्यांवर अनेक गावकरी दुधाची भांडी घेऊन जमा होताना दिसत होते. म्हटलं प्रकार तरी काय आहे बघु तरी.

तर असं होतं की या परिसरातल्या गावांतून दुध गोळा करणारी एक गाडी यायची सारेजण वाट बघत होते. त्यांच्याकडे चौकशी केली, तर लॉटरीच लागली. ती गाडी हे दुध घेऊन पुणे रेल्वे स्थानकाला जाते असं कळलं. त्या अंधारात ट्रकच्या मोठ्या हेडलाईट्सनी आशेचा किरण दाखवला.

क्लिनरकडे चौकशी केली. तो म्हटला सोडतो की साहेब... किती घेणार? माझा प्रश्न.. दहा रुपये द्या की प्रत्येकाचे... संदीप तर चक्क उडालाच... मघाशी हजार रुपये घेणारा तो आणि आता फक्त दहा रुपये घेणारा हा.. पुढच्या तीन तासांत आम्ही एशियाड पकडण्यासाठी पुणे रेल्वे स्टँडवर पोहोचलो होतो. क्लिनरच्या हाती शंभरची नोट टेकवली आणि एसटी महामंडळाच्या एशियाडमध्ये थकलं भागलेलं शरीर हवाली केलं.

Tuesday, July 23, 2013

मिस यू डिअर...


झंप्या आज जड पावलं टाकतंच ऑफिसमध्ये दाखल झाला. आल्यापासूनच त्याची नजर एकसारखी भिरभिरत होती. पण त्या नजरेला ती मात्र कुठेच दिसली नाही. तीची बॅगसुद्धा नेहमीच्या जागेवर नव्हती. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यापेक्षा तिच्या बॅगचीच जास्त सवय झाली होती. बॅग जागेवर आहे, म्हणजे ती नक्कीच कुठेतरी आसपास असणार याची पक्की खात्री असायची. पण ती कुठेच दिसली नाही, आणि आधीच खराब असलेला मुड आणखीनंच खराब झाला. तिच्याविना ऑफिसही भकास वाटू लागलेलं.

झंप्या तडक ऑफिसच्या खाली उतरला. कोपऱ्यावरच्या पान टपरीकडे पावलं आपोआपच वळली. टपरीवाल्यानंही त्याचा नेहमीचा ब्रँड पुढे केला. तो मात्र अजूनही तिच्याच तंद्रीत होता. तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून हटायला काही तयार नव्हता. अस्वस्थ झालेल्या झंप्यानं सिगारेटचे पटापट दोन-तीन कश मारले. गेल्या चार वर्षातला नेहमीचाच त्याचा ब्रँड, पण तोच आज ‘नेव्ही कट’सारखा एकदम कडवट लागत होता. ऑफिसमधल्याच एका मैत्रीणीनं झंप्याला आवाज दिला. तिला मंदसं स्मित देत त्यानं सावकाशपणे आपलं दम मारणं सुरुच ठेवलं. धुमारे उठत होते आणि आठवणींची पाखरंही

तसं पाहिलं तर ती त्याची कुणीच नव्हती. ना जीवलग मैत्रीण, ना प्रेयसी, ना बायको. दोघांमध्ये नातं म्हणायला असं काहीच नव्हतं. अगदी दोन वर्षांपूर्वी तो या ऑफिसमध्ये रुजु झाला. त्यावेळी पहिल्या महिन्यात कधी तरी ती याच्याशी स्वत:हून बोलली होती. त्याच्या जुन्या ऑफिसबद्दल तीनं बरंच काही ऐकलं होतं. त्याचसंदर्भात चौकशी करुन ती पुढे चालती झाली. हाच काय तो गेल्या दोन वर्षांमधला तिच्याबरोबरचा एकमेव संवाद. पण त्याचवेळेला तिचा मनमोकळा स्वभाव त्याच्या मनात कुठंतरी घर करून गेलेला. त्यानंतर गेली दोन वर्ष तो तीला पाहात होता. पण आकर्षण वाटावं किंवा बोलावं असं काहीच झालं नव्हतं.

मुलींशी स्वत:हून बोलणं त्याला कधीच जमलं नाही आणि मुळात आवडतही नव्हतं. त्याच्या मैत्रिणी अगदी जीवलग, एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच. समोरच्या मुलीचा स्वभाव पटत नाही तोपर्यंत व्यावहारिक कामं वगळता बोलणं असं नाहीच.

पण गेल्या दोन-तीन महिन्यांत बरेच बदल झालेले. दोघांची गट्टी बऱ्यापैंकी जमलेली. ऑफिसमध्ये बोलणं मात्र कमीच. जो काही संवाद होत होता, तो what’s app वर. कुठंतरी दोन महिन्यांपूर्वी तिचा मोबाईल नंबर मिळालेला. पहिल्याच मेसेजमध्ये ‘काय साहेब! बसं काय, तुम्हांला ओळखणार नाही का?’ अशी गोड सुरुवात झालेली. ऑफिसमध्ये ते दोघं एकमेकांशी बोलतात की नाही असंच वाटायचं. पण what’s app वर मात्र तो तिच्याशी अगदी मनमोकळेपणानं बोलायचा.

