पावसाची नुकतीच जोरदार सर येऊन गेलेली. दादरच्या व्यस्त रेल्वे
स्थानकाबाहेरच्या मार्केटमध्ये नेहमीचीच गर्दी ओसंडून वाहत असलेली. शेजारच्याच
मामा काणे हॉटेलमधून गरमागरम थालीपिठं आणि बटाटावड्याचा खमंग सुवास नाकातून थेट
जिभेवर रेंगाळणारा... त्यामुळे नेहमीप्रमाणेच गिऱ्हाईकांची पावलंही मामा काणेकडे
आपसूकच वळत होती. पाऊस पडून गेल्यानं गिऱ्हाईकांची वर्दळ जरा जास्तच वाढलेली. त्याचदरम्यान
लागूनच असलेल्या मामा काणे हॉलबाहेरही हळुहळु गर्दी वाढत होती.
‘घरबसल्या
कमवा’ अशी जाहिरात घेऊन विविध वयोगटांतली, विविध
स्तरातील स्त्री-पुरुष, मुलं-मुली, रांगेत उभे होते. प्रत्येकाची नावनोंदणी सुरु
होती. ब्लेझर घातलेल्या दोन-चार चुणचुणीत मुली प्रत्येकाचं स्वागत करत होत्या. Work from Home असा बिल्ला प्रत्येकीच्या
ब्लेझरवर लावलेला. छातीत धडधड, उत्सुकता अशा अवस्थेत प्रत्येकजण रांगेत हॉलमध्ये
पुढे सरकत होता. तिथंही ब्लेझरमधल्या, सुटाबुटातल्या मुली प्रत्येकाला आग्रहानं
आणि शिस्तीनं खुर्चीत बसवत होत्या.
मुख्य कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होते. सुटाबुटातलीच पण अनुभवी
असणारी एक मुलगी कंपनीबद्दलची माहिती द्यायला सुरुवात करते. ‘जगभरात ८९ देशांमध्ये
आमची कंपनी सध्या व्यवसाय करते’. प्रत्येकजण टक लावून आणि कान
देऊन माहिती ऐकतोय. थोड्याच वेळानं त्याच सुटाबुटातल्या मुली पुढे येऊन प्रत्येकजण
आपलं सध्याचं उत्पन्न, किती फायदा झाला याची माहिती देऊ लागतात. आलेल्या
लोकांमध्ये मात्र चुळबुळ वाढलेली. काहींना कंटाळा आलेला. त्यामुळे नुसतंच इथं तिथं
पाहणं चाललेलं. ‘कधी
संपणार हा कार्यक्रम’ अशी भावनाही मनात येऊ लागलेली.
कार्यक्रम सुरु होऊन अर्धा तास होऊन गेलेला. समोर सुटाबुटात येणारी प्रत्येक
व्यक्ती मात्र एकच वाक्य सारखं सारखं घोटून सांगतेय. शेवटच्या दहा मिनिटांत अशी एक
व्यक्ती इथं येणार आहे, जी तुमच्या आयुष्याला नवीन वळण लावेल.
हॉलमध्ये
जमलेली प्रत्येक व्यक्तीच त्यामुळे अखेरच्या दहा मिनिटांची वाट बघत बसलेली... अखेर
ती दहा मिनिटांची वेळ येऊन ठेपते. टाळ्यांचा जोरदार कडकडाट होतो. सुटाबुटातली, लग्न
झालेली पस्तिशीची एक देखणी स्त्री हातात माईक घेऊन सगळ्यांचंच स्वागत करते.
Hello Friends!
केसांचा
पोनीटेल, कॉरपोरेट प्रेसिडंटला साजेशा असा सुट. कपाळाच्या मध्यभागी भांगामध्ये
सौभाग्याची हलकीशी खुण, गळ्यात साताजन्माचं लायसन्स. चेहऱ्यावर मंदसं स्मित. हावभाव,
बोलणं-चालणं मात्र घरंदाज स्त्रिसारखं. भितीचा साधा लवलेशही चेहऱ्यावर नाही. उलट
बोलण्या-चालण्यातून प्रचंड आत्मविश्वास झळकत असलेला.
