Monday, November 27, 2017

बुधाजी खंडू बोरसे



                          बुधाजी खंडू बोरसे

 



हे नाव म्हणजे अगदी जेम्स बॉण्डच्या थाटात घेईल असंच. माय नेम इज, बोरसे... बुधाजी खंडू बोरसे... अग्निपथमधल्या विजय दिनानाथ चौहानच्या स्टाईलने बोलावं तर, है साला मेरा नाम बुधाजी खंडू बोरसे. बापका नाम खंडू. पढानेको नंदादीप हायस्कूल हाय... जानता है कितना साल पढा रहा हुँ... है साला... बुधाजी खंडू बोरसे सर हे अगदी अजब रसायन होते. पण ते जीवशास्त्र शिकवायचे. शाळेतल्या इतर शिक्षकांची पुर्ण नावं कधीच लक्षात राहिली नाहीत. पण यांचं नाव मात्र पुर्णपणे लक्षात राहीलं. 

अगदी लक्षात रहावं असं वरकरणी तरी त्यांच्याकडे काहीच नव्हतं. बुटकी मुर्ती. किरकोळ बांधा. गोरे गोमटे असे बोरसे सर. कुरळ्या केसांचे पण कपाळावरचे पुढचे आणि आजुबाजुचे केस उडून गेलेले. डोळ्यावर नव्वदीच्या काळातला तो काळ्या फ्रेमचा चश्मा... त्या चश्म्यातली ती घारीसारखी बेरकी नजर. त्या नजरेतून मात्र काहीच सुटायचं नाही. कोण मस्ती करतोय, कोण दंगा करतोय, कोणाचं अभ्यासात लक्ष नाही, कोण जांभई देतंय हे त्यांच्या चाणाक्ष नजरेतून कधी सुटलं नाही...

कुरळ्या केसांवर तेल घालून चप्पु केलेला. त्यातून एक बट पुढे यायची. पण याच तेलानं डोकं मात्र सुपिक बनलेलं. कपाळावरचं तेल झिरपून बुद्धी कशी कुशाग्र झालेली. आणि याच बुद्धीनं नंदादीपमधल्या अनेकांना विज्ञान शिकवलं. ते शिकवायचे भारी, पण जीवशास्त्र शिकवता शिकवता जीवही काढायचे. म्हणूनच त्यांचं टोपण नाव होतं हिटलर.

आजही हिटलर म्हटलं की दोनच व्यक्ती आठवतात. एक प्रत्यक्ष जर्मनीचा हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलर... आणि दुसरे पोरांच्या कानाखाली जाळ काढणारे आमचे जीवशास्त्राचे बोरसे सर. कानाखाली जाळ काढणं हा वाकप्रचार आमच्या बॅचमधल्याच काय, त्याआधी आणि त्यानंतरही अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवला असेल तो बोरसे सरांकडून. अगदी मीसुद्धा त्याला अपवाद नाही. 

आठवीची तिमाही संपली होती. त्यानंतर प्रयोगवही तपासण्याचं काम सुरु होतं. माझी प्रयोगवही मात्र अपुर्णच होती. मॉनिटर असूनही प्रयोगवही अपुर्ण असणं मोठाच गुन्हा होता. त्याकाळी मास्तर बसायचे तिथे स्टेज असायचा. मास्तरांच्या बाकाकडे गेलो. सगळ्या पोरांसमोर आपली निघणार हे मनात ठरवलं. आणि मग जो काय कानाखाली जाळ निघाला तो अजूनही लक्षात आहे. ते वळ अजूनही कधीतरी आठवतात. चुरचुरतात देखील. शाळेच्याच नाही संबंध आयुष्यात पहिला आणि अखेरचा मार त्यांच्याचकडून खाल्लेला.

कानाखाली जाळ काढणारे बोरसे सर 'लक्ष्य'वेधीसुद्धा होते बरं का! त्यांना खरं तर नेमबाजी किंवा तिरंदाजीला पाठवायला पाहिजे होतं. कारण पोरानं जांभई दिली किंवा आळस दिला रे दिला की ते खडू अचूक फेकून मारायचे. झोप कुठच्या कुठे उडून जायची. पण कडक शिस्तीचे बोरसे सर अभ्यासाच्या बाबतीतही तेवढेच आग्रही होते. पोरांनी खूप शिकावं यासाठीच त्यांची तळमळ असायची. 

भौतिक, रसायन किंवा अगदी जीवशास्त्र... निरस वाटणारं विज्ञान ते तळमळीने शिकवायचे. शाळेत विज्ञान प्रत्येकालाच आवडायचं असं नाही, त्यामुळे ते खूप गमतीही करत. म्हणजे हिटलरने धम्माल मज्जा करायची हे पचायला जरा जडच जातं. पण बोरसे सर दोन विरुद्ध टोकांचे होते. म्हणजे हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांचं ते मिश्र रसायन होतं... त्यांची मिशीही अगदी चार्ली चॅप्लिन आणि हिटलरच्या मिशीचं मिश्रण असल्यासारखी होती... ती छोटीसी मिशी त्यांची वेगळी ओळख होती.. हिटलरसारखे अगदी हुकूमशहा वाटतील असे कडक शिस्तीचे बोरसे सर, चार्ली चॅप्लिनसारखी मस्करी करुन पोरांना तेवढेच हसवायचे.. 

मुलांना घडवणं हा त्यांचा ध्यास होता. म्हणूनच कडक शिस्तीचे आणि तेवढेच मस्करी करणारे बोरसे सर, ही दोन्ही रुपं एकाच व्यक्तीमध्ये पाहायला मिळत. पण ते तेवढेच नीटनेटकेही होते.. अर्ध्या बाह्यांचा म्हणजे हाफ शर्ट, त्याखाली अंगाला मापात बसेल अशी पँट.. त्यांना कधी अघळपघळ असे कपडे घालून आलेलं कधी पाहिलंच नाही.. केसही फणीने व्यवस्थित बसवलेले असायचे... पण स्वत: नीटनेटके राहणारे बोरसे सर विद्यार्थ्यांनाही नीटनेटके ठेवण्यात आग्रही असत.. त्यांच्या खिशात नेहमी फणी असायची.. विद्यार्थ्यांनाही ते दफ्तरात स्वत:जवळ फणी आणि छोटासा आरसा ठेवा असं सांगत.. 

