Wednesday, August 24, 2016

अग्निपथ... 



हे दृश्य तुम्हाला विचलित करेल. पण हे मढं आहे मुर्दाड प्रशासनाचं. हे दृश्य काळीज चिरून टाकतं. मन हतबल करतं. प्रशासन दगड झालंय, पगार आणि सुट्ट्या घेण्यापुरते सरकारी अधिकारी/कर्मचारी माणूस होतात. कर्तव्याच्या वेळी ते दगड बनतात. ठार दगड, त्याचंच हे जिवंत पण मेलेलं दृश्य. काहींचा अपवाद वगळून.

ओडिशामधल्या भुवनेश्वरमधला हा हतबल नवरा. सोबतीला त्याची ११ वर्षांची लेक.. तिच्या डोळ्यातले अश्रुही आता आटून गेलेयत. गरिबीनं पोळून गेलेयत. कोणास ठावूक ती किती तास रडतेय. तिला आपल्या बापाचं दु:ख बघवत नाही. स्वत:चं दुखं: ती कोणाकडे मोकळं करेल... जिच्याकडे मोकळं करायचं ती आईच जग सोडून गेली... आणि आपला गरिब बाप आईचा मृतदेह चादरीत गुंडाळून, खांद्यावरून घेऊन जातोय.

एक नाही दोन नाही तर तब्बल १०किलोमिटर हा हतबल नवरा आपल्या पत्नीचं शव घेऊन चालत होता. रात्रभर, अनवाणी, रिकाम्या पोटांनी. मनातला दुखाचा डोंगर बाजुला करुन, डोळ्यातले अश्रू आतमध्येच रोखून, गरिबीचे चटके सहन करत तो चालला होता आपल्या पत्नीचं शव घेऊन. काय वेदना झाल्या असतील, काय क्लेश झाले असतील त्याला...

कलाहंडी जिल्ह्यातल्या मेलघारामधलं हे दाम्पत्य.. अतंत्य गरिब आणि मागास जिल्हा. ४२ वर्षांची त्याची पत्नी अमंग देवी क्षयरोगानं आजारी होती. दाना माझीनं गावापासून ६० किमी दूर भवानीपत्ना जिल्हा रुग्णालयात पत्नीला दाखल केलं. तेव्हाही किती त्रास त्याला झाला असेल हे समजू शकलेलं नाही. पण शरिरानंच नाही तर मनानं खंगलेली त्याची पत्नी जास्त दिवस नाही जगू शकली.

आता ६० किमी दूर गावी पत्नीचा मृतदेह घेऊन जायचा कसा. सोबतीला कोणी नाही. खिशात पैसे नाहीत, होतं नव्हतं सगळं उपचारावर खर्च झालेलं. जिल्हा रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांसमोर, प्रशासनासमोर त्यानं हात जोडले. माझ्या बायकोचा मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी काहीतरी करा. मदत करा. पण त्या दगडांना कुठे ऐकू जातं. त्यांनी धुडकावून लावलं.

वास्तविक नवीन पटनायक यांनी फेब्रुवारीमध्येच असा गरिब लोकांसाठी महापरायणा योजना सुरू केलेली. सरकारी रुग्णालयात निधन झालेल्या गरिबांना मृतदेह घरापर्यंत कुठलंही शुल्क न घेता पोहचवण्याची ही योजना.

पण मुर्दाड प्रशासन ऐकेल, या योजनांची अंमलबजावणी करेल तरच नवल. अखेर दाना मांझीन ते केलं जे कोणालाही जमणार नाही. काळीज घट्ट करुन त्यानं पत्नीचा मृतदेह चादरीत गुंडाळला. धाय मोकलून रडणाऱ्या लेकीला सावरलं आणि त्याने गावाकडची वाट धरली. रात्रभर तो चालत होता. १० किमीची वाट त्यानं अशीच तुडवली. सकाळी जेव्हा गावकऱ्यांना हे दृश्य दिसलं तेव्हा ते हडबडले.

ओडिशा टिव्हीचा कोणीतरी तिथून जात होता. त्याने हे दृश्य पाहिलं आणि लगेच ऑफिसला फोन केला. ओडिशा टिव्हीवाल्यांनी कलेक्टरला फोन लावला. मीडियाच्या फोननंतर मग प्रशासन जागं झालं. अँम्ब्युलन्सची सोय करण्यात आली. पुढचा ५० किलोमिटरचा प्रवास अँम्ब्युलन्सने झाला. हरिश्चंद्र योजनेअंतर्गत त्याला अंत्यविधिसाठी मदत करण्यात आली. कलाहंडीच्या कलेक्टरची मदत नसती तर हे शक्य झालं नसतं.

