झंप्या आज जड पावलं टाकतंच ऑफिसमध्ये दाखल झाला. आल्यापासूनच त्याची नजर
एकसारखी भिरभिरत होती. पण त्या नजरेला ती मात्र कुठेच दिसली नाही. तीची बॅगसुद्धा नेहमीच्या
जागेवर नव्हती. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यापेक्षा तिच्या बॅगचीच जास्त सवय
झाली होती. बॅग जागेवर आहे, म्हणजे ती नक्कीच कुठेतरी आसपास असणार याची पक्की
खात्री असायची. पण ती कुठेच दिसली नाही, आणि आधीच खराब असलेला मुड आणखीनंच खराब
झाला. तिच्याविना ऑफिसही भकास वाटू लागलेलं.
झंप्या तडक ऑफिसच्या खाली उतरला. कोपऱ्यावरच्या पान टपरीकडे पावलं आपोआपच
वळली. टपरीवाल्यानंही त्याचा नेहमीचा ब्रँड पुढे केला. तो मात्र अजूनही तिच्याच
तंद्रीत होता. तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून हटायला काही तयार नव्हता. अस्वस्थ
झालेल्या झंप्यानं सिगारेटचे पटापट दोन-तीन कश मारले. गेल्या चार वर्षातला
नेहमीचाच त्याचा ब्रँड, पण तोच आज ‘नेव्ही कट’सारखा एकदम कडवट लागत होता. ऑफिसमधल्याच एका मैत्रीणीनं झंप्याला
आवाज दिला. तिला मंदसं स्मित देत त्यानं सावकाशपणे आपलं दम मारणं सुरुच ठेवलं.
धुमारे उठत होते आणि आठवणींची पाखरंही
तसं पाहिलं तर ती त्याची कुणीच नव्हती. ना जीवलग मैत्रीण, ना प्रेयसी, ना
बायको. दोघांमध्ये नातं म्हणायला असं काहीच नव्हतं. अगदी दोन वर्षांपूर्वी तो या
ऑफिसमध्ये रुजु झाला. त्यावेळी पहिल्या महिन्यात कधी तरी ती याच्याशी स्वत:हून बोलली होती. त्याच्या जुन्या
ऑफिसबद्दल तीनं बरंच काही ऐकलं होतं. त्याचसंदर्भात चौकशी करुन ती पुढे चालती
झाली. हाच काय तो गेल्या दोन वर्षांमधला तिच्याबरोबरचा एकमेव संवाद. पण
त्याचवेळेला तिचा मनमोकळा स्वभाव त्याच्या मनात कुठंतरी घर करून गेलेला. त्यानंतर गेली दोन वर्ष तो तीला पाहात होता. पण आकर्षण वाटावं
किंवा बोलावं असं काहीच झालं नव्हतं.
मुलींशी स्वत:हून
बोलणं त्याला कधीच जमलं नाही आणि मुळात आवडतही नव्हतं. त्याच्या मैत्रिणी अगदी
जीवलग, एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच. समोरच्या मुलीचा स्वभाव पटत
नाही तोपर्यंत व्यावहारिक कामं वगळता बोलणं असं नाहीच.
पण गेल्या दोन-तीन महिन्यांत बरेच बदल झालेले. दोघांची गट्टी बऱ्यापैंकी
जमलेली. ऑफिसमध्ये बोलणं मात्र कमीच. जो काही संवाद होत होता, तो what’s app वर. कुठंतरी दोन महिन्यांपूर्वी तिचा
मोबाईल नंबर मिळालेला. पहिल्याच मेसेजमध्ये ‘काय साहेब! बसं काय, तुम्हांला ओळखणार नाही का?’ अशी गोड सुरुवात
झालेली. ऑफिसमध्ये ते दोघं एकमेकांशी बोलतात की नाही असंच वाटायचं. पण what’s app वर मात्र तो तिच्याशी
अगदी मनमोकळेपणानं बोलायचा.