Welcome Friends!
माझं नाव सिद्धी...
पावसाची एक जोरदार सर येऊन रस्त्यावरची सारी धुळ वाहून जावी,
पाना-फुलांमध्ये नवी जान यावी तशी जमलेल्या लोकांमधली मरगळ क्षणार्धात नाहीशी
झालेली. सगळ्या लोकांचे डोळे आणि कान तिच्याचकडे लागलेले. मराठी, हिंदी आणि
इंग्लिश या तीनही भाषांचा सुंदर मिलाफ करून अवघ्या दोनच मिनिटांत ती हॉलमधल्या
साऱ्याच लोकांवर भुरळ पाडण्यात यशस्वी होते. ती पुढे काय बोलणार याचीच उत्सुकता
आता साऱ्यांनाच लागलेली.
‘धंदा
करणं किंवा व्यवसाय करणं, हे मराठी माणसाचं काम मुळीच नाही. तो करावा तर फक्त
गुजराती आणि मारवाड्यांनीच. मराठी माणसांचा हा पारंपरीक गैरसमज’. पोटतिडकीनं ती सांगत असते. टीका करणं हा हेतू नाही तर मराठी माणसांमधला
व्यवसायाबद्दलचा गैरसमज आणि दृष्टिकोन बदलावा हा तीचा प्रामाणिक विचार. खरं तर
तीसुद्धा एका मराठी मध्यमवर्गीय घरांतूनच आलेली. पण व्यवसायात फक्त तीन वर्षातली
तीची भरारी तोंडात बोटं घालायला लावणारी.
शालेय शिक्षण
इंग्रजी माध्यमातून झालेलं. पुढे पदवी शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयाची वाट
धरलेली. पण शिक्षणापेक्षा इतर चळवळींतच हिरीरीनं भाग घेतलेला. त्यामुळे ATKT ची शिडी लावून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं.
घरात त्यावरून सततचे टोमणे बसणारे. कालांतरानं पोटासाठी नोकरीची वाट धरली.
रितीरीवाजाप्रमाणे लग्नही पार पडलेलं. संसाराचा गाडा हाकताना नोकरीत मात्र मन रमत
नव्हतं. काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आणि त्यासाठी धडपड चाललेली. पण काय करावं
याचा मार्ग सापडेना. काही नवीन करावं तर घरातल्यांचा पाठिंबा नाही. कंपनीत राब राब
राबूनही मनासारखी पगारवाढ किंवा पदोन्नती नाही. त्यामुळे सतत नोकरी बदललेली. कंपनी
बदलली तरी प्रत्येक वर्षी येरे माझ्या मागल्या हीच गत.
‘इतकी
वर्ष नोकरी करताय, पगारवाढ किंवा पदोन्नती तुमच्या मर्जीप्रमाणे किंवा तुमच्या
मनाप्रमाणे मिळते?’ समोर जमलेल्या लोकांना
तीनं थेट जळजळीत सवाल विचारलेला. ‘मग तुम्हांला
ही परिस्थिती बदलायची आहे की नाही?’ बेधडकपणे
दुसरा सवाल येऊन प्रत्येकाच्या मनावर आदळून त्यांना खोलवर विचार करण्यास भाग
पाडणारा...