गेल्या दोन महिन्यांत what’s app सारख्या क्रॉस प्लॅटफॉर्मनं दोघांमध्ये मैत्रीचा नवा पुल बांधला होता. दररोज न चुकता सकाळी उठल्यावर good morning आणि रात्री झोपण्यापूर्वी good night करणं हा त्याचा ठरलेला नित्यक्रम. खरं तर त्यामध्ये त्याचाच स्वार्थ अधिक. तिला शुभेच्छा देऊन तिचा दिवस चांगला जातो की नाही हे माहित नव्हतं, पण झंप्याचा दिवस मात्र आनंदात जात होता. शेवटी एकदा मनानं ठरवलं की दिवसंच काय हो, पण आयुष्यही आनंदात जातं.

त्याच्या आनंदाला कारणही तसंच होतं. तशी ती इतर सर्वसामान्य मुलींसारखीच... दिसायला मात्र खरंच सुंदर... हेवा वाटावा असं सौंदर्य. पण त्यापेक्षाही तिचा मनमोकळा स्वभाव, तिचं खळखळून हसणं, चैतन्यानं भरलेला आवाज, तिचे टपोरे डोळे यांनी झंप्यावर जादू केलेली होती.

झंप्याचं आयुष्य तसं काडवंडलेलंच. तारुण्यात प्रवेश केल्यापासून संघर्ष त्याचा जीवलग मित्र तर नशिब त्याचा जानी दुश्मन होता. लग्न होऊन चार वर्ष झालेली. पण घरात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कटकट ही नित्याचीच. सत्तरी ओलांडलेले त्याचे आई-वडिल आजही एकमेकांची उणीधुणी आणि कधीकधी तर आईबाप काढायला आजही चुकत नव्हते. बायकोची नोकरी गेलेली. संसारात संघर्ष करताना स्वत:च्य़ा पायावर पुन्हा उभं राहण्याची तीची धडपड चाललेली. ती निर्धारानं स्वत:च्या पायावर उभी राहावी यासाठी झंप्याचाही तिला खंबीर आधार होता. त्यानं आयुष्यात आतापर्यंत अनेकांना आधार दिला होता, अनेकांची दु:ख त्याच्या खांद्यावर अश्रुंच्या रुपात मोकळी झाली होती. पण नियतीनं मात्र त्याला कधीच आधार दिला नव्हता. ‘मेघ जांभळा  एकला, राहे नभाच्या कडेला’ या गाण्याप्रमाणे नेहमीच तो एकाकी आणि कडेला राहिला होता.

पण हल्ली तिच्या हास्यानं त्याच्या निराशेचं मळभ दूर होत होतं. तिच्या टपोऱ्या डोळ्यांत त्याला नवचैतन्य मिळायचं. ऑफिसमध्ये तिला एकटक पाहात राहाणं, तिची वाट बघणं याची आता सवय झालेली. तरी एकदा तीनं मस्करीत त्याला म्हटलेलंही ‘लाईन मारु नकोस!’….

तिच्यावर लाईन मारणं खरंच शक्य झालं असतं. कदाचीत लाईन मारली असती तर बरंच झालं असतं. एवढा जीव गुंतला नसता. लाईन त्यानं आयुष्यात एकदाच हैदराबादमध्ये कामाला असताना मारण्याचा प्रयत्न केलेला. ती मुलगी हिच्यापेक्षाही दिसायला सुंदर आणि गोडसुद्धा. मुख्य म्हणजे ती त्याची गाववाली होती. पण तीनं आपल्या आयुष्याचा साथीदार आधीच निवडला होता. झंप्याचं लग्न झालं, तीचंही लग्न झालं... पण दोघांची मैत्री अजून कायम आहे. ती सर्वात आवडती मैत्रीण आहे हे झंप्याच्या बायकोलाही माहित. 

पण हीच्या बाबतीत तसं काहीच नव्हतं. हीच्या नुसत्या सहवासानंच झंप्या आनंदी होत होता. ऑफिसमधला, घरामधला तणाव आणि चिंता विसरुन जात होता. त्यामुळे what’s app म्हणजे झंप्याचा जीव की प्राणच झाला होता. हल्ली तो सकाळी लवकरही उठायला लागला होता, आणि उठल्या उठल्या झंप्या पहिलं what’s app चेक करायचा. तिला कॉफी आवडते, म्हणून कॉफीनं गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देणारे अनेक फोटो त्यानं डाऊनलोड करून ठेवले होते. तीसुद्धा बऱ्याचदा त्याला reply करायची. पण कधी reply आला नाही तर मात्र तो उदास व्हायचा.

