Monday, April 11, 2016

दुष्काळराष्ट्र



भर दुष्काळात उभं गाव ओस झालंय.. गावात माणूस शोधावा तर सापडत नाही.. करपून गेलेलं सारं शिवार... कर्जाचे खाजगी दावेदार.. खंगलेली मनं.... आशाळभूत नजरेनं आभाळाकडे लागलेले डोळे... पण तो दयाघन तरी कुठे ऐकतोय.. दुष्काळ अधिकाअधिक गडद होत चाललाय... आभाळ रूसलंय... कोरडंठाक पडलंय आणि खाली जमिनही भेगाळून गेलीय.. धरणांनी मान टाकलीय... गावं उद्ध्वस्त झालीयत... मनं उद्ध्वस्त झालीयत.. माणसंच दुष्काळामुळे भेगाळून गेलीयत...

घरात खायला तोंड फारं.. पण मागच्या दोन तीन वर्षात पोटापुरतंही पिकलं नाही.. या दुष्काळानं हातातला नांगर कधीच निघून गेलाय.. तर हातात आल्यात घागरी आणि पाण्याची भांडी... सगळं घरदार पाणी भरण्याच्या नादात थकलंय... तरीही धडपड सुरुय.. एकेका घागरीसाठी... एकेका थेंबासाठी... लोकं वणवण करतायत.. दहा दहा मैल अनवाणी... वैशाख वणव्यात होरपळत... फक्त जीवन देणा-या पाण्यासाठी... पण पाणी तरी कुठंय ते सुद्धा खोल खोल गेलंय... आणि सगळ्या आशा आकांक्षाही या खोल खोल विहिरीसारख्या आटून गेल्यायत...


गावात टँकर येतो कधी कधी... आठवड्यातून एकदा कधी दोनदा.. टँकर आला की गावात झुंबड उडते... हाती असेल नसेल ते काम टाकून लोकं टँकरमागे धावतात.. हातात पाईप घेऊन टँकरवर चढण्याचा प्रयत्न करतात... बायाबापडे, शाळकरी मुलं... सगळे पाण्यासाठी धाव घेतात..

अक्षरक्ष पाणी हिसकावून घेण्याचेही प्रकार घडतात.. महिला पुरुष असा भेदभाव न होता भांडणं सुरू होतात.. एकमेकांवर धावून जाण्याची शिव्यांची लाखोली वाहण्याचे प्रसंग घडतात.. तहान भागवण्यासाठी माणुस माणुसकीला पारखा होत चाललाय... लातूरसारख्या शहरात तर पाण्याची परिस्थिती इतकी बिकट की पोलीस बंदोबस्त लावला गेला.. 144 कलम लावलं गेलं.. पाण्याला टाळं ठोकण्याची वेळ ओढवली...

पाडव्याचा सण येऊन गेला. पण दुष्काळानं तो साजराच करता आला नाही.. आठवडी बाजार ओस पडलेयत.. कधीकाळी ग्राहकांनी गजबजलेली बाजारपेठ आज ग्राहकांसाठी तरसलीय..

रायगडच्या पोलादपूर गावात नदीच्या एका डबक्यातलं पाणी गोळा करण्यासाठी गावकरी अडीच किलोमीटर उंच खोल दरीत उतरतात.. जगण्यासाठी मरणाचा दररोज ते संघर्ष करतात... रोज मरणाच्या उंबरठ्यावरून ते पाणी घेऊन येतात..

नांदेडमध्ये पाणी भरताना टँकरखाली आलेला 13 वर्षांचा नवनाथ बागल,विहिरीत पाय घसरून मृत्युमुखी पडलेली सोलापूरची कमल असवले, बीडच्या गेवराईमधली गौरी भुसे... बीडच्याच बागपिंपळगावमधली 9 वर्षांची राजश्री कांबळे... पाणी भरण्याची कसरत करताना चिमुरड्यांचे गेलेले हे बळी... शिक्षणाच्या आखलेल्या योजनांचा या चिमुरड्यांना काय फायदा.. दुष्काळानं त्यांचं जीवन अकाली करपून गेलं..

शेतक-यांचा कणा मोडून गेलाय... पाणी भरून भरून बायका मेटाकुटीला आल्यायत.. गावातला माणून निराश हताश हतबल झालाय.. खेड्याकडे चला... कशासाठी... दुष्काळाच्या या मसणवाटेत कशाला जायचं हाच प्रश्न पडला तर नवल ते काय...

Image Courtesy - india today
Image courtesy - outlook

No comments:

Post a Comment