आज मुलाखतीला जाताना किंवा बाहेरही जाताना बोरसे सरांचा हा सल्ला किती योग्य होता हे कळतं.. ती सवय त्यांनी विद्यार्थीदशेपासूनच लावली होती. जेव्हा मुलाखतीला जाताना नीटनेटकं कसं राहावं हे सांगणाऱ्या इंटरनेटवरच्या हजारो वेबसाईट्स नव्हत्या किंवा यु ट्युबचे व्हिडिओदेखील नव्हते, तेव्हा बोरसे सरांनीच  नीटनेटकेपणाचं महत्त्व दाखवून दिलेलं. शाळेत असताना मात्र ते कधीच कळले नाहीत.. अनेकांना ते हिटलर वाटत असतील, पण अनेक विद्यार्थ्यांना त्यांनीच विज्ञानाची गोडी लावली. 

बोरसे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये कधी भेदभाव नाही केला. हुश्शार आणि ढ विद्यार्थी त्यांना एकसारखेच होते. चूक केली की दोघांच्याही कानाखाली जाळ निघायचा. मारायला ते जराही मागेपुढे बघत नसत.. पण त्या काळात शिक्षकानं विद्यार्थ्यावर हात उचलला अशी ब्रेकिंग न्यूजची प्रथाही नव्हती. कारण शिक्षक जे काही करत ते विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी. वर्गात न शिकवता फक्त खासगी क्लासमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची जमात अजून अस्तित्वात आली नव्हती.

विज्ञान प्रदर्शनात सहभाग घ्यायला त्यांनीच मला भाग पाडलेलं... एकतर समाजसेवेच्या नावाखाली निघणाऱ्या सहलीमध्ये सहभागी व्हायचं किंवा मग विज्ञान प्रदर्शनात असे दोन पर्याय तेव्हा उपलब्ध होते. बोरसे सरांमुळेच मी विज्ञान प्रदर्शनात सहभागी होऊ शकलो. संतोष चव्हाण आणि मी दोघांनी यात सहभाग घेतला होता... खूप विलक्षण अनुभव होता... पण बोरसे सरांची माझ्यासोबत वैयक्तिक आणि खूप भावपूर्ण आठवण जोडलेली आहे. जी मी कधीच विसरलो नाही.. 

माझ्या वडिलांचं नाव समरसिंग सावंत. त्यामुळे हजेरी घेताना समीर समरसिंग सावंत असं अनेकदा शिक्षक पुकारायचे.. पोरं मात्र सरदारचा मुलगा म्हणून चिडवत... कारण वडिलांच्या नावावरुन ते शिख किंवा पंजाबी असावेत असा अनेकांचा गैरसमज... हा गैरसमज खऱ्या अर्थानं दूर केला तो बोरसे सरांनीच... माझ्या वडिलांच्या नावात काय दडलंय हे समजावून सांगितलं ते बोरसे सरांनीच.. एकदा हजेरी घेताना त्यांनी मी नाव सांगितल्यावर तसंच उभं राहायला सांगितलं. विचारलं समरसिंग म्हणजे काय... मी आपला तोंडाला चिकटपट्टी लावून उभा राहिलेला.. साला अर्थ माहितच नाही तर सांगणार कुठून.. बरं अर्थ सांगणारं पण कोणीच नव्हतं. वडिलांना विचारणार तरी कसं, तुमच्या नावाचा अर्थ काय...

मी काहीच बोलत नाही पाहून वर्गातही खुसपूस आणि चुळबूळ वाढलेली... अखेर बोरसे सरच बोलायला लागले. अरे समर म्हणजे काय... समर म्हणजे युद्ध... आणि सिंग म्हणजे काय तर शेर... सिंह... तू समर म्हणजे युद्ध जिंकून आलेल्या सिंहाचा मुलगा आहेस... बोरसे सरांनी सांगितलेल्या या अर्थानंतर छाती अभिमानानं फुललेली.. आता कोणीही विचारु दे वडिलांच्या नावाचा अर्थ काय, मी ते अभिमानानं सांगू शकत होतो.. बोरसे सरांनीच ही नवी ओळख मिळवून दिलेली..

                          (नंदादीप विद्यालय, गोरेगाव पूर्व)

दहावीच्या निकालानंतर शाळेपासून अनेक विद्यार्थ्यांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. दहावीचा निकाल हातात घेतल्यानंतर पुन्हा शाळेत पाऊल कधीच पडलं नाही... शाळा तेव्हा सुटली ती कायमचीच... शाळेच्या परिसरात गेलो तरी शाळा बाहेरुनच दिसायची.. पण आतमध्ये कधी गेलो नाही... आता पुन्हा एकदा शाळेत जावं असं वाटतंय. पुन्हा एकदा बोरसे सरांना भेटावसं वाटतंय. ते भेटले तर त्यांचे आशिर्वाद घेतल्यानंतर त्यांना कडकडून मिठी मारावीशी वाटतेय. ते विचारतीलच अरे तुझं नाव काय. तेव्हा अभिमानाने सांगू शकेन, सर मी समीर समरसिंग सावंत... 


Sameer Samarsingh Sawant,
Senior Producer,
tv9



बुलेट 'राणी'


दापोली... कोकणच्या निसर्गसंपन्न मातीतलं शांत, सुंदर, निवांत तालुक्याचं ठिकाण. देवानंच मुक्तहस्ते निसर्गसौंदर्य भरभरून उधळलेलं. अाळशी माणसासारखा अथांग पसरलेला समुद्र, त्यावरचं चमचमतं पाणी, समुद्रकिनाऱ्याजवळची टुमदार घरं, लाल चुटुकदार कौलारू घरं, सभोवती नारळी-पोफळीच्या बागांनी नटलेला हिरवागार नजारा. दूरवर गावाकडे नागमोडी वळणं घेत जाणारा डांबरी रस्ता. अशा या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत समुद्रकिनारी शांत, निवांतपणे बसावं, तर त्या डांबरी रस्त्यावरून शांती भंग करणारा बुलेटचा दमदार आवाज आपली शांती भंग करतो.