झंप्याच्या वाढदिवसाची गोष्ट. सकाळी सकाळीच त्यानं तीला गुड मॉर्निंग करणारा मेसेज पाठवला. पण ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत तीचा काहीच reply आला नव्हता. त्यानं बरीच वाट बघितली, मग चडफढतंच त्यानं ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं. दुसऱ्याच सेकंदाला तीचा मेसेज आला, Welcome In the Office…

झंप्याचा चेहरा आनंदानं एकदम उजाळला. त्यानं नजर टाकली, पण ती कुठंच दिसली नाही. ना तीची बॅग दिसली. पुन्हा तीचाच मेसेज. ‘आज काय तुझ्या टीममध्ये तू एकटाच?’ मग मात्र तो उडालाच. ती ऑफिसमध्ये असल्याची मनोमन खात्री पटली. मग जिथं ती नेहमी बसते तिथं तो जाऊन आला. ती दिसल्यावर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. सगळ्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यावर तीनंही त्याला शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर तीनंही स्वत:हून त्याला केक भरवला. दुसऱ्या एका मैत्रीणीनं दिलेलं चॉकलेट त्यानं सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. मग आसपास कोणी नसताना चॉकलेट देणारीला आणि तीला त्यानं गुपचुप ते चॉकलेट दिलं होतं.

दिवस भराभर पालटत होते. असंच दोन दिवसांच्या सुट्टीनंतर ती जेव्हा ऑफिसमध्ये रुजु झाली तेव्हा झंप्यानं तीला welcome in the office असा मेसेज पाठवला. पण दिवस सरला तरीही तीचा काहीच reply आला नाही. भर पावसात एकदा ती घरी निघाली होती, तेव्हा पण काळजीच्या पोटी त्यानं तीला सांभाळून जा असा मेसेज पाठवला. पण ती घरी पोहोचली की नाही याचा काहीच पत्ता लागला नाही. तीच्या replyची तो नेहमीच वाट पाहायचा. आणि reply आला नाही की, झंप्या मनातून खूप निराश व्हायचा... पण ती समोर आली की तीच्या गोड हसण्यानंसुद्धा त्याची निराशा दूर व्हायची.

कालही त्यानं न चुकता तीला गुड मॉर्निंग केलं. तीनंही दोन मिनिटांच्या आतच त्याला पुन्हा गुड मॉर्निंग म्हणून टाकलं. काही वेळानं त्यानं कधी नव्हे तो कामाविषयीचा एक मेसेज पाठवला. बराच वेळ वाट बघितली. पण तीचा reply काही आलाच नाही. दुपार टळली. ती ऑफिसमध्ये आज येणार नाही असा अंदाज बांधला, पण तो चुकला. अचानक ती ऑफिसमध्ये आली, तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखाच होता. आज ती भलतीच खुष दिसत होती आणि झंप्यासुद्धा तीला अचानक बघून खुष झाला होता..

पण नाकावरच्या रागानं त्या आनंदावर मात केली. कारण तीने reply दिला नसल्यानं त्याचा डोक्याला शॉट लागला होता. मग तीला टाळत राहिला. आज तीच्याशी बोलायचंच नाही असा चंगच त्यानं बांधला. संध्याकाळी तीनं स्वत:हून सकाळच्या झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. ती काहीतरी कारणही सांगत होती, पण झंप्या मात्र काहीच ऐकायच्या मुडमध्ये नव्हता. तू कामातून मोकळा झालास की सविस्तर बोलूया असंही ती त्याला म्हणाली. पण झंप्याच्या नाकाचा शेंडा अजूनही लालंच होता. तो तीच्याशी बोलला पण तुटकपणे. तिलाही ते कळुन चुकलं. नंतर मग तीनं जेवायला येतोस का? असं विचारलं. मनातून तर तो खुष झाला, पण पुन्हा नाकावरचा राग आडवा आला. मागं हटायला त्याचा राग काही तयारच नव्हता. घरी जातानाही त्यानं ती समोर असूनही जाणूनबुजून गुडबाय केलं नाही. रात्री गुड नाईट म्हटलं नाही की सकाळी गुड मॉर्निंग केलं नाही. आता what’s app वर बोलायचंच नाही असा दृढनिश्चय केलेला. मनात मात्र तीचा मेसेज यावा अशीच इच्छा.

आणि दुसऱ्या दिवशी तो आलाही. पण तो वाचल्यावर तो आलाच नसता तर बरं झालं असतं असंच वाटून गेलं. ती सुट्टीवर घोवाबरोबर बाहेर निघाली होती.  लगेचच दुसरा मेसेज आला आत्ताच निघतोय, पुन्हा भेटू दोन आठवड्यानंतर... तो वाचला आणि झंप्याच्या पायाखालची जमीनंच सरकली.

