काळ्या कुळकुळीत रंगाची वर सिल्व्हर रंगाची रंगसंगती असलेली बुलेट त्या शांत रस्त्यावर आपला रुबाब दाखवून देते. पण त्याही पलिकडे त्या बुलेटवर ऐटबाज बसलेली 'ती' आपली नजर हटू देत नाही. राणी रंगाचा सलवार, त्याला साजेसा निळ्या रंगाचा पायजमा. पायात चप्पल, डोळ्यावर गॉगल. वाऱ्यानं उडणारे मोकळे सोडलेले केस, साधंसंच पण नजरेत भरेल असं सौंदर्य, चेहऱ्यावर मनमोहक हास्य. तिच्यावर नजर जाणार नाही हे कोणी बोलेल तर ते खोटंच... पण ही आर्ची नाही बरं का. तर साऱ्या दापोलीला ओळखीची असलेली ही 'गुरूची लेक'. होय, तीचं पूर्ण नाव... संख्या गुरुप्रसाद पोवार...
बुलेटच्याच वेगानं ती डोळ्यासमोरून जाते, पण तीच्यावरून नजर न हटणाऱ्यांची 'संख्या' कमी नाही. बुलेटचा दमदार आवाज दूरवर जात हळुहळु क्षीण होत गेला तरी 'गुरूची लेक' डोळ्यासमोर कायम राहते. कबड्डी हे तीचं पहिलं प्रेम आणि बुलेट दुसरं. लहानपणापासूनच गाडीची प्रचंड आवड. लहाणपणी बाबा आपल्या CD Dawn बाईकवर बसवून तीला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जायचा. पण बाबाच्या पाठी बसताना गाड्यांचं वेड कसं लागलं हे तीचं तिलाही ठावूक नाही. मग काय मैदानावर कबड्डीचे धडे गिरवतानाच गाडी चालवण्याच्या स्वप्नाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. पण ही इतर मुलींसारखी थोडीच होती. हीची गोष्टच निराळी. activa किंवा pleasure ही तिच्यासाठी नव्हतीच मुळी.
बाईकची प्रचंड क्रेझ. बाबाचीच गाडी ती शिकायला लागली तशी क्रेझ आणखीनच वाढली. सातवीत असतानाच बाबाची CD Dawn बाईक सफाईदारपणे पळवू लागली. गाड्या चालवायला शिकायची हौस आणखीनंच वाढली. दहावीला जिथे पोरांना परिक्षेचं, बोर्डाचं टेंशन असतं तिथे ही पोरगी four wheeler वर हात साफ करत होती. बरं हे सगळं दुसरीकडे कबड्डीचे धडे गिरवत असताना. दहावीमध्येच असताना सफाईदारपणे ती बाबाच्या मित्राची नॅनो चालवायला शिकली..तीच्या नॅनो वयापेक्षा ही झेप मोठी होती. मग तर प्रत्येकच गाडी चालवायचा छंद तीला जडला.
दहावीचं हे वय म्हणजे प्रेमात पडण्याचं, कोणावर तरी जीव जडण्याचं. ही पोरगीही दहावीत प्रेमात पडली. दणकट, दमदार आवाज असणाऱ्याच्या. त्याने तीला पहिल्याच नजरेत वेड लावलं. तीनं अक्षरक्ष जीव ओवाळून टाकला त्यावर. तीचा जीव जडला होता बुलेटवर. पहिल्याच नजरेत ती बुलेटच्या प्रेमात पडली. दणकट बांध्याच्या, वजन पेलवणार नाही पण बसल्यावर ऐटबाज वाटणाऱ्या बुलेटवर तीचा जीव जडला. तीचं हे प्रेम हळुहळु उमलत होतं. स्वप्नातल्या राजकुमारासारखी ती आता बुलेटवर प्रेम करत होती. आणि ते स्वप्न साकार नाही केलं तर ती गुरूची लेक कसली.
घरात ही सर्वात थोरली. हिच्या पाठीमागे छोटी बहिण, सर्वात शेवटी शेंडेफळ असणारा लहान भाऊ. पण गुरूसाठी म्हणजे तिच्या बाबासाठी संख्या हीच त्याचा मुलगा होता. बाबाने कधीच मुलगी म्हणून तिला वागवलं नाही. तू मुलापेक्षा कमी नाहीस असं बाबा सांगत गेला आणि सगळ्याच बाबतीत तीची भीड चेपत गेली. म्हणूनच गाडीही ती बिनधास्त चालवायची. मुलगी हे लेबल तीने झुगारून दिलं होतं. प्रयत्न केला की सगळं जमतं हा तीच्या यशाचा मुलमंत्र.
पण आता बुलेटचं हे प्रेम साकार करायचं होतं. बाबाशिवाय हे स्वप्न कोण साकार करुन देणार. बुलेटसाठी बाबाकडे तीने हट्टच मांडला. गुरूही आपल्या लेकीचा हट्ट न पुरवता तरच नवल. नवी कोरी काळ्या आणि सिल्व्हर रंगसंगती असलेली दमदार रॉयल एनफिल्ड बुलेट बाबानं एकेदिवशी दरवाजात आणून उभी केली. माझी बुलेट, माझ्या स्वप्नातली बुलेट, क्षणभर तीचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. स्वत:लाच तीने चिमटा काढला. स्वप्न साकार झालं होतं. बाबाकडे प्रेमाने कटाक्ष टाकून ती बुलेटवर स्वार झाली. बैठक पक्की केली, चावी फिरवली. बुलेटच्या दमदार आवाजानं ती आणखीनंच खुष झाली. खरं तर बुलेट चालवण्याची तीची ही पहिलीच वेळ. ती जड असते, पेलवायला आणि चालवायला कठीण असते हे तिच्या गावीच नव्हतं.
