बुधाजी
खंडू बोरसे
हे
नाव म्हणजे अगदी जेम्स बॉण्डच्या थाटात घेईल असंच. माय नेम इज, बोरसे... बुधाजी खंडू बोरसे...
अग्निपथमधल्या विजय दिनानाथ चौहानच्या स्टाईलने बोलावं तर, है साला मेरा नाम
बुधाजी खंडू बोरसे. बापका नाम खंडू. पढानेको नंदादीप हायस्कूल हाय... जानता है
कितना साल पढा रहा हुँ... है साला... बुधाजी खंडू बोरसे सर हे अगदी अजब रसायन होते.
पण ते जीवशास्त्र शिकवायचे. शाळेतल्या इतर शिक्षकांची पुर्ण नावं कधीच लक्षात
राहिली नाहीत. पण यांचं नाव मात्र पुर्णपणे लक्षात राहीलं.
अगदी
लक्षात रहावं असं वरकरणी तरी त्यांच्याकडे काहीच नव्हतं. बुटकी मुर्ती. किरकोळ
बांधा. गोरे गोमटे असे बोरसे सर. कुरळ्या केसांचे पण कपाळावरचे पुढचे आणि
आजुबाजुचे केस उडून गेलेले. डोळ्यावर नव्वदीच्या काळातला तो काळ्या फ्रेमचा चश्मा...
त्या चश्म्यातली ती घारीसारखी बेरकी नजर. त्या नजरेतून मात्र काहीच सुटायचं नाही.
कोण मस्ती करतोय, कोण दंगा करतोय, कोणाचं अभ्यासात लक्ष नाही, कोण जांभई देतंय हे त्यांच्या चाणाक्ष
नजरेतून कधी सुटलं नाही...
कुरळ्या
केसांवर तेल घालून चप्पु केलेला. त्यातून एक बट पुढे यायची. पण याच तेलानं डोकं
मात्र सुपिक बनलेलं. कपाळावरचं तेल झिरपून बुद्धी कशी कुशाग्र झालेली. आणि याच
बुद्धीनं नंदादीपमधल्या अनेकांना विज्ञान शिकवलं. ते शिकवायचे भारी, पण जीवशास्त्र शिकवता शिकवता जीवही
काढायचे. म्हणूनच त्यांचं टोपण नाव होतं हिटलर.
आजही
हिटलर म्हटलं की दोनच व्यक्ती आठवतात. एक प्रत्यक्ष जर्मनीचा हुकुमशहा अॅडॉल्फ
हिटलर... आणि दुसरे पोरांच्या कानाखाली जाळ काढणारे आमचे जीवशास्त्राचे बोरसे सर.
कानाखाली जाळ काढणं हा वाकप्रचार आमच्या बॅचमधल्याच काय, त्याआधी आणि त्यानंतरही अनेकांनी
प्रत्यक्ष अनुभवला असेल तो बोरसे सरांकडून. अगदी मीसुद्धा त्याला अपवाद नाही.
आठवीची
तिमाही संपली होती. त्यानंतर प्रयोगवही तपासण्याचं काम सुरु होतं. माझी प्रयोगवही
मात्र अपुर्णच होती. मॉनिटर असूनही प्रयोगवही अपुर्ण असणं मोठाच गुन्हा होता.
त्याकाळी मास्तर बसायचे तिथे स्टेज असायचा. मास्तरांच्या बाकाकडे गेलो. सगळ्या
पोरांसमोर आपली निघणार हे मनात ठरवलं. आणि मग जो काय कानाखाली जाळ निघाला तो
अजूनही लक्षात आहे. ते वळ अजूनही कधीतरी आठवतात. चुरचुरतात देखील. शाळेच्याच नाही
संबंध आयुष्यात पहिला आणि अखेरचा मार त्यांच्याचकडून खाल्लेला.