                          काळ्या कुळकुळीत रंगाची वर सिल्व्हर रंगाची रंगसंगती असलेली बुलेट त्या शांत रस्त्यावर आपला रुबाब दाखवून देते. पण त्याही पलिकडे त्या बुलेटवर ऐटबाज बसलेली 'ती' आपली नजर हटू देत नाही. राणी रंगाचा सलवार, त्याला साजेसा निळ्या रंगाचा पायजमा. पायात चप्पल, डोळ्यावर गॉगल. वाऱ्यानं उडणारे मोकळे सोडलेले केस, साधंसंच पण नजरेत भरेल असं सौंदर्य, चेहऱ्यावर मनमोहक हास्य. तिच्यावर नजर जाणार नाही हे कोणी बोलेल तर ते खोटंच... पण ही आर्ची नाही बरं का. तर साऱ्या दापोलीला ओळखीची असलेली ही 'गुरूची लेक'. होय, तीचं पूर्ण नाव... संख्या गुरुप्रसाद पोवार...

                           बुलेटच्याच वेगानं ती डोळ्यासमोरून जाते, पण तीच्यावरून नजर न हटणाऱ्यांची 'संख्या' कमी नाही. बुलेटचा दमदार आवाज दूरवर जात हळुहळु क्षीण होत गेला तरी 'गुरूची लेक' डोळ्यासमोर कायम राहते. कबड्डी हे तीचं पहिलं प्रेम आणि बुलेट दुसरं. लहानपणापासूनच गाडीची प्रचंड आवड. लहाणपणी बाबा आपल्या CD Dawn बाईकवर बसवून तीला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जायचा. पण बाबाच्या पाठी बसताना गाड्यांचं वेड कसं लागलं हे तीचं तिलाही ठावूक नाही. मग काय मैदानावर कबड्डीचे धडे गिरवतानाच गाडी चालवण्याच्या स्वप्नाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. पण ही इतर मुलींसारखी थोडीच होती. हीची गोष्टच निराळी. activa किंवा pleasure ही तिच्यासाठी नव्हतीच मुळी.
               
     

 बाईकची प्रचंड क्रेझ. बाबाचीच गाडी ती शिकायला लागली तशी क्रेझ आणखीनच वाढली. सातवीत असतानाच बाबाची CD Dawn बाईक सफाईदारपणे पळवू लागली. गाड्या चालवायला शिकायची हौस आणखीनंच वाढली. दहावीला जिथे पोरांना परिक्षेचं, बोर्डाचं टेंशन असतं तिथे ही पोरगी four wheeler वर हात साफ करत होती. बरं हे सगळं दुसरीकडे कबड्डीचे धडे गिरवत असताना. दहावीमध्येच असताना सफाईदारपणे ती बाबाच्या मित्राची नॅनो चालवायला शिकली..तीच्या नॅनो वयापेक्षा ही झेप मोठी होती. मग तर प्रत्येकच गाडी चालवायचा छंद तीला जडला.
                       दहावीचं हे वय म्हणजे प्रेमात पडण्याचं, कोणावर तरी जीव जडण्याचं. ही पोरगीही दहावीत प्रेमात पडली. दणकट, दमदार आवाज असणाऱ्याच्या. त्याने तीला पहिल्याच नजरेत वेड लावलं. तीनं अक्षरक्ष जीव ओवाळून टाकला त्यावर. तीचा जीव जडला होता बुलेटवर. पहिल्याच नजरेत ती बुलेटच्या प्रेमात पडली. दणकट बांध्याच्या, वजन पेलवणार नाही पण बसल्यावर ऐटबाज वाटणाऱ्या बुलेटवर तीचा जीव जडला. तीचं हे प्रेम हळुहळु उमलत होतं. स्वप्नातल्या राजकुमारासारखी ती आता बुलेटवर प्रेम करत होती. आणि ते स्वप्न साकार नाही केलं तर ती गुरूची लेक कसली.
                    घरात ही सर्वात थोरली. हिच्या पाठीमागे छोटी बहिण, सर्वात शेवटी शेंडेफळ असणारा लहान भाऊ. पण गुरूसाठी म्हणजे तिच्या बाबासाठी संख्या हीच त्याचा मुलगा होता. बाबाने कधीच मुलगी म्हणून तिला वागवलं नाही. तू मुलापेक्षा कमी नाहीस असं बाबा सांगत गेला आणि सगळ्याच बाबतीत तीची भीड चेपत गेली. म्हणूनच गाडीही ती बिनधास्त चालवायची. मुलगी हे लेबल तीने झुगारून दिलं होतं. प्रयत्न केला की सगळं जमतं हा तीच्या यशाचा मुलमंत्र.
                      पण आता बुलेटचं हे प्रेम साकार करायचं होतं. बाबाशिवाय हे स्वप्न कोण साकार करुन देणार. बुलेटसाठी बाबाकडे तीने हट्टच मांडला. गुरूही आपल्या लेकीचा हट्ट न पुरवता तरच नवल. नवी कोरी काळ्या आणि सिल्व्हर रंगसंगती असलेली दमदार रॉयल एनफिल्ड बुलेट बाबानं एकेदिवशी दरवाजात आणून उभी केली. माझी बुलेट, माझ्या स्वप्नातली बुलेट, क्षणभर तीचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. स्वत:लाच तीने चिमटा काढला. स्वप्न साकार झालं होतं. बाबाकडे प्रेमाने कटाक्ष टाकून ती बुलेटवर स्वार झाली. बैठक पक्की केली, चावी फिरवली. बुलेटच्या दमदार आवाजानं ती आणखीनंच खुष झाली. खरं तर बुलेट चालवण्याची तीची ही पहिलीच वेळ. ती जड असते, पेलवायला आणि चालवायला कठीण असते हे तिच्या गावीच नव्हतं.
                        बुलेटवर बसतानाच बुलेटसारखंच भारी वाटलं. पण ती चालवताना ना हात थरथरले ना मन घाबरलं. कीक मारली आणि रस्ता पकडला. थोडा वेळ तोल साधणं कठीण गेलं, पण बुलेट काही पाडली नाही. नंतर तर सवयीने बुलेट पिसासारखी हलकी वाटू लागली. बुलेट आली तरी त्यावर बसताना तिने पारंपरिक पोषाख काही सोडला नाही. सलवार आणि पायजमा हाच बुलेटवरचा तिचा पारंपरिक वेष. हातात ग्लोव्हज नाहीत की अंगावर स्टाईल मारणारं लेदर जॅकेट नाही. बुलेटवरच क्षत्रियकुलावतंस लिहिलेलं. त्यामुळे त्यालाच साजेसा मराठमोळा वेश आणि मर्दानी आवेश. त्याचवेळी सैराट प्रदर्शित झाला होता. पण बाबाने बुलेट खूप आधी बूक केलेली. पण बुलेटची डिलिव्हरी झाली सैराटनंतर. साहजिकच लोकं तिला आर्ची म्हणायला लागले. पण हिनं आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. गुरूची लेक म्हणून. आजही लोकं तिला गुरूची लेक म्हणूनच ओळखतात.
                              बुलेटवरुन दापोली आता सवयीचं झालं होतं. आता वेळ होती दापोलीबाहेर फिरण्याची. दापोलीनंतर दुसरं आवडतं ठिकाण म्हणजे पुणे.  बुलेटवरून पहिली कूच केली ती पुण्याकडे. मग अलिबाग, महाबळेश्वर, रत्नागिरी असं सगळंच पालथं घातलं. दापोलीमध्ये जेव्हा मराठा मूक मोर्चाचं भगवं वादळ धडकलं तेव्हा जिजाऊची ही लेक आपली बुलेट घेऊन सर्वात अग्रभागी...
                         