मग मात्र झंप्या स्वत:वरच रागावला. कालचं सगळं आठवलं. तीनं एकदा म्हटलंही होतं, अरे मी खुपच बिझी होते रे!, त्यामुळं तुला reply करायला वेळंच मिळाला नाही. झंप्याची ट्युब आता कुठं पेटली होती. रागाची जागा आता पश्चात्तापानं घेतली होती. स्वत:चाच त्याला भलताच राग आला. कालचा मुर्खपणा अस्वस्थ करु लागला. पण आता वेळ निघून गेली होती. रात्री मग तीची माफी मागण्यासाठी एक भलामोठा मेसेज टाकला.

त्याच्या प्रत्युत्तराची मात्र त्यानं आता वाट बघितलीच नाही. कारण मैत्रीत अपेक्षा करणं हे चुकीचं होतं हे एव्हाना त्याला समजुन चुकलं होतं. आता स्वत:च्याच डोक्याला शॉट लागला होता. पुढचे दोन आठवडे ती दिसणार नव्हती. तीचं खळखळतं हास्य, तीचा आनंदी चेहरा दिसणार नव्हता. अस्वस्थता कमी करण्यासाठी त्याची पावलं आपसूकच टपरीकडे वळली. दम मारायचं ठरलं. पण आज त्याचं प्रायश्चित्त कमी कऱण्यासाठी सिगारेटही पुरेशी नव्हती. चूक झाली होती, मनाशी ठरलं... यापुढे दम मारायचा नाही. तीचा चेहरा आठवायचा...

आता आठवडा झालाय, सिगारेट सोडून... राग आला की तीचा चेहरा आठवतो. आणि मग तो राग तिथल्या तीथं निवळतो. अजूनही ऑफिसमध्ये आला की त्याची नजर तीची बॅग शोधते. पण अजून ती कामावर रुजु व्हायला अवकाश आहे. तोपर्यंत वाट बघण्याशिवाय त्याच्या हातात काहीच नाही. 

Sunday, July 21, 2013

किल्ले पेबची विकटवाट

पावसाच्या आगमनानं साऱ्या सृष्टीत चैतन्य बहरतं. बाहेरचं आल्हाददायक वातावरण सुखावणारं असतं. अशा वेळेला भटकंती करण्याची मौज काही औरच. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या, डोंगररांगा पायाखाली घालणाऱ्या भटक्या मंडळींचा म्हणजेच ट्रेकर्सचा तर हा सुगीचा काळ. पावसाळ्यात ट्रेक करण्याचा मोह पक्क्या ट्रेकर्सना तरी कधीच आवरता येत नाही. माझंही तसंच झालं. कित्येक दिवसांपासून ट्रेक खुणावत होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रगाड्यातून सुट्टी मिळाली ती सोमवारी. आता सोमवारी ट्रेक करायचा तर सवंगडी मिळण्याची शक्यताच कमी. ट्रेकिंगमधला त्यातही माझा भरवशाचा साथीदार म्हणजे संदीप लाड.. गेली सात आठ वर्ष आम्ही सह्याद्रीच्या रांगांमधली गुंजवणं, मावळ, कानंदखोरी पालथी घातली. अनेक डोंगरवाटा तुडवल्या. भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) कार्यरत असताना शनिवार, रविवारी सुट्टी असल्याचा पुरेपूर फायदा उठवला. पण काळ बदलला. माझं क्षेत्र बदललं. मग कालांतरानं ट्रेकिंगही कमीच झालं.

त्यामुळं मग सोमवारी जायचं तर ठरलं, मग काय आमच्याच क्षेत्राचा कोणतातरी सवंगडी हवा. अखेरीच माझाचा दिपक पळसुले हा दुर्गवेडा एका पायावर तयार झाला. बेत ठरला. कुच करायची ती मुंबईजवळच्याच पेबवर... पेब हा तसा इतिहासासाठी प्रसिद्ध किल्ला नव्हे. धान्याचं कोठार म्हणून त्याचा वापर केल्याचा उल्लेख आढळतो. पण हा किल्ला म्हणजे भल्या भल्या ट्रेकर्सनाही आपली वाट चुकवायला लावणारा.. म्हणूनच त्याचं दुसरं नाव म्हणजे विकटगड.. ठरलं मग हाच किल्ला सर करायचा.

नेरळ स्टेशनहून रिक्षा करून कातकरवाडीत पोहोचलो. नवीन साथीदार त्यामुळे पहिला नियम मोडला. एरव्ही पायवाट तुडवत ट्रेकिंग करण्याचा माझा शिरस्ता. अनेक नियम मीच तयार केले आणि संदीप आणि मी नेहमीच ते काटेकोरपणे पाळले. कातकरवाडीतून पेबच्या दिशेनं वाटचाल सुरु झाली. पाऊस धो धो बरसायला लागला होता. समोरचा पेबचा किल्ला कधीच धुक्याच्या चादरीत लपून गेला.. त्याखालचा नयनरम्य धबधबा मात्र सारखं लक्ष आकर्षित करत होता. याच नादात पहिलीच वाट चुकली. दिपकनं धबधब्याच्या दिशेनं कुच केलं. ओढ्याच्या मार्गानं जाऊ असा त्याचा कयास. इथं मी माझा दुसरा नियम मोडला. ट्रेकिंगचा महत्वाचा नियमच हा की पायवाट कधीच सोडू नका. त्यात धबधबा किंवा ओढ्याची वाट तर कधीच धरू नये. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्यानं कुठं काही विपरीत घडेल याची शाश्वती नसते. पण वाट तर धरली होती.