कंपनीत नोकरी करताना तिलाही सतत हाच प्रश्न भेडसावलेला. संसारवेलीवर ओम नावाचं गोड फळ लागलेलं. त्यामुळे जबाबदारी आणखीनंच वाढलेली. ऑफिसमधली जबाबदारी,
गृहकर्तव्य आणि एक आई अशी तिहेरी जबाबदारी पेलताना कसरत व्हायची. रात्री
झोपण्यापूर्वी किंवा सतत दिवसाही डोक्यात एकाच प्रश्नाची भूणभूण. काहीतरी स्वत:चं करायचं आहे. नोकरीतल्या गुलामगिरीतले साखळदंड
तोडायचे होते, पण त्याची किल्ली काही सापडत नव्हती. मनात विचारांचा कल्लोळ
दाटलेला. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाटच मिळत नव्हती. पण सातत्यानं धडपड
मात्र चाललेली.
‘आमच्या
कंपनीच्या संस्थापकानं एका गाडीच्या डिकीतून या व्यवसायाची सुरुवात केली.’ समोरच्या लोकांना ती आत्मविश्वासानं सागंत होती. त्यामुळे लोकांची
उत्कंठा आणखीनंच वाढलेली. आपणही हेच वाक्य सामंत बाईंच्या तोंडून ऐकलेलं. तीन
वर्षांपूर्वी मीसुद्धा अशीच लोकांमध्ये बसलेली होती. छकुल्याला पोटाशी कवटाळलेलं.
ते गुणी बाळंही आपल्या कुशीत शांतपणे पहुडलेलं. आपलं सारं लक्ष मात्र सामंत बाईंच्या बोलण्याकडे लागलेलं. उत्सुकता, भिती, धास्ती यांचा मनात वेगळाच संगम
झालेला. खरंच हे शक्य आहे का? मी स्वत: हे करु शकेन का? किती मिळणार या सर्व धडपडींतून? एकटीला जमेल हे सारं? घरचे काय म्हणतील? मदत करतील का? अशा अनेक प्रश्नार्थक
विचारांनी डोकं ठणकायला लागलेलं. सामंत बाई मात्र आत्मविश्वासानं ‘घरबसल्या कमवा’वर जोर देत होत्या.
उच्चशिक्षीत, चांगल्या हुद्द्यावर कार्यरत असणाऱ्या सामंत बाई सांगत आहेत म्हणजे
नक्कीच काहीतरी असणार. करुन बघायला काय हरकत आहे.
‘अगं कसलं खुळ डोक्यात घेतलं आहेस? वेड बिड तर लागलं नाही ना तुला?’ आईच्या शब्दांनी सगळ्या उत्साहावर पाणी फेरलेलं. आईनं सपशेल विरोध
दर्शवलेला, तर नवऱ्यानं हात वरती केलेले. ‘तुला काय करायचं ते कर’, अगं एवढी मोठी रक्कम उभी करायची
म्हणजे खाऊ आहे का? आपल्याच माणसांनी असा आधार काढून घेतलेला. मन सैरभैर झालेलं.
उसवलं गणगोत सारं, आधार कुणाचा नाही...
पण काहीही करून आता या व्यवसायात उतरायचंच हा निर्धार. सर्वांना दाखवून
द्यायचं की मीसुद्धा व्यवसाय करू शकते. कठीण वाट तर धरली होती, आता या वाटेवर
चालायचं तर विरोधाच्या, अडथळ्यांच्या काट्यांनी पाय रक्तबंबाळ होणं साहजिकच होतं.
पण थांबायचं नाही या निर्धारानं वाटचाल करणं आवश्यक होतं.
मनात कितीही मांडे खाल्ले तरी वास्तवाचे चटके वेगळेच असतात. काहीही करुन
दाखवण्याचा मनात निर्धार असला तरी पैशाचं सोंग मात्र घेता येत नाही. लाखभराची
रक्कम उभी करायची म्हणजे खायचं काम नव्हतं. पण करायचं ठरलं म्हणजे करायचंच ही
जिद्द कायम होती. मुलाच्या नावानं पै-पैनं जमा केलेली फिक्स्ड डिपॉझिट मोडीत
काढली. स्वत:चे दागिने गहाण टाकले. आपला व्यवसाय यशस्वी केला तर असे छपन्न दागिने घेता
येतील ही खुणगाठ मनाशी बांधलेली. व्यवसायासाठी रकमेची व्यवस्था तर झाली, पण
व्यवसाय करण्याचा कोणताच अनुभव गाठीशी नाही.