गेल्या दोन महिन्यांत what’s app सारख्या क्रॉस प्लॅटफॉर्मनं दोघांमध्ये मैत्रीचा नवा पुल
बांधला होता. दररोज न चुकता सकाळी उठल्यावर good morning आणि रात्री झोपण्यापूर्वी good night करणं हा त्याचा ठरलेला
नित्यक्रम. खरं तर त्यामध्ये त्याचाच स्वार्थ अधिक. तिला शुभेच्छा देऊन तिचा दिवस
चांगला जातो की नाही हे माहित नव्हतं, पण झंप्याचा दिवस मात्र आनंदात जात होता.
शेवटी एकदा मनानं ठरवलं की दिवसंच काय हो, पण आयुष्यही आनंदात जातं.
त्याच्या आनंदाला कारणही तसंच होतं. तशी ती इतर सर्वसामान्य मुलींसारखीच... दिसायला मात्र खरंच सुंदर... हेवा वाटावा असं सौंदर्य. पण त्यापेक्षाही तिचा
मनमोकळा स्वभाव, तिचं खळखळून हसणं, चैतन्यानं भरलेला आवाज, तिचे टपोरे डोळे यांनी
झंप्यावर जादू केलेली होती.
झंप्याचं आयुष्य तसं काडवंडलेलंच. तारुण्यात प्रवेश केल्यापासून संघर्ष त्याचा
जीवलग मित्र तर नशिब त्याचा जानी दुश्मन होता. लग्न होऊन चार वर्ष झालेली. पण घरात
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कटकट ही नित्याचीच. सत्तरी ओलांडलेले
त्याचे आई-वडिल आजही एकमेकांची उणीधुणी आणि कधीकधी तर आईबाप काढायला आजही चुकत
नव्हते. बायकोची नोकरी गेलेली. संसारात संघर्ष करताना स्वत:च्य़ा पायावर पुन्हा उभं
राहण्याची तीची धडपड चाललेली. ती निर्धारानं स्वत:च्या पायावर उभी राहावी यासाठी झंप्याचाही तिला खंबीर आधार
होता. त्यानं आयुष्यात आतापर्यंत अनेकांना आधार दिला होता, अनेकांची दु:ख त्याच्या खांद्यावर अश्रुंच्या
रुपात मोकळी झाली होती. पण नियतीनं मात्र त्याला कधीच आधार दिला नव्हता. ‘मेघ जांभळा एकला, राहे नभाच्या
कडेला’ या गाण्याप्रमाणे
नेहमीच तो एकाकी आणि कडेला राहिला होता.
पण हल्ली तिच्या हास्यानं त्याच्या निराशेचं मळभ दूर होत होतं. तिच्या टपोऱ्या
डोळ्यांत त्याला नवचैतन्य मिळायचं. ऑफिसमध्ये तिला एकटक पाहात राहाणं, तिची वाट बघणं याची आता सवय झालेली. तरी एकदा तीनं मस्करीत त्याला म्हटलेलंही ‘लाईन मारु नकोस!’….
तिच्यावर लाईन मारणं खरंच शक्य झालं असतं. कदाचीत लाईन मारली असती तर बरंच झालं असतं. एवढा जीव गुंतला नसता. लाईन त्यानं
आयुष्यात एकदाच हैदराबादमध्ये कामाला असताना मारण्याचा प्रयत्न केलेला. ती मुलगी
हिच्यापेक्षाही दिसायला सुंदर आणि गोडसुद्धा. मुख्य म्हणजे ती त्याची गाववाली
होती. पण तीनं आपल्या आयुष्याचा साथीदार आधीच निवडला होता. झंप्याचं लग्न झालं,
तीचंही लग्न झालं... पण दोघांची मैत्री अजून कायम आहे. ती सर्वात आवडती मैत्रीण आहे हे झंप्याच्या बायकोलाही माहित.