कानाखाली
जाळ काढणारे बोरसे सर 'लक्ष्य'वेधीसुद्धा होते बरं का! त्यांना खरं तर नेमबाजी किंवा तिरंदाजीला
पाठवायला पाहिजे होतं. कारण पोरानं जांभई दिली किंवा आळस दिला रे दिला की ते खडू अचूक
फेकून मारायचे. झोप कुठच्या कुठे उडून जायची. पण कडक शिस्तीचे बोरसे सर
अभ्यासाच्या बाबतीतही तेवढेच आग्रही होते. पोरांनी खूप शिकावं यासाठीच त्यांची
तळमळ असायची.
भौतिक, रसायन किंवा अगदी जीवशास्त्र... निरस
वाटणारं विज्ञान ते तळमळीने शिकवायचे. शाळेत विज्ञान प्रत्येकालाच आवडायचं असं
नाही, त्यामुळे ते खूप गमतीही करत. म्हणजे
हिटलरने धम्माल मज्जा करायची हे पचायला जरा जडच जातं. पण बोरसे सर दोन विरुद्ध
टोकांचे होते. म्हणजे हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांचं ते मिश्र रसायन होतं... त्यांची
मिशीही अगदी चार्ली चॅप्लिन आणि हिटलरच्या मिशीचं मिश्रण असल्यासारखी होती... ती
छोटीसी मिशी त्यांची वेगळी ओळख होती.. हिटलरसारखे अगदी हुकूमशहा वाटतील असे कडक
शिस्तीचे बोरसे सर, चार्ली चॅप्लिनसारखी मस्करी करुन पोरांना तेवढेच हसवायचे..
मुलांना
घडवणं हा त्यांचा ध्यास होता. म्हणूनच कडक शिस्तीचे आणि तेवढेच मस्करी करणारे
बोरसे सर, ही दोन्ही रुपं एकाच व्यक्तीमध्ये पाहायला
मिळत. पण ते तेवढेच नीटनेटकेही होते.. अर्ध्या बाह्यांचा म्हणजे हाफ शर्ट,
त्याखाली अंगाला मापात बसेल अशी पँट.. त्यांना कधी अघळपघळ असे कपडे घालून आलेलं
कधी पाहिलंच नाही.. केसही फणीने व्यवस्थित बसवलेले असायचे... पण स्वत: नीटनेटके राहणारे बोरसे सर
विद्यार्थ्यांनाही नीटनेटके ठेवण्यात आग्रही असत.. त्यांच्या खिशात नेहमी फणी
असायची.. विद्यार्थ्यांनाही ते दफ्तरात स्वत:जवळ
फणी आणि छोटासा आरसा ठेवा असं सांगत..
आज
मुलाखतीला जाताना किंवा बाहेरही जाताना बोरसे सरांचा हा सल्ला किती योग्य होता हे
कळतं.. ती सवय त्यांनी विद्यार्थीदशेपासूनच लावली होती. जेव्हा मुलाखतीला जाताना नीटनेटकं
कसं राहावं हे सांगणाऱ्या इंटरनेटवरच्या हजारो वेबसाईट्स नव्हत्या किंवा यु
ट्युबचे व्हिडिओदेखील नव्हते, तेव्हा बोरसे सरांनीच नीटनेटकेपणाचं महत्त्व दाखवून दिलेलं. शाळेत
असताना मात्र ते कधीच कळले नाहीत.. अनेकांना ते हिटलर वाटत असतील, पण अनेक विद्यार्थ्यांना त्यांनीच
विज्ञानाची गोडी लावली.
बोरसे
सरांनी विद्यार्थ्यांमध्ये कधी भेदभाव नाही केला. हुश्शार आणि ढ विद्यार्थी
त्यांना एकसारखेच होते. चूक केली की दोघांच्याही कानाखाली जाळ निघायचा. मारायला ते
जराही मागेपुढे बघत नसत.. पण त्या काळात शिक्षकानं विद्यार्थ्यावर हात उचलला अशी
ब्रेकिंग न्यूजची प्रथाही नव्हती. कारण शिक्षक जे काही करत ते विद्यार्थ्यांना
घडवण्यासाठी. वर्गात न शिकवता फक्त खासगी क्लासमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची जमात
अजून अस्तित्वात आली नव्हती.