नोकरी करणं आणि शून्यातून स्वत:चा व्यवसाय उभं करणं यात जमीन-अस्मानाचा फरक.
बोललात तर वाळुही विकली जाते नाहीतर सोन्यालाही कोणी विचारत नाही. जिद्द, निर्धार,
संभाषणकला याची सवय करून घ्यायला हवी. घरच्यांचा प्रचंड विरोध पत्करून व्यवसायात
उडी घेतलेली. पावसापाण्याची, थंडी-वाऱ्याची, उन्हातान्हाची पर्वा न करता रेल्वे
स्थानकांच्या परिसरात, रहदारीच्या ठिकाणी स्वत: उभं
राहून जाहीरातींचे पोस्टर्स वाटलेले. सुरुवातीच्या दिवसांत कसलाच प्रतिसाद आला
नाही. मन निराश होऊ लागलं होतं. खरंच आपण करतोय ते योग्य आहे का अशी चिंता सतत
वाटायची. पण हळुहळु चौकशीचे फोन येऊ लागले. कधी दिवसा तर कधी रात्री-अपरात्रीही
फोन यायचे. फोनवरची प्रत्येक व्यक्ती चांगलीच असेल याची खात्री नाही. पण
निर्धारानं सर्व कटु प्रसंगाना तोंड दिलेलं. सामंत बाईंचा खंबीर हात पाठीवर होता.
चुकल्यास प्रसंगी त्या कान पकडायलाही कमी करायच्या नाहीत.
प्रचंड धडपड, अहोरात्र मेहनतीला हळुहळु रंग येऊ लागला. व्यवसायानं बाळसं
धरलं. आत्मविश्वास दुणावला. मग दुप्पट वेगानं परिश्रम घ्यायचा हुरुप आला. कारवाँ
बढता गया. तीन वर्षांपूर्वी SR. Consultant लेव्हलवरुन सुरुवात केलेली. टप्प्याटप्प्यानं
सुपरवायझर लेव्हल गाठली. हातात बऱ्यापैंकी पैसा खुळखुळु लागला. सुपरवायझरवरुन मग Work Team, GET Team अशी
भरारी घेतली. कंपनीच्या सहकार्यानं कुटुंबासोबत परदेशवारीही घडवून आणली. विरोधाचा
सूर आता मावळत होता, उलट पाठीवर कौतूकाची थाप पडत होती. कुटुंबियांच्या डोळ्यात
आता अभिमान दिसत होता. अखेर मग मिलेनियर टीममध्ये धडक दिली. हे सगळं स्वत:च्या मेहनतीवर, कष्टांवर
आणि आत्मविश्वासाच्या बळावर... स्वत:च्या हिमतीवर मुंबईत फ्लॅट तोही रोख रक्कम मोजून घेतला. नवऱ्याला स्वत:च्या कमाईनं नवी कोरी
चारचाकी गाडी विकत घेऊन दिली.
‘मग तुम्हींसुद्धा स्वत:चा व्यवसाय सुरु करणार ना?’
तीच्या या प्रश्नाला हॉलमधल्या सर्वांनीच एकसुरात आणि उच्चस्वरात ‘हो’ अशी दाद दिलेली.
एका
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धीनं घेतलेली ही भरारी खरोखरच वाखाणण्यासारखी.
समोरच्या जमलेल्या लोकांमध्येही एक आत्मविश्वास निर्माण झालेला. आपणही आपल्या
पायांवर उभं राहून स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकतो हे बळ आलेलं. ‘घरी बसून कमवा’ ही व्यवसायाची फक्त जाहिरात
नसून तो यशस्वीपणे करता येतो हे तीनं सप्रमाण सिद्ध करुन दाखवलेलं.

No comments:
Post a Comment