पण हीच्या बाबतीत तसं काहीच नव्हतं. हीच्या नुसत्या सहवासानंच झंप्या आनंदी
होत होता. ऑफिसमधला, घरामधला तणाव आणि चिंता विसरुन जात होता. त्यामुळे what’s app म्हणजे झंप्याचा जीव की
प्राणच झाला होता. हल्ली तो सकाळी लवकरही उठायला लागला होता, आणि उठल्या उठल्या
झंप्या पहिलं what’s app चेक करायचा. तिला कॉफी आवडते, म्हणून कॉफीनं गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देणारे
अनेक फोटो त्यानं डाऊनलोड करून ठेवले होते. तीसुद्धा बऱ्याचदा त्याला reply करायची. पण कधी reply आला नाही तर मात्र तो
उदास व्हायचा.
झंप्याच्या वाढदिवसाची गोष्ट. सकाळी सकाळीच त्यानं तीला गुड मॉर्निंग करणारा
मेसेज पाठवला. पण ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत तीचा काहीच reply आला नव्हता. त्यानं बरीच
वाट बघितली, मग चडफढतंच त्यानं ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं. दुसऱ्याच सेकंदाला तीचा
मेसेज आला, Welcome In the Office…
झंप्याचा चेहरा आनंदानं एकदम उजाळला. त्यानं नजर टाकली, पण ती कुठंच दिसली
नाही. ना तीची बॅग दिसली. पुन्हा तीचाच मेसेज. ‘आज काय तुझ्या टीममध्ये तू एकटाच?’ मग मात्र तो उडालाच. ती
ऑफिसमध्ये असल्याची मनोमन खात्री पटली. मग जिथं ती नेहमी बसते तिथं तो जाऊन आला.
ती दिसल्यावर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. सगळ्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यावर तीनंही त्याला शुभेच्छा
दिल्या. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर तीनंही स्वत:हून त्याला केक भरवला. दुसऱ्या एका मैत्रीणीनं दिलेलं
चॉकलेट त्यानं सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. मग आसपास कोणी नसताना चॉकलेट देणारीला आणि तीला त्यानं गुपचुप ते चॉकलेट दिलं होतं.
दिवस भराभर पालटत होते. असंच दोन दिवसांच्या सुट्टीनंतर ती जेव्हा ऑफिसमध्ये
रुजु झाली तेव्हा झंप्यानं तीला welcome in the office असा मेसेज पाठवला. पण दिवस सरला
तरीही तीचा काहीच reply आला नाही. भर पावसात एकदा ती घरी निघाली होती,
तेव्हा पण काळजीच्या पोटी त्यानं तीला सांभाळून जा असा मेसेज पाठवला. पण ती घरी
पोहोचली की नाही याचा काहीच पत्ता लागला नाही. तीच्या replyची तो नेहमीच वाट पाहायचा. आणि reply आला नाही की, झंप्या मनातून खूप निराश व्हायचा... पण ती समोर आली की तीच्या गोड
हसण्यानंसुद्धा त्याची निराशा दूर व्हायची.
कालही त्यानं न चुकता तीला गुड मॉर्निंग केलं. तीनंही दोन मिनिटांच्या आतच त्याला पुन्हा गुड मॉर्निंग म्हणून टाकलं. काही वेळानं त्यानं कधी नव्हे तो कामाविषयीचा एक
मेसेज पाठवला. बराच वेळ वाट बघितली. पण तीचा reply काही आलाच नाही. दुपार टळली. ती ऑफिसमध्ये आज येणार
नाही असा अंदाज बांधला, पण तो चुकला. अचानक ती ऑफिसमध्ये आली, तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखाच होता. आज ती
भलतीच खुष दिसत होती आणि झंप्यासुद्धा तीला अचानक बघून खुष झाला होता..
