मोबाईलवर काल गाणी ऐकत असताना अचानक गणपतीची आरती सुरु झाली, ‘जयदेव जयदेव जय गणराजा सकल देवांआधी तू देव माझा!... खरं तर ही आरती गावच्या गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवरनं जोरजोरात वाजवायला मला भारी आवडायचं. अशी चीक मोत्याची माळ किंवा इतर तत्मस गाण्यांपेक्षा आपलं काहीतरी वेगळं असावं ही त्यामागंची सुप्त इच्छा.. पण याच आरतीनं पुन्हा एकदा मला गावच्या गणेशोत्सवाच्या आठवणीत पाठवून दिलं.
घरासमोरचा परिसर पाऊस-पाण्यानं हिरवागार झालेला असतो. हलकेच येणाऱ्या पावसाच्या सरीनं तुळस, जास्वंद, पिवळी कण्हेरी मस्तपैकी आपल्याच नादात डोलत असतात. शेणानं सारवलेल्या खळ्याच्या एका वेगळाच सुगंधाला प्राजक्ताचा पडलेला सडा आणखीनंच मोहून टाकतो. घरातल्या देवघरात बाप्पासमोर मंद समई तेवत असते. या धुंद करणाऱ्या वातावरणात गणपतीचं एक वेगळंच रुप दिसून येतं, आणि माझ्यासारखा नास्तिकाचे हातही नकळत जोडले जातात.
कोकणात गणपती म्हणजे खरोखरच सकल देवांआधी पूजा अर्चा होणारा. गणेशोत्सव या साडेपाच अक्षरांना कोकणात अनन्यसाधारण महत्व. गणेशोत्सव हा कोकणात साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव. गरीब असो वा श्रीमंत, मानकरी असो की पैरी (रोजंदारीवर काम करणारे) गणेशोत्सव हा कोकणातल्या प्रत्येक घरात तेवढ्याच उत्साहात आणि थाटामाटात साजरा होतोच होतो. म्हणूनच कोकणातला चाकरमानी माणूस जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात का असेना, गणेशोत्सवासाठी तो आपल्या कोकणातल्या घरी धाव घेणारच.
मुंबईतल्या चाकरमान्यांची तर आगळीच तऱ्हा. कारण गावाला जायचं म्हणजे पहिलं कोकण रेल्वेचं दिव्य पार करावं लागतं. यंदाच्या वर्षी तर तिकीट बुकिंग चालू झाल्याच्या चारच मिनिटांत सगळ्या गाड्यांवर हजारपेक्षा अधिकची वेटिंग लिस्ट दिमाखानं मिरवत होती. कोकणात गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांचे दोन प्रकार. एक गणपतीच्या आगमनाआधी तीन-चार दिवस डेरेदाखल होणारा आणि झाडलोट, रंगंरगोटी, डेकोरेशनची जबाबदारी खांद्यावर घेणारा. तर दुसरा कामाचा रगाडा, सुट्ट्या, प्रवासाची दगदग अशा कचाट्यातून बाप्पांचं नाव घेत हरितालिकेच्या दिवशी गावचं घर गाठणारा.

कोकणातलं गणपतीचं डेकोरेशन म्हणजे मुंबईकरांच्या भाषेत खरोखरच सांगायचं तर इको-फ्रेंडली. गणपतीवर आपली छत्रछाया धरणाऱी माटी ही सजावटीत सर्वात महत्वाची. मग माळ्यावर अगदी जपून ठेवलेली, कागदाच्या गुंडाळ्यात सांभाळून बांधून ठेवलेली परंपरागत माटी हलकेच उतरवली जाते. त्याच्यावरची धुळ झटकून त्याला पुन्हा तेलपाण्यानं नवी चकाकी दिली जाते. माटीवर सजावटीसाठी मग हरणं, कवंडाळं अशी रानफुलांची विविध लेणी चढवली जातात. विविध फळाफुलांनी नटलेली ही माटी गणपतीच्या आगमनासाठी नव्या नवरीसारखी नटून थटून सज्ज होते.

कोकणातलं गणपतीचं डेकोरेशन म्हणजे मुंबईकरांच्या भाषेत खरोखरच सांगायचं तर इको-फ्रेंडली. गणपतीवर आपली छत्रछाया धरणाऱी माटी ही सजावटीत सर्वात महत्वाची. मग माळ्यावर अगदी जपून ठेवलेली, कागदाच्या गुंडाळ्यात सांभाळून बांधून ठेवलेली परंपरागत माटी हलकेच उतरवली जाते. त्याच्यावरची धुळ झटकून त्याला पुन्हा तेलपाण्यानं नवी चकाकी दिली जाते. माटीवर सजावटीसाठी मग हरणं, कवंडाळं अशी रानफुलांची विविध लेणी चढवली जातात. विविध फळाफुलांनी नटलेली ही माटी गणपतीच्या आगमनासाठी नव्या नवरीसारखी नटून थटून सज्ज होते.