 ओढ्यातून मार्गक्रमण करताना मात्र मज्जा आली. प्रवाहातून वाट काढत काढत, त्यातच फोटोग्राफी करत मनसोक्त आनंद लुटत होतो. 



पण नंतर मात्र नियम मोडल्याचा प्रत्यय आलाच. अशा ठिकाणी येऊन पोहोचलो. समोर धबधबा आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी कातळकडा. मनाशी निर्धार केला, उजव्या दिशेचा कातळकडा सर करुन पठारावर पोहोचायचं. लक्ष्य कठीण होतं. पावसामुळे दगडांवर शेवाळ उगवलेलं. माती आणि दगड सैल झालेले. त्यात पाठीवर सॅकचं ओझं. मनाशी खुणगाठ बांधली आणि पालीसारखे कातळकड्याला चिकटलो. हळुहळु चढाई पुढं पुढं सरकली. मध्यापर्यंत कडा सर केला. पण एका ठिकाणी मात्र मीच अडकलो. धड पुढं जाता येईना, ना मागं वळता येईना. दिपक मात्र माझ्या बाजूनं पुढं सरकला. मी मात्र चक्क दहा मिनिटं पालीसारखाच चिकटून होतो. अखेरीस कसंबसं दोन पावलं खाली उतरलो.
मोठ्या मुश्किलीनं दोघंही पठारावर पोहोचलो. पण तोपर्यंत खुपच दमछाक झाली. मग मात्र पुन्हा पायवाटेनं जायचं ठरलं.

पायवाट तुडवत आमची दरमजल सुरु होती. वा़टेत एक स्थानिक जोडपं भेटलं. त्यानीही आम्ही योग्य वाटेवर असल्याची ग्वाही दिली. मग पुन्हा पुढे सरकलो. पण पुन्हा एकदा वाटांची सरमिसळ झाली. चार वाटांमधली नेमकी पेबकडे जाणारी वाट कोणती हेच कळेना. पेबचा किल्ला तर धुक्यामुळे दिसतच नव्हता. पण त्यातलीच एक वाट निवडली. पण ही वाट चुकल्याचं अर्धा तासांची पायपीट केल्यावर समजलं. एव्हाना दम निघाला होता. त्यात खायलाही काही घेतलेलं नव्हतं. माझ्याकडचा न्यूट्रिशन शेक होता. तो मग मी आणि दिपकनं शेअर केला. दिपकचं म्हणणं होतं याच वाटेनं पुढं सरकुया. पण मी मात्र त्याला ठाम नकार दिला. दुपारचे तीन वाजून गेलेले. पुन्हा परतायचे वांदे व्हायचे. 

आल्या वाटेनं पुन्हा माघारी परतलो. मनाशी निर्धार करुन की ज्या वाटेनं चकवलं ती वाट पुन्हा शोधून पेब सर करायचाच... आठ वर्षांच्या ट्रेकिंगमध्ये पहिल्यांदाच मोहिम अयशस्वी ठरली. त्याला कारणही मीच होतो. ट्रेकिंगचे मुळातले नियमच पायदळी तुडवले. 

Saturday, July 20, 2013

चाकरमान्यांचो गणपती...

