तुझ्या सहवासाच्या आठवणींनी भरलेल्या पोळ्याला,
मी कधी चुकूनही दगड मारण्याची हिम्मत करत नाही...
कारण मग त्या आठवणींच्या असंख्य मधमाशा घोंगावून तुटून पडतात...
मनावर असंख्य डंख मारत राहतात, एकटेपणाचे...
संथ खोल पाण्यात दगड मारल्यावर...
उठणाऱ्या तरंगांसारख्या त्या हेलकावतात...
मुद्दाम बंद करून घेतलेला दरवाजा उघडल्यावर
फडफडत उडणाऱ्या पाकोळ्यांसारख्या त्या फडफडतात...
उधाणलेल्या समुद्रातल्या लाटांसारख्या त्या गर्जत राहतात,
आणि शांत झाल्यावर किनाऱ्यावर येऊन फुटून जातात...
पण तरीसुद्धा त्या आठवणी अंतकरणात साठून राहतात,
कधी तुझ्या प्रेमाची फुंकर घालून जातात,
कधी या निराशेच्या वादळातही,
तुझ्या आधाराचा हळुवार स्पर्श देऊन जातात...
माझ्या तापलेल्या मनावर,
तुझ्या प्रेमाची हलकेच बरसात करून जातात...
माझ्या तळहातावर, गालांवर...
तू दिलेल्या प्रेमाचे आठवण थेंब,
हलकेच माझ्या डोळ्यांतून बरसत राहतात...
म्हणूनच मी माझ्या मनाला
तुझ्या आठवणींच्या सहवासात कधीच पाठवत नाही...
कारण तुझ्या आठवणींत एकदा गुंतल्यावर...
पुन्हा परत यावसंच वाटत नाही....

No comments:
Post a Comment