कोकणातल्याच कलाकारानं जीव ओतून, अगदी मनोभावे गणपतीच्या पाठीमागची रंगवलेली भिंत हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य. राम-कृष्णापासून ते विविध पौराणिक संदर्भानी या भिंती नटलेल्या असतात. आणि त्याला खास कोकणी टच असतो. पण या पारंपरिक कोकणी सजावटीवर हल्ली मुंबईच्या चाकरमान्यांनी अतिक्रमण केलेलं दिसतं.
आमची सजावट कशी दिमाखदार हे दाखवण्याची स्पर्धाच जणू मुंबईकर चाकरमान्यांमध्ये दिसून येते. मग लाईट्सच्या माळा काय थर्माकोलचं डेकोरेशन काय, गणपती बाप्पा मात्र या सगळ्यांमध्ये सुखासमाधानानं येऊन विराजमान होतो. गणपती आणण्याची प्रथाही वेगळीच, एक तर डोक्यावर किंवा मग गावच्या मानकऱ्यांचे मोठे गणपती असतील तर ते डोलीमधून आणण्याची प्रथा.
आमचं गाव म्हणजे कोकणातल्या सिंधूदुर्ग जिल्ह्यातलं. कुडाळ तालुक्यात, बारा वाड्या आणि नऊशेपेक्षा अधिक उंबरा असलेलं आवळेगांव. आजूबाजूच्या डोंगरांनी अगदी आवळून आपल्या कवेत घेतलेलं गाव म्हणून त्याचं खरं नाव आवळगाव. पण कालौघात अपभ्रंश होत गेला आणि आवळेगाव हेच नाव शासकीय दफ्तरातही रुजू झालं.
१८ मोठमोठ्या खोल्या असलेलं, क्रिकेटच्या खेळपट्टीहून अधिकच लांब असलेलं आमचं बचाराम निवास. बचाराम या आमच्या पणजोबांच्या नावावरुन या घराचं नामकरण करण्यात आलं. कमल हसनच्या ‘एक दुजे के लिए’ चित्रपटातल्या भल्यामोठ्या खडकांची आठवण करून देणाऱ्या विविध खडकांनी वेढलेलं आमचं भलंमोठं घर. म्हणून आवळेगावातल्या बाराही वाड्यांत आम्ही खडकांतलेच म्हणूनच प्रसिद्ध आणि त्यात गावचे दुसरे मानकरी...
गणपतीच्या काळात आमचं भलं मोठं घर खऱ्या अर्थानं गजबजून जातं. क्रिकेटच्या खेळपट्टीपेक्षाही लांबीनं मोठी असलेली ओळय. पण गणेशोत्सवात ती पाहुण्या-रवळ्यांनी नुसती भरून जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी तर साऱ्यांचीच लगभग उडालेली असते.
ज्येष्ठ मंडळींची एकामागोमाग एक फर्मानं सुटत असतात. आपण मात्र निमुटपणे ती पार पाडायची असतात. आपलं आराध्य दैवत गणपतीची निर्विघ्नपणे विधीवत पूजा पार पाडणं हे भलंमोठं आव्हान असतं. माझे दोन नंबरचे काका, ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो, ते या पूजासोहळ्याचे सेनापती असतात.
फुलं कोणती लागणार, पूजासाहित्यामध्ये काय काय असावं ते पूजा कशी करावी यावर त्यांची बारकी आणि अनुभवी नजर.. फुलं वेचण्याची जबाबदारी आमच्या पिताश्रींनी आपल्या खांद्यावर घेतलेली असते. घराच्या बाजूच्या परड्यातनं मग जास्वंद, तगर, सदाफुली, दुर्वा, तुळशी या साऱ्यांची रवानगी थेट पूजेच्या ताटात होते.
गणपतीची शास्त्रसांग पूजा झाल्यावर कसोटीचा प्रसगं येतो तो नैवेद्य दाखवण्याच्या वेळी. कोकणातले गणपती हे वरसलीनं पूजले जाणारे. एकत्र नांदणारी कुटुंब कालांतराने विभक्त झाली. प्रत्येकानं चिऱ्याचं नवीन घर बांधून वेगळी चूल मांडलेली. पण गणपती मात्र काही वेगळा होऊ शकला नाही. तो आजही मुख्य घरातच पूजला जातो आणि त्याला पूजण्याची दरवर्षी प्रत्येकावर येणारी टर्म म्हणजेच वरसल..