मोबाईलवर काल गाणी ऐकत असताना अचानक गणपतीची आरती सुरु झाली, ‘जयदेव जयदेव जय गणराजा सकल देवांआधी तू देव माझा!... खरं तर ही आरती गावच्या गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवरनं जोरजोरात वाजवायला मला भारी आवडायचं. अशी चीक मोत्याची माळ किंवा इतर तत्मस गाण्यांपेक्षा आपलं काहीतरी वेगळं असावं ही त्यामागंची सुप्त इच्छा.. पण याच आरतीनं पुन्हा एकदा मला गावच्या गणेशोत्सवाच्या आठवणीत पाठवून दिलं.
घरासमोरचा परिसर पाऊस-पाण्यानं हिरवागार झालेला असतो. हलकेच येणाऱ्या पावसाच्या सरीनं तुळस, जास्वंद, पिवळी कण्हेरी मस्तपैकी आपल्याच नादात डोलत असतात. शेणानं सारवलेल्या खळ्याच्या एका वेगळाच सुगंधाला प्राजक्ताचा पडलेला सडा आणखीनंच मोहून टाकतो. घरातल्या देवघरात बाप्पासमोर मंद समई तेवत असते. या धुंद करणाऱ्या वातावरणात गणपतीचं एक वेगळंच रुप दिसून येतं, आणि माझ्यासारखा नास्तिकाचे हातही नकळत जोडले जातात.
कोकणात गणपती म्हणजे खरोखरच सकल देवांआधी पूजा अर्चा होणारा. गणेशोत्सव या साडेपाच अक्षरांना कोकणात अनन्यसाधारण महत्व. गणेशोत्सव हा कोकणात साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव. गरीब असो वा श्रीमंत, मानकरी असो की पैरी (रोजंदारीवर काम करणारे) गणेशोत्सव हा कोकणातल्या प्रत्येक घरात तेवढ्याच उत्साहात आणि थाटामाटात साजरा होतोच होतो. म्हणूनच कोकणातला चाकरमानी माणूस जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात का असेना, गणेशोत्सवासाठी तो आपल्या कोकणातल्या घरी धाव घेणारच.
मुंबईतल्या चाकरमान्यांची तर आगळीच तऱ्हा. कारण गावाला जायचं म्हणजे पहिलं कोकण रेल्वेचं दिव्य पार करावं लागतं. यंदाच्या वर्षी तर तिकीट बुकिंग चालू झाल्याच्या चारच मिनिटांत सगळ्या गाड्यांवर हजारपेक्षा अधिकची वेटिंग लिस्ट दिमाखानं मिरवत होती. कोकणात गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांचे दोन प्रकार. एक गणपतीच्या आगमनाआधी तीन-चार दिवस डेरेदाखल होणारा आणि झाडलोट, रंगंरगोटी, डेकोरेशनची जबाबदारी खांद्यावर घेणारा. तर दुसरा कामाचा रगाडा, सुट्ट्या, प्रवासाची दगदग अशा कचाट्यातून बाप्पांचं नाव घेत हरितालिकेच्या दिवशी गावचं घर गाठणारा.