बुलेटवर बसतानाच बुलेटसारखंच भारी वाटलं. पण ती चालवताना ना हात थरथरले ना मन घाबरलं. कीक मारली आणि रस्ता पकडला. थोडा वेळ तोल साधणं कठीण गेलं, पण बुलेट काही पाडली नाही. नंतर तर सवयीने बुलेट पिसासारखी हलकी वाटू लागली. बुलेट आली तरी त्यावर बसताना तिने पारंपरिक पोषाख काही सोडला नाही. सलवार आणि पायजमा हाच बुलेटवरचा तिचा पारंपरिक वेष. हातात ग्लोव्हज नाहीत की अंगावर स्टाईल मारणारं लेदर जॅकेट नाही. बुलेटवरच क्षत्रियकुलावतंस लिहिलेलं. त्यामुळे त्यालाच साजेसा मराठमोळा वेश आणि मर्दानी आवेश. त्याचवेळी सैराट प्रदर्शित झाला होता. पण बाबाने बुलेट खूप आधी बूक केलेली. पण बुलेटची डिलिव्हरी झाली सैराटनंतर. साहजिकच लोकं तिला आर्ची म्हणायला लागले. पण हिनं आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. गुरूची लेक म्हणून. आजही लोकं तिला गुरूची लेक म्हणूनच ओळखतात.
बुलेटवरुन दापोली आता सवयीचं झालं होतं. आता वेळ होती दापोलीबाहेर फिरण्याची. दापोलीनंतर दुसरं आवडतं ठिकाण म्हणजे पुणे. बुलेटवरून पहिली कूच केली ती पुण्याकडे. मग अलिबाग, महाबळेश्वर, रत्नागिरी असं सगळंच पालथं घातलं. दापोलीमध्ये जेव्हा मराठा मूक मोर्चाचं भगवं वादळ धडकलं तेव्हा जिजाऊची ही लेक आपली बुलेट घेऊन सर्वात अग्रभागी...
आता ती तिच्या Tours & Travels ची लक्झरी बसही चालवते.Tempo Traveller, Innova घेऊन सगळीकडे हिंडते. लवकरच Volvo आणि Scania बस ती चालवायला लागली तर आश्चर्य वाटायला नको. तरीही आपण काही जगावेगळं करतोय याचं तिला अप्रुप नाही. तिचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. कारण गुरूचे संस्कार खोलवर रुजलेले आहेत. स्वत:चा Tours & Travels चा व्यवसाय, स्वत:चा हॉटेल व्यवसाय ती लहान वयात समर्थपणे चालवतेय. पायात सतत भिंगरी लावून फिरते आणि रात्री बारा किंवा १ वाजताही रिकाम्या पोटी, आपल्या बुलेटवर समुद्रकिनारी कसलातरी विचार करत बसते. हे कोडं काही अजून सुटलेलं नाही.
पण ती फक्त बुलेट राणीच नाही आहे. बुलेट हे दुसरं प्रेम, पण तिचा ध्यास आणि श्वास कबड्डी आहे. गुरूची ही लेक ज्या आत्मविश्वासानं बुलेट चालवते. Tours & Travels चा व्यवसाय, स्वत:चा हॉटेल व्यवसाय ज्या आत्मविश्वासानं पेलते, त्यापेक्षा दुप्पट आत्मविश्वासाने ती कबड्डीच्या मैदानात उतरते. दापोली कबड्डी टीमची रेडर आणि कॅप्टन, शिवशक्ती या व्यावसायिक संघाची अष्टपैलू खेळाडू, रत्नागिरी टीमचा हुकूमी एक्का या सर्व जबाबदाऱ्या स्वत:च्या खांद्यावर समर्थपणे पेलते.
कबड्डीमधल्या अष्टपैलू कामगिरीनं कमावलेल्या पदकांनी आणि विजेत्या ट्रॉफींनी तिचं घर भरून गेलंय. एवढंच काय पण रत्नागिरी जिल्हा संघाच्या सब ज्युनिअर कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदाचं शिवधनुष्य तीनं लहान वयातच पेलून दाखवलं. काही वैयक्तिक कारणांमुळे कबड्डीच्या मैदानापासून ती दूर गेली. नाहीतर महाकबड्डी लीगचे दोन्ही हंगाम तीनं आपल्या अष्टपैलू कामगिरीनं गाजवले असते यात शंकाच नाही. हे आठवतानाही तीच्या डोळ्यातून हलकेच आसवांचे थेंब टपकतात. पण त्याच डोळ्यांत पुन्हा कबड्डीच्या मैदानावर परतण्याचा अंगारही दिसतो. अजूनही उशिर झालेला नाही. कबड्डीसाठी ती पुन्हा कंबर कसतेय. बुलेट राणी आणि गुरूच्या लेकीला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा...





No comments:
Post a Comment