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला जिम्नॅस्टिकमध्ये फायनल गाठून देणारी दीपा याच ओडिशाची. बघा म्हणजे तिचा प्रवासही किती खाचखळग्यांनी भरसा असेल या मुर्दाड झालेल्या प्रशासनापुढे. मग दाना मांझीची लेक काय करेल. त्याच्या लेकीला तो शिकवू शकेल का. ती काय शिकेल. ती मोठी कशी होईल. की तिचं आयुष्यही असंच होरपळून जाईल...

विधात्या तूच जर या लेकरांना असं वाऱ्यावर सोडलंस तर त्यांनी कुठं बघायचं, कसं जगायचं ???



(सौ ओडिशा न्यूज)

समीर सावंत,
सीनियर प्रोड्यूसर,
जय महाराष्ट्र न्यूज...

Monday, April 11, 2016

दुष्काळराष्ट्र



भर दुष्काळात उभं गाव ओस झालंय.. गावात माणूस शोधावा तर सापडत नाही.. करपून गेलेलं सारं शिवार... कर्जाचे खाजगी दावेदार.. खंगलेली मनं.... आशाळभूत नजरेनं आभाळाकडे लागलेले डोळे... पण तो दयाघन तरी कुठे ऐकतोय.. दुष्काळ अधिकाअधिक गडद होत चाललाय... आभाळ रूसलंय... कोरडंठाक पडलंय आणि खाली जमिनही भेगाळून गेलीय.. धरणांनी मान टाकलीय... गावं उद्ध्वस्त झालीयत... मनं उद्ध्वस्त झालीयत.. माणसंच दुष्काळामुळे भेगाळून गेलीयत...

घरात खायला तोंड फारं.. पण मागच्या दोन तीन वर्षात पोटापुरतंही पिकलं नाही.. या दुष्काळानं हातातला नांगर कधीच निघून गेलाय.. तर हातात आल्यात घागरी आणि पाण्याची भांडी... सगळं घरदार पाणी भरण्याच्या नादात थकलंय... तरीही धडपड सुरुय.. एकेका घागरीसाठी... एकेका थेंबासाठी... लोकं वणवण करतायत.. दहा दहा मैल अनवाणी... वैशाख वणव्यात होरपळत... फक्त जीवन देणा-या पाण्यासाठी... पण पाणी तरी कुठंय ते सुद्धा खोल खोल गेलंय... आणि सगळ्या आशा आकांक्षाही या खोल खोल विहिरीसारख्या आटून गेल्यायत...


गावात टँकर येतो कधी कधी... आठवड्यातून एकदा कधी दोनदा.. टँकर आला की गावात झुंबड उडते... हाती असेल नसेल ते काम टाकून लोकं टँकरमागे धावतात.. हातात पाईप घेऊन टँकरवर चढण्याचा प्रयत्न करतात... बायाबापडे, शाळकरी मुलं... सगळे पाण्यासाठी धाव घेतात..

अक्षरक्ष पाणी हिसकावून घेण्याचेही प्रकार घडतात.. महिला पुरुष असा भेदभाव न होता भांडणं सुरू होतात.. एकमेकांवर धावून जाण्याची शिव्यांची लाखोली वाहण्याचे प्रसंग घडतात.. तहान भागवण्यासाठी माणुस माणुसकीला पारखा होत चाललाय... लातूरसारख्या शहरात तर पाण्याची परिस्थिती इतकी बिकट की पोलीस बंदोबस्त लावला गेला.. 144 कलम लावलं गेलं.. पाण्याला टाळं ठोकण्याची वेळ ओढवली...

पाडव्याचा सण येऊन गेला. पण दुष्काळानं तो साजराच करता आला नाही.. आठवडी बाजार ओस पडलेयत.. कधीकाळी ग्राहकांनी गजबजलेली बाजारपेठ आज ग्राहकांसाठी तरसलीय..

रायगडच्या पोलादपूर गावात नदीच्या एका डबक्यातलं पाणी गोळा करण्यासाठी गावकरी अडीच किलोमीटर उंच खोल दरीत उतरतात.. जगण्यासाठी मरणाचा दररोज ते संघर्ष करतात... रोज मरणाच्या उंबरठ्यावरून ते पाणी घेऊन येतात..