कोकणातलं गणपतीचं डेकोरेशन म्हणजे मुंबईकरांच्या भाषेत खरोखरच सांगायचं तर इको-फ्रेंडली. गणपतीवर आपली छत्रछाया धरणाऱी माटी ही सजावटीत सर्वात महत्वाची. मग माळ्यावर अगदी जपून ठेवलेली, कागदाच्या गुंडाळ्यात सांभाळून बांधून ठेवलेली परंपरागत माटी हलकेच उतरवली जाते. त्याच्यावरची धुळ झटकून त्याला पुन्हा तेलपाण्यानं नवी चकाकी दिली जाते. माटीवर सजावटीसाठी मग हरणं, कवंडाळं अशी रानफुलांची विविध लेणी चढवली जातात. विविध फळाफुलांनी नटलेली ही माटी गणपतीच्या आगमनासाठी नव्या नवरीसारखी नटून थटून सज्ज होते.
कोकणातल्याच कलाकारानं जीव ओतून, अगदी मनोभावे गणपतीच्या पाठीमागची  रंगवलेली भिंत हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य. राम-कृष्णापासून ते विविध पौराणिक संदर्भानी या भिंती नटलेल्या असतात. आणि त्याला खास कोकणी टच असतो. पण या पारंपरिक कोकणी सजावटीवर हल्ली मुंबईच्या चाकरमान्यांनी अतिक्रमण केलेलं दिसतं.
आमची सजावट कशी दिमाखदार हे दाखवण्याची स्पर्धाच जणू मुंबईकर चाकरमान्यांमध्ये दिसून येते. मग लाईट्सच्या माळा काय थर्माकोलचं डेकोरेशन काय, गणपती बाप्पा मात्र या सगळ्यांमध्ये सुखासमाधानानं येऊन विराजमान होतो. गणपती आणण्याची प्रथाही वेगळीच, एक तर डोक्यावर किंवा मग गावच्या मानकऱ्यांचे मोठे गणपती असतील तर ते डोलीमधून आणण्याची प्रथा.
आमचं गाव म्हणजे कोकणातल्या सिंधूदुर्ग जिल्ह्यातलं. कुडाळ तालुक्यात, बारा वाड्या आणि नऊशेपेक्षा अधिक उंबरा असलेलं आवळेगांव. आजूबाजूच्या डोंगरांनी अगदी आवळून आपल्या कवेत घेतलेलं गाव म्हणून त्याचं खरं नाव आवळगाव. पण कालौघात अपभ्रंश होत गेला आणि आवळेगाव हेच नाव शासकीय दफ्तरातही रुजू झालं.
१८ मोठमोठ्या खोल्या असलेलं, क्रिकेटच्या खेळपट्टीहून अधिकच लांब असलेलं आमचं बचाराम निवास. बचाराम या आमच्या पणजोबांच्या नावावरुन या घराचं नामकरण करण्यात आलं. कमल हसनच्या ‘एक दुजे के लिए’ चित्रपटातल्या भल्यामोठ्या खडकांची आठवण करून देणाऱ्या विविध खडकांनी वेढलेलं आमचं भलंमोठं घर. म्हणून आवळेगावातल्या बाराही वाड्यांत आम्ही खडकांतलेच म्हणूनच प्रसिद्ध आणि त्यात गावचे दुसरे मानकरी...
गणपतीच्या काळात आमचं भलं मोठं घर खऱ्या अर्थानं गजबजून जातं. क्रिकेटच्या खेळपट्टीपेक्षाही लांबीनं मोठी असलेली ओळय. पण गणेशोत्सवात ती पाहुण्या-रवळ्यांनी नुसती भरून जाते.  गणेश चतुर्थीच्या दिवशी तर साऱ्यांचीच लगभग उडालेली असते.
ज्येष्ठ मंडळींची एकामागोमाग एक फर्मानं सुटत असतात. आपण मात्र निमुटपणे ती पार पाडायची असतात. आपलं आराध्य दैवत गणपतीची निर्विघ्नपणे विधीवत पूजा पार पाडणं हे भलंमोठं आव्हान असतं.  माझे दोन नंबरचे काका, ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो, ते या पूजासोहळ्याचे सेनापती असतात.
फुलं कोणती लागणार, पूजासाहित्यामध्ये काय काय असावं ते पूजा कशी करावी यावर त्यांची बारकी आणि अनुभवी नजर.. फुलं वेचण्याची जबाबदारी आमच्या पिताश्रींनी आपल्या खांद्यावर घेतलेली असते. घराच्या बाजूच्या परड्यातनं मग जास्वंद, तगर, सदाफुली, दुर्वा, तुळशी या साऱ्यांची रवानगी थेट पूजेच्या ताटात होते.
गणपतीची शास्त्रसांग पूजा झाल्यावर कसोटीचा प्रसगं येतो तो नैवेद्य दाखवण्याच्या वेळी. कोकणातले गणपती हे वरसलीनं पूजले जाणारे. एकत्र नांदणारी कुटुंब कालांतराने विभक्त झाली. प्रत्येकानं चिऱ्याचं नवीन घर बांधून वेगळी चूल मांडलेली. पण गणपती मात्र काही वेगळा होऊ शकला नाही. तो आजही मुख्य घरातच पूजला जातो आणि त्याला पूजण्याची दरवर्षी प्रत्येकावर येणारी टर्म म्हणजेच वरसल..
वरसल असताना गणेशोत्सवाचा त्यावर्षीचा सगळा खर्च उचलण्याची जबाबदारी त्या कुटुंबावर असते. पण गणेशोत्सव मात्र एकत्रच साजरा केला जातो. हीच तर कोकणातल्य़ा गणेशोत्सवाची खासीयत आहे.
आमच्या गावी फौजदारवाडीत सावंतांचं एक भलं मोठं कुटुंब आहे. म्हणजे आपलं दीड एकशे कुटुंबांचं. दीडशे कुटुंबांचा मिळून एकच गणपती. गणेशोत्सवाच्या काळात हे अख्खं कुटुंब एकत्र येतं. तो भक्तीभावाचा सोहळा खरंच अवर्नणीय. या सगळ्या कुटुंबाची एकत्रित नैवेद्य दाखवताना किती पंचाईत होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