   आता ती तिच्या Tours & Travels ची लक्झरी बसही चालवते.Tempo Traveller, Innova घेऊन सगळीकडे हिंडते. लवकरच Volvo आणि Scania बस ती चालवायला लागली तर आश्चर्य वाटायला नको. तरीही आपण काही जगावेगळं करतोय याचं तिला अप्रुप नाही. तिचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. कारण गुरूचे संस्कार खोलवर रुजलेले आहेत. स्वत:चा Tours & Travels चा व्यवसाय, स्वत:चा हॉटेल व्यवसाय ती लहान वयात समर्थपणे चालवतेय. पायात सतत भिंगरी लावून फिरते आणि रात्री बारा किंवा १ वाजताही रिकाम्या पोटी, आपल्या बुलेटवर समुद्रकिनारी कसलातरी विचार करत बसते. हे कोडं काही अजून सुटलेलं नाही.
                        पण ती फक्त बुलेट राणीच नाही आहे. बुलेट हे दुसरं प्रेम, पण तिचा ध्यास आणि श्वास कबड्डी आहे. गुरूची ही लेक ज्या आत्मविश्वासानं बुलेट चालवते. Tours & Travels चा व्यवसाय, स्वत:चा हॉटेल व्यवसाय ज्या आत्मविश्वासानं पेलते, त्यापेक्षा दुप्पट आत्मविश्वासाने ती कबड्डीच्या मैदानात उतरते. दापोली कबड्डी टीमची रेडर आणि  कॅप्टन, शिवशक्ती या व्यावसायिक संघाची अष्टपैलू खेळाडू, रत्नागिरी टीमचा हुकूमी एक्का या सर्व जबाबदाऱ्या स्वत:च्या खांद्यावर समर्थपणे पेलते.
                          कबड्डीमधल्या अष्टपैलू कामगिरीनं कमावलेल्या पदकांनी आणि विजेत्या ट्रॉफींनी तिचं घर भरून गेलंय. एवढंच काय पण रत्नागिरी जिल्हा संघाच्या सब ज्युनिअर कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदाचं शिवधनुष्य तीनं लहान वयातच पेलून दाखवलं. काही वैयक्तिक कारणांमुळे कबड्डीच्या मैदानापासून ती दूर गेली. नाहीतर महाकबड्डी लीगचे दोन्ही हंगाम तीनं आपल्या अष्टपैलू कामगिरीनं गाजवले असते  यात शंकाच नाही. हे आठवतानाही तीच्या डोळ्यातून हलकेच आसवांचे थेंब टपकतात. पण त्याच डोळ्यांत पुन्हा कबड्डीच्या मैदानावर परतण्याचा अंगारही दिसतो. अजूनही उशिर झालेला नाही. कबड्डीसाठी ती पुन्हा कंबर कसतेय. बुलेट राणी आणि गुरूच्या लेकीला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा... 

Wednesday, August 24, 2016

अग्निपथ... 



हे दृश्य तुम्हाला विचलित करेल. पण हे मढं आहे मुर्दाड प्रशासनाचं. हे दृश्य काळीज चिरून टाकतं. मन हतबल करतं. प्रशासन दगड झालंय, पगार आणि सुट्ट्या घेण्यापुरते सरकारी अधिकारी/कर्मचारी माणूस होतात. कर्तव्याच्या वेळी ते दगड बनतात. ठार दगड, त्याचंच हे जिवंत पण मेलेलं दृश्य. काहींचा अपवाद वगळून.

ओडिशामधल्या भुवनेश्वरमधला हा हतबल नवरा. सोबतीला त्याची ११ वर्षांची लेक.. तिच्या डोळ्यातले अश्रुही आता आटून गेलेयत. गरिबीनं पोळून गेलेयत. कोणास ठावूक ती किती तास रडतेय. तिला आपल्या बापाचं दु:ख बघवत नाही. स्वत:चं दुखं: ती कोणाकडे मोकळं करेल... जिच्याकडे मोकळं करायचं ती आईच जग सोडून गेली... आणि आपला गरिब बाप आईचा मृतदेह चादरीत गुंडाळून, खांद्यावरून घेऊन जातोय.

एक नाही दोन नाही तर तब्बल १०किलोमिटर हा हतबल नवरा आपल्या पत्नीचं शव घेऊन चालत होता. रात्रभर, अनवाणी, रिकाम्या पोटांनी. मनातला दुखाचा डोंगर बाजुला करुन, डोळ्यातले अश्रू आतमध्येच रोखून, गरिबीचे चटके सहन करत तो चालला होता आपल्या पत्नीचं शव घेऊन. काय वेदना झाल्या असतील, काय क्लेश झाले असतील त्याला...