नांदेडमध्ये पाणी भरताना टँकरखाली आलेला 13 वर्षांचा नवनाथ बागल,विहिरीत पाय घसरून मृत्युमुखी पडलेली सोलापूरची कमल असवले, बीडच्या गेवराईमधली गौरी भुसे... बीडच्याच बागपिंपळगावमधली 9 वर्षांची राजश्री कांबळे... पाणी भरण्याची कसरत करताना चिमुरड्यांचे गेलेले हे बळी... शिक्षणाच्या आखलेल्या योजनांचा या चिमुरड्यांना काय फायदा.. दुष्काळानं त्यांचं जीवन अकाली करपून गेलं..

शेतक-यांचा कणा मोडून गेलाय... पाणी भरून भरून बायका मेटाकुटीला आल्यायत.. गावातला माणून निराश हताश हतबल झालाय.. खेड्याकडे चला... कशासाठी... दुष्काळाच्या या मसणवाटेत कशाला जायचं हाच प्रश्न पडला तर नवल ते काय...

Image Courtesy - india today
Image courtesy - outlook

Monday, January 18, 2016

चॅम्पियन स्नेहल शिंदे




सन २००६...पुण्यातला स्वारगेटजवळचा शिवाजी रोड... १३ वर्षांची आठवीत शिकणारी एक मुलगी... आपल्या ताईचा हात पकडून जिजामाता हायस्कूलमध्ये प्रवेश करत होती. एका नव्या इनिंगची सुरुवात करण्यासाठी.. खरं तर गेल्या ३ वर्षांत तीने जिम्नॅस्टिकचे धडे गिरवले होते. पण तिचं मन तिथं रमत नव्हतं. तिचे वडिल अव्वल दर्जाचे बॉक्सर... त्यामुळे आपल्या लेकीनं लैला मोहम्मद अलीसारखं अव्वल बॉक्सर बनावं हे त्या वडिलांचं भाबडं स्वप्नं... पण नियतीच्या आणि तिच्या मनातही काही वेगळंच होतं. तिची ताई किशोरी शिंदे कबड्डीपटू. ताईचा खेळ ती टक लावून पाहायची... तिचंच बोट धरून कबड्डीतल्या नव्या इनिंगला सुरुवात करत होती...

आणि आज तब्बल ९ वर्षांनंतर ती पुन्हा एकदा नेहमीसारखीच जिजामाता हायस्कूलच्या प्रांगणात प्रवेश करत होती.. पण आता तिचं स्वागत होत होतं ते युद्धातून विजयी होऊन परतलेल्या रणरागिणीसारखं. तिच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात दिसत होता अभिमान. कारण त्याच चिमुरडीनं आज पटकावला होता महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च आणि मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार...

पण तरीही ही मात्र निश्चल होती. कौतूकाचा आनंदानं स्वीकार करत असतानाही तिच्या मनात कोणताही गर्व नव्हता. तिची पावलं अजूनही जमिनीवरच होती. उलट जबाबदारी वाढली होती.. त्याच जाणिवेनं तिनं कबड्डीचं किट चढवलं. मैदानाला नमस्कार केला आणि रोजच्यासारखी सरावाला सुरुवात केली.. ही गोष्ट आहे महाराष्ट्राचं कर्णधारपद भुषवलेल्या, अनेक पदकांची, बक्षिसांची कमाई केलेल्या स्नेहल शिंदेची...



वयाच्या तेराव्या वर्षी सुरु केलेल्या कबड्डीच्या प्रवासाला पुरस्काराचं कोंदण लाभलं होतं. पण या यशामागे होती... जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत... कबड्डी आणि दुखापत हे घट्ट समीकरणच... अनेक कबड्डीपटूंची कारकिर्द ऐन बहरात संपली किंवा दीर्घकाळ ब्रेक लागला... याची पुरेपूर जाणीव असल्यानंच ती कठोर सरावाला प्राधान्य देते. दररोज सकाळी ३ तास ती जिममध्ये घाम गाळते. एखाद्या पुरुष खेळाडूलाही लाजवेल असा. पण एवढंच नाही तर फिटनेससाठी तिनं जीभेवर ताबा मिळवलाय. जंक फूड, फास्ट फूड, अरबट-चरबट खाणं तिच्या डिक्शनरीत नाही. गेल्या कित्येक वर्षांमध्ये सांभाळलेलं हे पथ्यपाणी. म्हणूनच आजही कबड्डीच्या मैदानात तासन तास अटॅक करण्याची तिची क्षमता आहे.