विज्ञान
प्रदर्शनात सहभाग घ्यायला त्यांनीच मला भाग पाडलेलं... एकतर समाजसेवेच्या नावाखाली
निघणाऱ्या सहलीमध्ये सहभागी व्हायचं किंवा मग विज्ञान प्रदर्शनात असे दोन पर्याय
तेव्हा उपलब्ध होते. बोरसे सरांमुळेच मी विज्ञान प्रदर्शनात सहभागी होऊ शकलो.
संतोष चव्हाण आणि मी दोघांनी यात सहभाग घेतला होता... खूप विलक्षण अनुभव होता...
पण बोरसे सरांची माझ्यासोबत वैयक्तिक आणि खूप भावपूर्ण आठवण जोडलेली आहे. जी मी
कधीच विसरलो नाही..
माझ्या
वडिलांचं नाव समरसिंग सावंत. त्यामुळे हजेरी घेताना समीर समरसिंग सावंत असं अनेकदा
शिक्षक पुकारायचे.. पोरं मात्र सरदारचा मुलगा म्हणून चिडवत... कारण वडिलांच्या
नावावरुन ते शिख किंवा पंजाबी असावेत असा अनेकांचा गैरसमज... हा गैरसमज खऱ्या
अर्थानं दूर केला तो बोरसे सरांनीच... माझ्या वडिलांच्या नावात काय दडलंय हे
समजावून सांगितलं ते बोरसे सरांनीच.. एकदा हजेरी घेताना त्यांनी मी नाव
सांगितल्यावर तसंच उभं राहायला सांगितलं. विचारलं समरसिंग म्हणजे काय... मी आपला तोंडाला
चिकटपट्टी लावून उभा राहिलेला.. साला अर्थ माहितच नाही तर सांगणार कुठून.. बरं
अर्थ सांगणारं पण कोणीच नव्हतं. वडिलांना विचारणार तरी कसं, तुमच्या नावाचा अर्थ
काय...
मी
काहीच बोलत नाही पाहून वर्गातही खुसपूस आणि चुळबूळ वाढलेली... अखेर बोरसे सरच
बोलायला लागले. अरे समर म्हणजे काय... समर म्हणजे युद्ध... आणि सिंग म्हणजे काय तर
शेर... सिंह... तू समर म्हणजे युद्ध जिंकून आलेल्या सिंहाचा मुलगा आहेस... बोरसे
सरांनी सांगितलेल्या या अर्थानंतर छाती अभिमानानं फुललेली.. आता कोणीही विचारु दे
वडिलांच्या नावाचा अर्थ काय, मी ते अभिमानानं सांगू शकत होतो.. बोरसे सरांनीच ही
नवी ओळख मिळवून दिलेली..
(नंदादीप विद्यालय, गोरेगाव पूर्व)
दहावीच्या
निकालानंतर शाळेपासून अनेक विद्यार्थ्यांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. दहावीचा
निकाल हातात घेतल्यानंतर पुन्हा शाळेत पाऊल कधीच पडलं नाही... शाळा तेव्हा सुटली
ती कायमचीच... शाळेच्या परिसरात गेलो तरी शाळा बाहेरुनच दिसायची.. पण आतमध्ये कधी
गेलो नाही... आता पुन्हा एकदा शाळेत जावं असं वाटतंय. पुन्हा एकदा बोरसे सरांना
भेटावसं वाटतंय. ते भेटले तर त्यांचे आशिर्वाद घेतल्यानंतर त्यांना कडकडून मिठी
मारावीशी वाटतेय. ते विचारतीलच अरे तुझं नाव काय. तेव्हा अभिमानाने सांगू शकेन, सर
मी समीर समरसिंग सावंत...
Sameer Samarsingh Sawant,
Senior Producer,
tv9

No comments:
Post a Comment