कलाहंडी जिल्ह्यातल्या मेलघारामधलं हे दाम्पत्य.. अतंत्य गरिब आणि मागास जिल्हा. ४२ वर्षांची त्याची पत्नी अमंग देवी क्षयरोगानं आजारी होती. दाना माझीनं गावापासून ६० किमी दूर भवानीपत्ना जिल्हा रुग्णालयात पत्नीला दाखल केलं. तेव्हाही किती त्रास त्याला झाला असेल हे समजू शकलेलं नाही. पण शरिरानंच नाही तर मनानं खंगलेली त्याची पत्नी जास्त दिवस नाही जगू शकली.

आता ६० किमी दूर गावी पत्नीचा मृतदेह घेऊन जायचा कसा. सोबतीला कोणी नाही. खिशात पैसे नाहीत, होतं नव्हतं सगळं उपचारावर खर्च झालेलं. जिल्हा रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांसमोर, प्रशासनासमोर त्यानं हात जोडले. माझ्या बायकोचा मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी काहीतरी करा. मदत करा. पण त्या दगडांना कुठे ऐकू जातं. त्यांनी धुडकावून लावलं.

वास्तविक नवीन पटनायक यांनी फेब्रुवारीमध्येच असा गरिब लोकांसाठी महापरायणा योजना सुरू केलेली. सरकारी रुग्णालयात निधन झालेल्या गरिबांना मृतदेह घरापर्यंत कुठलंही शुल्क न घेता पोहचवण्याची ही योजना.

पण मुर्दाड प्रशासन ऐकेल, या योजनांची अंमलबजावणी करेल तरच नवल. अखेर दाना मांझीन ते केलं जे कोणालाही जमणार नाही. काळीज घट्ट करुन त्यानं पत्नीचा मृतदेह चादरीत गुंडाळला. धाय मोकलून रडणाऱ्या लेकीला सावरलं आणि त्याने गावाकडची वाट धरली. रात्रभर तो चालत होता. १० किमीची वाट त्यानं अशीच तुडवली. सकाळी जेव्हा गावकऱ्यांना हे दृश्य दिसलं तेव्हा ते हडबडले.

ओडिशा टिव्हीचा कोणीतरी तिथून जात होता. त्याने हे दृश्य पाहिलं आणि लगेच ऑफिसला फोन केला. ओडिशा टिव्हीवाल्यांनी कलेक्टरला फोन लावला. मीडियाच्या फोननंतर मग प्रशासन जागं झालं. अँम्ब्युलन्सची सोय करण्यात आली. पुढचा ५० किलोमिटरचा प्रवास अँम्ब्युलन्सने झाला. हरिश्चंद्र योजनेअंतर्गत त्याला अंत्यविधिसाठी मदत करण्यात आली. कलाहंडीच्या कलेक्टरची मदत नसती तर हे शक्य झालं नसतं.

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला जिम्नॅस्टिकमध्ये फायनल गाठून देणारी दीपा याच ओडिशाची. बघा म्हणजे तिचा प्रवासही किती खाचखळग्यांनी भरसा असेल या मुर्दाड झालेल्या प्रशासनापुढे. मग दाना मांझीची लेक काय करेल. त्याच्या लेकीला तो शिकवू शकेल का. ती काय शिकेल. ती मोठी कशी होईल. की तिचं आयुष्यही असंच होरपळून जाईल...

विधात्या तूच जर या लेकरांना असं वाऱ्यावर सोडलंस तर त्यांनी कुठं बघायचं, कसं जगायचं ???



(सौ ओडिशा न्यूज)

समीर सावंत,
सीनियर प्रोड्यूसर,
जय महाराष्ट्र न्यूज...

Monday, April 11, 2016

दुष्काळराष्ट्र



भर दुष्काळात उभं गाव ओस झालंय.. गावात माणूस शोधावा तर सापडत नाही.. करपून गेलेलं सारं शिवार... कर्जाचे खाजगी दावेदार.. खंगलेली मनं.... आशाळभूत नजरेनं आभाळाकडे लागलेले डोळे... पण तो दयाघन तरी कुठे ऐकतोय.. दुष्काळ अधिकाअधिक गडद होत चाललाय... आभाळ रूसलंय... कोरडंठाक पडलंय आणि खाली जमिनही भेगाळून गेलीय.. धरणांनी मान टाकलीय... गावं उद्ध्वस्त झालीयत... मनं उद्ध्वस्त झालीयत.. माणसंच दुष्काळामुळे भेगाळून गेलीयत...

घरात खायला तोंड फारं.. पण मागच्या दोन तीन वर्षात पोटापुरतंही पिकलं नाही.. या दुष्काळानं हातातला नांगर कधीच निघून गेलाय.. तर हातात आल्यात घागरी आणि पाण्याची भांडी... सगळं घरदार पाणी भरण्याच्या नादात थकलंय... तरीही धडपड सुरुय.. एकेका घागरीसाठी... एकेका थेंबासाठी... लोकं वणवण करतायत.. दहा दहा मैल अनवाणी... वैशाख वणव्यात होरपळत... फक्त जीवन देणा-या पाण्यासाठी... पण पाणी तरी कुठंय ते सुद्धा खोल खोल गेलंय... आणि सगळ्या आशा आकांक्षाही या खोल खोल विहिरीसारख्या आटून गेल्यायत...


गावात टँकर येतो कधी कधी... आठवड्यातून एकदा कधी दोनदा.. टँकर आला की गावात झुंबड उडते... हाती असेल नसेल ते काम टाकून लोकं टँकरमागे धावतात.. हातात पाईप घेऊन टँकरवर चढण्याचा प्रयत्न करतात... बायाबापडे, शाळकरी मुलं... सगळे पाण्यासाठी धाव घेतात..

अक्षरक्ष पाणी हिसकावून घेण्याचेही प्रकार घडतात.. महिला पुरुष असा भेदभाव न होता भांडणं सुरू होतात.. एकमेकांवर धावून जाण्याची शिव्यांची लाखोली वाहण्याचे प्रसंग घडतात.. तहान भागवण्यासाठी माणुस माणुसकीला पारखा होत चाललाय... लातूरसारख्या शहरात तर पाण्याची परिस्थिती इतकी बिकट की पोलीस बंदोबस्त लावला गेला.. 144 कलम लावलं गेलं.. पाण्याला टाळं ठोकण्याची वेळ ओढवली...

पाडव्याचा सण येऊन गेला. पण दुष्काळानं तो साजराच करता आला नाही.. आठवडी बाजार ओस पडलेयत.. कधीकाळी ग्राहकांनी गजबजलेली बाजारपेठ आज ग्राहकांसाठी तरसलीय..