आमच्या घरी चारच कुटुंबं असली तरी नैवेद्याच्या वेळी आरडाओरडा हा सालाबादचाच. इतर घरातला नैवेद्य कधीच झालेला असतो. पण ज्यांची वरसल त्यांची चूल मात्र अजूनही अव्याहतपणे सुरूच असते.
गणपती बाप्पा पण बिच्चारा चौरंगावर निमूटपणे उकडीच्या मोदकांसाठी तिष्ठत बसलेला असतो. समोर मोदकांची अनेक पाकिटं पडलेली असतात, पण उकडीच्या मोदकांची बातच काही न्यारी... गणपती बाप्पाच्या वाहनाची म्हणजेच उंदराची जशी चुळबुळ चाललेली असते, तसेच उंदीर आपल्या पोटातही जोरजोरात टणाटणा उड्या मारत असतात. अखेर मग एकत्रितपणे सर्वांचा नैवेद्य दाखवला जातो आणि मोदकांवर बाप्पापेक्षा आपल्याच उड्या पडतात.
कोकणातल्या गणपतीमध्ये सर्वात धम्माल येते ती आरती आणि भजनांच्यावेळी. गणपतीची आरती ही एकट्या दुकट्यानं करणं हे मालवणी मनाला न पटणारंच. गणेशोत्सव म्हणजे सार्वजनिक उत्सव आणि तो सार्वजनिकपणेच साजरा करण्याकडे कोकणी माणसाचा कटाक्ष. गणपतीच्या आरतीला तुमच्या दारी अख्खी वाडी हजर असते.
लहानथोरांपासून ते जुणी जाणती आणि मानकरी मंडळीही यात सहभागी असतात. सु:खकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती टाळ मृदंगाच्या तालावर एकत्रितपणे म्हणताना आपल्याही अंगावर रोमांच उभे राहतात. घालीन लोटांगणला कोण पहिलं लोटांगण घालतं याची जणू स्पर्धाच लागते. माझ्यासारख्या मुंबईकर चाकरमान्याचा गोंधळ उडतो जेव्हा ‘राम बंधू हो कृष्ण बंधू हो’ असा जोश घुमु लागतो. आणि त्या शब्दांप्रमाणेच वाडीतल्या त्या साऱ्या गावकऱ्यांमध्ये एक बंधूभाव आलेला दिसतो.
देवगडमधल्या आरेमध्ये म्हणजेच माझ्या बहिणीच्या गावी विठ्ठलाच्या आरतीला अशीच एक वेगळी चाल दिलेली पाहायला मिळाली. ‘दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती’, असं म्हणत विठ्ठलाक़डे जयदेव जयदेव जय पांडुरंगा असं वळण्याची रुढ पद्धत. पण आरे गावची रीतच वेगळी. जय जय जय हरी विठोबा, जय पांडुरंगा विठोबा जय पांडुरंगा, रखमाई वल्लभा विठोबा राईच्या वल्लभा विठोबा पावे जीवलगा असं उच्चस्वरात वेगळ्याच चालीवर विठोबाला आळवलं जातं.
कोकणातल्या भजनांचीही तीच गत. प्रत्येक घराघरांत गणपतीसमोर भजनंही व्हायलाच हवीत. रात्र रात्र जागून अनेक वाड्यांमधले उंबरे पालथे घालणं हा सर्वात आवडता प्रकार. गाई गोपाळ सवंगडी वना अशी गौळण टीपेला पोहोचलेली असते आणि गावच्या झिलग्यांचो लक्ष मात्र चुलीसमोर काय रांधतायत याकडं लागलेलं असतं.
चाकरमान्यांच्या ऐपतीप्रमाणे भजनानंतरचा नाश्ता अवलंबून. कोकणात एकेकाळी भजनानंतर प्रसिद्ध असे खडखडे लाडू मिळत. पण आता त्याला कोणी हातसुद्धा लावत नाहीत. मग हळूहळू बुंदीचे लाडू, फरसाण यांनी खडखड्या लाडूंची जागा घेतली.  नंतर - नंतर तर थेट उसळपाव, मिसळपावापर्यंत त्याची प्रगती झाली. त्यामुळे तुमच्या घरातलं भजन किती रंगेल याचा निकाल या नाश्त्यावर अवलंबून. पण कधीकधी कोणतीच आशा न बाळगता गावोगावच्या वाड्यांमध्ये ही भजनी मंडळं अख्खी वाडी दणाणून सोडतात. त्याला कोकणातला खास असा गोडवा असतो. रात्रं रात्र जागून भक्तीनं केलेल्या त्या भजनाचा आनंद चाकरमान्यांना वर्षाची बेगमी करून देतो. तो नाद, तो ताल मुंबईत आल्यावरही कानात घुमत असतो.
चाकरमान्यांच्याच खिशाच्या ताकदीवर गणपती बाप्पा किती दिवस मुक्काम ठोकणार हेसुद्धा अवलंबून असतं. पण बाप्पा असताना दिवस कसे सरतात कधीच समजत नाही. अख्ख्या घरावर भक्तीचा नवा रंग चढलेला असतो. भजनं, फुगड्या, आरती यामध्ये दिवस मात्र सरतात. गणपतीबरोबरच गौरीही आपला निरोप घेण्यासाठी निघतात.
कोकणातही विसर्जनाची पद्धतही निराळीच. एखाद्या बांधावर, नदीवर किंवा तलावावर सगळ्या वाडीचे गणपती एकत्र येणार. मानाप्रमाणे त्यांचा नंबर ठरलेला असतो. पुन्हा एकदा सर्वांचीच सार्वजनिक आरती होणार. प्रत्येकानं आणलेला प्रसाद एकत्र केला जाणार. शिरवणी वाटली जाणार. बाप्पाला अखेरचा निरोप देताना डोळेही पाणावतात. हा प्रसंग येऊच नये असंच वाटत राहतं. पण पुढच्या वर्षी लवकर यायचं तर आता मात्र निरोप द्यायलाच हवा.
निरनिराळ्या स्वभावाची, एकमेकांशी द्वेषानं वागणारी माणसं गेले काही दिवस मनानंही एकत्र आलेली असतात. एक बंधूभाव त्यांच्यात निर्माण झालेला असतो. पण बाप्पा जातो आणि पुन्हा ही माणसं आपल्या मूळ पदावर येतात. बाप्पांना निरोप देण्यापेक्षाही माणसाच्या या स्वभावाचं फार वाईट वाटतं. बाप्पा कायमच इथं राहावेत असं वाटतं आणि डोळ्यांच्या कडाही ओल्या होतात.