आक्रमक रेडर ही तिची ओळख. तिचं आक्रमण असतं वाघिणीसारखं. आक्रमकपणे खोलवर चढाई करुन प्रतिस्पर्धी संघ गारद करण्यात पटाईत. पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाकडून खेळताना प्रशिक्षक राजेश ढमढेरेंच्या हाताखाली तिने कबड्डीचे धडे गिरवले. याच बाळकडूतून तयार झालेल्या या वाघिणीनं मग कबड्डीचं मैदान दणाणून सोडलं. अनेक मानाचे पुरस्कार तिनं संघाला पटकावून दिले.. याच कामगिरीमुळे राष्ट्रीय कबड्डी संघात तिला स्थान मिळालं.

मुंबईत २०१२ साली झालेल्या शिवछत्रपती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. रेल्वे संघानं फायनलमध्ये पराभव केल्यानं त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. पण तिची घोडदौड सुरुच होती..दोनच वर्षानंतर होत असलेल्या पाटण्यातल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राची धुरा तिच्यावर सोपवण्यात आली. पण दुर्दैव आड आलं. सरावादरम्यानच ती जायबंदी झाली. महाराष्ट्राच्या मुलींनी सेमी फायनलपर्यंत धडक दिली. आता समोर होता हरयाणाचा अंगानं ताकदवान असलेला संघ. मुली कमजोर पडल्या. लढाई हरण्याची चिन्ह दिसत असताना कॅप्टन स्नेहलला मैदानात उतरवण्यात आलं. दुखावलेल्या पायानं ती मैदानावर उतरली खरी. पण लढाई गमवावीच लागली. महाराष्ट्राला अजिंक्यपद पटकावून देण्याचं तिचं स्वप्न भंगलं होतं...



पण पहिल्यावहिल्या महाकबड्डी लीगमध्ये तिनं नेतृत्व दाखवून दिलं. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशननं सुरु केलेली खास महिलांसाठीची ही व्यावसायिक स्पर्धा. राजमाता जिजाऊच्या अव्वल स्नेहल शिंदेला बोली मात्र लागली चौथ्या क्रमांकाची. राजमाताच्याच नेहा घाटगेला पहिली, मुंबई उपनगरच्या अभिलाषा म्हात्रेला दुसरी, राजमाताच्याच सायली केरिपाळेला तिसरी बोली लागली. दोघींमध्ये फक्त दोन हजारांचा फरक होता. त्यावर स्नेहलची प्रतिक्रिया होती, 'बरं हाय की, माझ्यावर प्रेसचं आणि लोकांचंही जास्त लक्ष नसेल आणि अपेक्षाही'..

पण ठाणे टायगर्सच्या या वाघिणीनं प्रतिस्पर्धी संघाना लोळवलं. आक्रमणाची धुरा एकटीनं समर्थपणे पेलली. तिला जेरबंद करण्याचे सगळे प्रयत्न फोल गेले. आक्रमक रेडच्या जोरावर तीनं संघाला फायनलचं तिकीट मिळवून दिलं. पण फायनलचं आव्हान आणखी कठीण होतं. कारण प्रतिस्पर्धी बारामती हरिकेन्सच्या प्रत्यक्ष मैदानावर खेळणाऱ्या सातपैकी चार महत्त्वाच्या कबड्डीपटू होत्या राजमाताच्याच.. राजेश ढमढेरे या एकाच कोचकडून कबड्डीचं तंत्र घोटवलेल्या. जीवलग मैत्रिण पण आता प्रतिस्पर्धी संघाची कॅप्टन नेहा घाटगे, बलाढ्य रेडर स्नेहल माणिक शिंदे, ऑल राऊंडर मोनिका शिंदे आणि बचावपटू पायल घेवारे.

अटीतटीच्या युद्धात स्नेहलनं बाजी मारली. तिला रोखण्याचे मनसुबे उधळले गेले. सोनाली इंगळेच्या आणि टीमच्या साथीनं तीनं पहिल्यावहिल्या महाकबड्डी लीगवर ठाणे टायगर्सचं नाव कोरलं... ठाणे टायगर्सची ही वाघीण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरली.

एका सर्वसामान्य कुटुंबातली ही मुलगी. पण आपल्या कामगिरीच्या जोरावर कबड्डीत महाराष्ट्राचं नाव गाजवतेय. पुण्याच्या शाहू कॉलेजमधून एम.कॉम करतेय. अभ्यास, सराव आणि मॅच अशी तारेवरची कसरत करतेय. आंतरराष्ट्रीय पातळीवर तिला देशासाठी सुवर्ण कामगिरी करायचीय. त्यासाठी अनेक गोष्टींचा तिनं त्याग केलाय. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात फेसबूक, व्हॉट्सएपपासून ती दूर आहे. यापेक्षा तिच्या ध्येयाबद्दल अधिक काय बोलावं...