रायगडच्या पोलादपूर गावात नदीच्या एका डबक्यातलं पाणी गोळा करण्यासाठी गावकरी अडीच किलोमीटर उंच खोल दरीत उतरतात.. जगण्यासाठी मरणाचा दररोज ते संघर्ष करतात... रोज मरणाच्या उंबरठ्यावरून ते पाणी घेऊन येतात..

नांदेडमध्ये पाणी भरताना टँकरखाली आलेला 13 वर्षांचा नवनाथ बागल,विहिरीत पाय घसरून मृत्युमुखी पडलेली सोलापूरची कमल असवले, बीडच्या गेवराईमधली गौरी भुसे... बीडच्याच बागपिंपळगावमधली 9 वर्षांची राजश्री कांबळे... पाणी भरण्याची कसरत करताना चिमुरड्यांचे गेलेले हे बळी... शिक्षणाच्या आखलेल्या योजनांचा या चिमुरड्यांना काय फायदा.. दुष्काळानं त्यांचं जीवन अकाली करपून गेलं..

शेतक-यांचा कणा मोडून गेलाय... पाणी भरून भरून बायका मेटाकुटीला आल्यायत.. गावातला माणून निराश हताश हतबल झालाय.. खेड्याकडे चला... कशासाठी... दुष्काळाच्या या मसणवाटेत कशाला जायचं हाच प्रश्न पडला तर नवल ते काय...

Image Courtesy - india today
Image courtesy - outlook

Monday, January 18, 2016

चॅम्पियन स्नेहल शिंदे




सन २००६...पुण्यातला स्वारगेटजवळचा शिवाजी रोड... १३ वर्षांची आठवीत शिकणारी एक मुलगी... आपल्या ताईचा हात पकडून जिजामाता हायस्कूलमध्ये प्रवेश करत होती. एका नव्या इनिंगची सुरुवात करण्यासाठी.. खरं तर गेल्या ३ वर्षांत तीने जिम्नॅस्टिकचे धडे गिरवले होते. पण तिचं मन तिथं रमत नव्हतं. तिचे वडिल अव्वल दर्जाचे बॉक्सर... त्यामुळे आपल्या लेकीनं लैला मोहम्मद अलीसारखं अव्वल बॉक्सर बनावं हे त्या वडिलांचं भाबडं स्वप्नं... पण नियतीच्या आणि तिच्या मनातही काही वेगळंच होतं. तिची ताई किशोरी शिंदे कबड्डीपटू. ताईचा खेळ ती टक लावून पाहायची... तिचंच बोट धरून कबड्डीतल्या नव्या इनिंगला सुरुवात करत होती...

आणि आज तब्बल ९ वर्षांनंतर ती पुन्हा एकदा नेहमीसारखीच जिजामाता हायस्कूलच्या प्रांगणात प्रवेश करत होती.. पण आता तिचं स्वागत होत होतं ते युद्धातून विजयी होऊन परतलेल्या रणरागिणीसारखं. तिच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात दिसत होता अभिमान. कारण त्याच चिमुरडीनं आज पटकावला होता महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च आणि मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार...

पण तरीही ही मात्र निश्चल होती. कौतूकाचा आनंदानं स्वीकार करत असतानाही तिच्या मनात कोणताही गर्व नव्हता. तिची पावलं अजूनही जमिनीवरच होती. उलट जबाबदारी वाढली होती.. त्याच जाणिवेनं तिनं कबड्डीचं किट चढवलं. मैदानाला नमस्कार केला आणि रोजच्यासारखी सरावाला सुरुवात केली.. ही गोष्ट आहे महाराष्ट्राचं कर्णधारपद भुषवलेल्या, अनेक पदकांची, बक्षिसांची कमाई केलेल्या स्नेहल शिंदेची...



वयाच्या तेराव्या वर्षी सुरु केलेल्या कबड्डीच्या प्रवासाला पुरस्काराचं कोंदण लाभलं होतं. पण या यशामागे होती... जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत... कबड्डी आणि दुखापत हे घट्ट समीकरणच... अनेक कबड्डीपटूंची कारकिर्द ऐन बहरात संपली किंवा दीर्घकाळ ब्रेक लागला... याची पुरेपूर जाणीव असल्यानंच ती कठोर सरावाला प्राधान्य देते. दररोज सकाळी ३ तास ती जिममध्ये घाम गाळते. एखाद्या पुरुष खेळाडूलाही लाजवेल असा. पण एवढंच नाही तर फिटनेससाठी तिनं जीभेवर ताबा मिळवलाय. जंक फूड, फास्ट फूड, अरबट-चरबट खाणं तिच्या डिक्शनरीत नाही. गेल्या कित्येक वर्षांमध्ये सांभाळलेलं हे पथ्यपाणी. म्हणूनच आजही कबड्डीच्या मैदानात तासन तास अटॅक करण्याची तिची क्षमता आहे.

आक्रमक रेडर ही तिची ओळख. तिचं आक्रमण असतं वाघिणीसारखं. आक्रमकपणे खोलवर चढाई करुन प्रतिस्पर्धी संघ गारद करण्यात पटाईत. पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाकडून खेळताना प्रशिक्षक राजेश ढमढेरेंच्या हाताखाली तिने कबड्डीचे धडे गिरवले. याच बाळकडूतून तयार झालेल्या या वाघिणीनं मग कबड्डीचं मैदान दणाणून सोडलं. अनेक मानाचे पुरस्कार तिनं संघाला पटकावून दिले.. याच कामगिरीमुळे राष्ट्रीय कबड्डी संघात तिला स्थान मिळालं.

मुंबईत २०१२ साली झालेल्या शिवछत्रपती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. रेल्वे संघानं फायनलमध्ये पराभव केल्यानं त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. पण तिची घोडदौड सुरुच होती..दोनच वर्षानंतर होत असलेल्या पाटण्यातल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राची धुरा तिच्यावर सोपवण्यात आली. पण दुर्दैव आड आलं. सरावादरम्यानच ती जायबंदी झाली. महाराष्ट्राच्या मुलींनी सेमी फायनलपर्यंत धडक दिली. आता समोर होता हरयाणाचा अंगानं ताकदवान असलेला संघ. मुली कमजोर पडल्या. लढाई हरण्याची चिन्ह दिसत असताना कॅप्टन स्नेहलला मैदानात उतरवण्यात आलं. दुखावलेल्या पायानं ती मैदानावर उतरली खरी. पण लढाई गमवावीच लागली. महाराष्ट्राला अजिंक्यपद पटकावून देण्याचं तिचं स्वप्न भंगलं होतं...