पण नाकावरच्या रागानं त्या आनंदावर मात केली. कारण तीने reply दिला नसल्यानं त्याचा
डोक्याला शॉट लागला होता. मग तीला टाळत राहिला. आज तीच्याशी बोलायचंच नाही असा
चंगच त्यानं बांधला. संध्याकाळी तीनं स्वत:हून सकाळच्या झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. ती काहीतरी
कारणही सांगत होती, पण झंप्या मात्र काहीच ऐकायच्या मुडमध्ये नव्हता. तू कामातून मोकळा
झालास की सविस्तर बोलूया असंही ती त्याला म्हणाली. पण झंप्याच्या नाकाचा शेंडा
अजूनही लालंच होता. तो तीच्याशी बोलला पण तुटकपणे. तिलाही ते कळुन चुकलं. नंतर मग
तीनं जेवायला येतोस का? असं विचारलं. मनातून तर तो खुष झाला, पण पुन्हा नाकावरचा राग
आडवा आला. मागं हटायला त्याचा राग काही तयारच नव्हता. घरी जातानाही त्यानं ती समोर
असूनही जाणूनबुजून गुडबाय केलं नाही. रात्री गुड नाईट म्हटलं नाही की सकाळी गुड
मॉर्निंग केलं नाही. आता what’s app वर बोलायचंच नाही असा दृढनिश्चय केलेला. मनात मात्र
तीचा मेसेज यावा अशीच इच्छा.
आणि दुसऱ्या दिवशी तो आलाही. पण तो वाचल्यावर तो आलाच नसता तर बरं झालं असतं
असंच वाटून गेलं. ती सुट्टीवर घोवाबरोबर बाहेर निघाली होती. लगेचच दुसरा मेसेज आला आत्ताच निघतोय, पुन्हा भेटू दोन आठवड्यानंतर... तो वाचला
आणि झंप्याच्या पायाखालची जमीनंच सरकली.
मग मात्र झंप्या स्वत:वरच रागावला. कालचं सगळं आठवलं. तीनं एकदा म्हटलंही होतं,
अरे मी खुपच बिझी होते रे!, त्यामुळं तुला reply करायला वेळंच मिळाला नाही. झंप्याची ट्युब आता कुठं पेटली
होती. रागाची जागा आता पश्चात्तापानं घेतली होती. स्वत:चाच त्याला भलताच राग आला. कालचा
मुर्खपणा अस्वस्थ करु लागला. पण आता वेळ निघून गेली होती. रात्री मग तीची माफी
मागण्यासाठी एक भलामोठा मेसेज टाकला.
त्याच्या प्रत्युत्तराची मात्र त्यानं आता वाट बघितलीच नाही. कारण मैत्रीत अपेक्षा करणं
हे चुकीचं होतं हे एव्हाना त्याला समजुन चुकलं होतं. आता स्वत:च्याच डोक्याला शॉट लागला होता.
पुढचे दोन आठवडे ती दिसणार नव्हती. तीचं खळखळतं हास्य, तीचा आनंदी चेहरा दिसणार
नव्हता. अस्वस्थता कमी करण्यासाठी त्याची पावलं आपसूकच टपरीकडे वळली. दम मारायचं
ठरलं. पण आज त्याचं प्रायश्चित्त कमी कऱण्यासाठी सिगारेटही पुरेशी नव्हती. चूक
झाली होती, मनाशी ठरलं... यापुढे दम मारायचा नाही. तीचा चेहरा आठवायचा...
आता आठवडा झालाय, सिगारेट सोडून... राग आला की तीचा चेहरा आठवतो. आणि मग तो राग
तिथल्या तीथं निवळतो. अजूनही ऑफिसमध्ये आला की त्याची नजर तीची बॅग शोधते. पण अजून
ती कामावर रुजु व्हायला अवकाश आहे. तोपर्यंत वाट बघण्याशिवाय त्याच्या हातात काहीच
नाही.

No comments:
Post a Comment