पण पहिल्यावहिल्या महाकबड्डी लीगमध्ये तिनं नेतृत्व दाखवून दिलं. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशननं सुरु केलेली खास महिलांसाठीची ही व्यावसायिक स्पर्धा. राजमाता जिजाऊच्या अव्वल स्नेहल शिंदेला बोली मात्र लागली चौथ्या क्रमांकाची. राजमाताच्याच नेहा घाटगेला पहिली, मुंबई उपनगरच्या अभिलाषा म्हात्रेला दुसरी, राजमाताच्याच सायली केरिपाळेला तिसरी बोली लागली. दोघींमध्ये फक्त दोन हजारांचा फरक होता. त्यावर स्नेहलची प्रतिक्रिया होती, 'बरं हाय की, माझ्यावर प्रेसचं आणि लोकांचंही जास्त लक्ष नसेल आणि अपेक्षाही'..

पण ठाणे टायगर्सच्या या वाघिणीनं प्रतिस्पर्धी संघाना लोळवलं. आक्रमणाची धुरा एकटीनं समर्थपणे पेलली. तिला जेरबंद करण्याचे सगळे प्रयत्न फोल गेले. आक्रमक रेडच्या जोरावर तीनं संघाला फायनलचं तिकीट मिळवून दिलं. पण फायनलचं आव्हान आणखी कठीण होतं. कारण प्रतिस्पर्धी बारामती हरिकेन्सच्या प्रत्यक्ष मैदानावर खेळणाऱ्या सातपैकी चार महत्त्वाच्या कबड्डीपटू होत्या राजमाताच्याच.. राजेश ढमढेरे या एकाच कोचकडून कबड्डीचं तंत्र घोटवलेल्या. जीवलग मैत्रिण पण आता प्रतिस्पर्धी संघाची कॅप्टन नेहा घाटगे, बलाढ्य रेडर स्नेहल माणिक शिंदे, ऑल राऊंडर मोनिका शिंदे आणि बचावपटू पायल घेवारे.

अटीतटीच्या युद्धात स्नेहलनं बाजी मारली. तिला रोखण्याचे मनसुबे उधळले गेले. सोनाली इंगळेच्या आणि टीमच्या साथीनं तीनं पहिल्यावहिल्या महाकबड्डी लीगवर ठाणे टायगर्सचं नाव कोरलं... ठाणे टायगर्सची ही वाघीण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरली.

एका सर्वसामान्य कुटुंबातली ही मुलगी. पण आपल्या कामगिरीच्या जोरावर कबड्डीत महाराष्ट्राचं नाव गाजवतेय. पुण्याच्या शाहू कॉलेजमधून एम.कॉम करतेय. अभ्यास, सराव आणि मॅच अशी तारेवरची कसरत करतेय. आंतरराष्ट्रीय पातळीवर तिला देशासाठी सुवर्ण कामगिरी करायचीय. त्यासाठी अनेक गोष्टींचा तिनं त्याग केलाय. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात फेसबूक, व्हॉट्सएपपासून ती दूर आहे. यापेक्षा तिच्या ध्येयाबद्दल अधिक काय बोलावं...

Sunday, August 9, 2015

#goldengirl #मराठमोळी सुवर्णकन्या

#goldengirl #मराठमोळी सुवर्णकन्या

सुवीचा आज वाढदिवस... खरं तर हा आठवडाच तिच्या आयुष्यात आनंद फुलवणारा... त्याबद्ल तिला खूप खूप शुभेच्छा. 



(सुवर्णा बारटक्के)
भारताला पहिला वहिला कबड्डी विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाचा वाटा असलेली मराठमोळी सुवर्णकन्या... आज सुवी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयामध्ये  सहाय्यक संचालक म्हणून सेवा बजावतेय... पण हा तिचा प्रवास सोप्पा नव्हता... सुवी एका दहा बाय दहाच्या खोलीत आपल्या कुटुंबासह राहायची... पण त्या खोलीतून दिसायचं शिवनेरीचं प्रसिद्ध क्रीडांगण... कबड्डीपटू होण्याची स्वप्नं तिनं इथंच बघितली... आज तिचं यश दिसतंय.. पण या यशाला किनार आहे संघर्षाची, जिद्दीची आणि मेहनतीची... सुवीची पहिली भेट झाली ती शिवछत्रपती कबड्डी स्पर्धेत... खरं तर माझी कबड्डीची ओळख झाली तीही सुवीमुळेच... प्रामाणिकपणे सांगायचं तर त्याआधी कबड्डी कधीतरी पाहिलेली होती... महिला कबड्डी विश्वचषक संघात निवड झालेल्या महाराष्ट्राच्या तिघीच... पुण्याची दीपिका जोसेफ आणि मुंबईची अभिलाषा म्हात्रे आणि सुवर्णा बारटक्के... खरं तर दीपिकावर स्टोरी करायची होती, पण दीपिका पुण्याला राहायची... तेव्हा तिच्यावर स्टोरी करणं शक्य नव्हतं... मग राहिल्या सुवर्णा आणि अभिलाषा... त्यात सुवर्णाची असाईनमेंट माझ्याकडे... आणि याच असाईनमेंटनंतर मीसुद्धा कबड्डीकडे वळलो.. तिची कहाणी संघर्षाची होती... शिवछत्रपती चषक कबड्डी स्पर्धेची फायनल... 



समोर होता रेल्वेचा बलाढ्य संघ... ममता पुजारीच्या नेतृत्वाखाली खेळणारा... पण दडपण होतं ते महाराष्ट्राच्या संघावर... कारण रेल्वेकडून पराभव स्वीकारण्याची परंपरा कायम होती... पण हा इतिहास बदलण्याचा निर्धार करून सुवी मैदानात उतरली... डोक्यावर सफेद रंगाचा बँड... केसाचा पोनीटेल बांधलेला.. तिचा आवेश जबरदस्त होता... टीममध्ये होत्या स्नेहल साळुंखे, दीपिका जोसेफ, हर्षला मोरे तेव्हाच्या ज्युनियर स्नेहल शिंदे आणि नेहा घाटगे... 



(छत्रपती शिवाजी चषकमधला महाराष्ट्राचा संघ - डावीकडून दीपिका जोसेफ, सुवर्णा बारटक्के, उजवीकडून नेहा घाटगे, स्नेहल साळुंखे, खाली बसलेल्या उजवीकडून पहिली हर्षला मोरे, मधोमध बसलेली स्नेहल शिंदे)

संघर्ष झाला... दोन्ही टीम त्वेषानं खेळल्या... पण ममता पुजारी आणि अभिलाषा म्हात्रेच्या रेल्वेनं महाराष्ट्राला पुन्हा पराभवाची धूळ चारली.. त्या पराभवाचं शल्य सुवीच्या कायम मनात होतं.. पराभवानंतर तिचे डोळे डबडबून आले.. पण त्या अश्रूंमध्ये होता अंगार... खचून न जाण्याचा...


आणि काही काळानंतर हीच सुवी रवाना होत होती पहिल्या वहिल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी... त्या निमित्तानं तिची स्टोरी करायची होती... शिवनेरी क्रीडा मंडळाच्या शेजारचीच इमारत शिवनेरी... देशाचं प्रतिनिधित्व करणारी ही चॅम्पियन राहात होती दहा बाय दहाच्या खोलीत... सुवीच्या कर्तृत्वाच्या पोचपावती असलेल्या ट्रॉफी ठेवालयाही घरात जागा नव्हती.. पण तिच्या स्वप्नांना ते रोखू शकत नव्हतं... संघर्षातून, दुखापतींचा सामना करत ती जिद्दीनं खेळत होती... आणि आज ती देशाचं प्रतिनिधित्व करायला रवाना होत होती...


अपेक्षेप्रमाणे सुवर्णासह दीपिका आणि अभिलाषानं देशाला सोनेरी यश मिळवून दिलं... 


(भारतीय टीमची कर्णधार ममता पुजारी, मराठमोळी सुवर्णकन्या सुवर्णा बारटक्के)

सुवर्णासह सर्वांचंच जल्लोषात स्वागत झालं... तरीही सुवीचा संघर्ष संपला नव्हता... सरकारनं नोकरीचं आश्वासन दिलं... पण त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पूर्ण करायची होती.. सुवर्णानं हे आव्हान स्वीकारलंही आणि पूर्णही केलं...


सुरुवातीला कॅमे-यासमोर लाजणारी सुवी आज आत्मविश्वासानं कॅमे-यासमोर बोलते... तिला आता सूचना द्याव्या लागत नाहीत... कारण आधी ती खूप लाजायची.. काय बोलायचं असं मलाच विचारायची... 'लक्ष्मणरेषा' या झी मराठीच्या सीरियलमध्ये तिने काम केलं होतं... तरीही कॅमे-यासमोर तिला आत्मविश्वास नव्हता... खूप गोंधळायची.. पण आज तिची सगळी भिड चेपलीय.. तिची ही प्रगती सुखावह आहे... कारण पुढच्या काळात तिला कबड्डी कॉमेंटेटरचं ऑप्शन खुलं आहे...


सुवीला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.. तिचं ते स्वप्नसुद्धा साकार झालं..


(क्षण अभिमानाचा, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार स्विकारताना)

आज ती क्रीडा विभागात एका चांगल्या पोस्टवर काम करतेय, पण तिच्यातली कबड्डी खेळाडू अजूनही जीवंत आहे.. तिनं खूप मोठं व्हावं... तिच्या पदाचा, तिच्या अनुभवाचा उद्योन्मुख खेळाडूंना फायदा व्हावा हीच अपेक्षा... सुवी एक उत्तम खेळाडू आणि खूप छान मैत्रीण आहे... पण त्याहीपेक्षा सुवीमुळेच मला आणखी एक जीवलग मैत्रीण मिळाली... venus...



(डावीकडून अभिलाषा म्हात्रे, सुवर्णा बारटक्के, मी आणि दीपिका जोसेफ)

या #goldengirl ला खूप सा-या आभाळभर शुभेच्छा... 

Sunday, June 14, 2015

#champion #snehalshinde

















दोन जिवलग मैत्रिणी,
दोन पुणेकर,
दोन्ही कॅप्टन्स,
दोन्ही यशस्वी रेडर्स,
राजमाता जिजाऊ या एकाच क्लबकडून खेळणाऱ्या,
राजेश ढमडेरे या एकाच कोचकडून कबड्डीचं तंत्र घोटवलेल्या,
प्रतिस्पर्धी संघाला लोळवण्याची क्षमता असलेली आक्रमक स्नेहल शिंदे,
तर नेहा घाडगे आहे शांतपणे बाजी पालटण्यात हुश्शार,
स्नेहलच्या डोळ्याला तर नेहाच्या गुडघ्याला दुखापत,
तरीही वाघिणीसारख्या प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडणाऱ्या,

एक आहे ‪#‎champion‬ ‪#‎snehalshinde‬

तर दुसरीकडे लीगमधली सर्वात महागडी कबड्डीपटू Neha Ghadge

मैत्रिणी असल्या तरीही आता आमनेसामने उभ्या राहतील प्रतिस्पर्धी कॅप्टन्स म्हणून

कोण मारणार बाजी, कोण पटकावणार पहिलावहिल्या महाकबड्डी लिगच्या विजेतेपदाची ट्रॉफी

याचा फैसला उद्या रविवारी संध्याकाळी ७ वाजता

तरीही सर्वात जास्त आव्हान #snehalshinde समोर
कारण समोर बारामतीपेक्षा उभ्या ठाकतील स्नेहल माणिक शिंदे, मोनिका शिंदे, पायल घेवारे या राजमाता जिजाऊच्याच मैत्रिणी

#champion #snehalshinde हे आव्हान परतवू शकेल?

पण एक मात्र खरं कबड्डीचाहत्यांना रोमांचक मॅच पाहायला मिळेल हे खरं

सर्वच कबड्डीपटू आणि टीम मेंबर्सना all the best
Harshala More

मी मात्र ‪#‎thanetigers‬ च्या बाजूने

 — feeling excited