गणपतीची शास्त्रसांग पूजा झाल्यावर कसोटीचा प्रसगं येतो तो नैवेद्य दाखवण्याच्या वेळी. कोकणातले गणपती हे वरसलीनं पूजले जाणारे. एकत्र नांदणारी कुटुंब कालांतराने विभक्त झाली. प्रत्येकानं चिऱ्याचं नवीन घर बांधून वेगळी चूल मांडलेली. पण गणपती मात्र काही वेगळा होऊ शकला नाही. तो आजही मुख्य घरातच पूजला जातो आणि त्याला पूजण्याची दरवर्षी प्रत्येकावर येणारी टर्म म्हणजेच वरसल..
वरसल असताना गणेशोत्सवाचा त्यावर्षीचा सगळा खर्च उचलण्याची जबाबदारी त्या कुटुंबावर असते. पण गणेशोत्सव मात्र एकत्रच साजरा केला जातो. हीच तर कोकणातल्य़ा गणेशोत्सवाची खासीयत आहे.
आमच्या गावी फौजदारवाडीत सावंतांचं एक भलं मोठं कुटुंब आहे. म्हणजे आपलं दीड एकशे कुटुंबांचं. दीडशे कुटुंबांचा मिळून एकच गणपती. गणेशोत्सवाच्या काळात हे अख्खं कुटुंब एकत्र येतं. तो भक्तीभावाचा सोहळा खरंच अवर्नणीय. या सगळ्या कुटुंबाची एकत्रित नैवेद्य दाखवताना किती पंचाईत होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
आमच्या गावी फौजदारवाडीत सावंतांचं एक भलं मोठं कुटुंब आहे. म्हणजे आपलं दीड एकशे कुटुंबांचं. दीडशे कुटुंबांचा मिळून एकच गणपती. गणेशोत्सवाच्या काळात हे अख्खं कुटुंब एकत्र येतं. तो भक्तीभावाचा सोहळा खरंच अवर्नणीय. या सगळ्या कुटुंबाची एकत्रित नैवेद्य दाखवताना किती पंचाईत होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
आमच्या घरी चारच कुटुंबं असली तरी नैवेद्याच्या वेळी आरडाओरडा हा सालाबादचाच. इतर घरातला नैवेद्य कधीच झालेला असतो. पण ज्यांची वरसल त्यांची चूल मात्र अजूनही अव्याहतपणे सुरूच असते.
गणपती बाप्पा पण बिच्चारा चौरंगावर निमूटपणे उकडीच्या मोदकांसाठी तिष्ठत बसलेला असतो. समोर मोदकांची अनेक पाकिटं पडलेली असतात, पण उकडीच्या मोदकांची बातच काही न्यारी... गणपती बाप्पाच्या वाहनाची म्हणजेच उंदराची जशी चुळबुळ चाललेली असते, तसेच उंदीर आपल्या पोटातही जोरजोरात टणाटणा उड्या मारत असतात. अखेर मग एकत्रितपणे सर्वांचा नैवेद्य दाखवला जातो आणि मोदकांवर बाप्पापेक्षा आपल्याच उड्या पडतात.
कोकणातल्या गणपतीमध्ये सर्वात धम्माल येते ती आरती आणि भजनांच्यावेळी. गणपतीची आरती ही एकट्या दुकट्यानं करणं हे मालवणी मनाला न पटणारंच. गणेशोत्सव म्हणजे सार्वजनिक उत्सव आणि तो सार्वजनिकपणेच साजरा करण्याकडे कोकणी माणसाचा कटाक्ष. गणपतीच्या आरतीला तुमच्या दारी अख्खी वाडी हजर असते.
लहानथोरांपासून ते जुणी जाणती आणि मानकरी मंडळीही यात सहभागी असतात. सु:खकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती टाळ मृदंगाच्या तालावर एकत्रितपणे म्हणताना आपल्याही अंगावर रोमांच उभे राहतात. घालीन लोटांगणला कोण पहिलं लोटांगण घालतं याची जणू स्पर्धाच लागते. माझ्यासारख्या मुंबईकर चाकरमान्याचा गोंधळ उडतो जेव्हा ‘राम बंधू हो कृष्ण बंधू हो’ असा जोश घुमु लागतो. आणि त्या शब्दांप्रमाणेच वाडीतल्या त्या साऱ्या गावकऱ्यांमध्ये एक बंधूभाव आलेला दिसतो.
देवगडमधल्या आरेमध्ये म्हणजेच माझ्या बहिणीच्या गावी विठ्ठलाच्या आरतीला अशीच एक वेगळी चाल दिलेली पाहायला मिळाली. ‘दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती’, असं म्हणत विठ्ठलाक़डे जयदेव जयदेव जय पांडुरंगा असं वळण्याची रुढ पद्धत. पण आरे गावची रीतच वेगळी. जय जय जय हरी विठोबा, जय पांडुरंगा विठोबा जय पांडुरंगा, रखमाई वल्लभा विठोबा राईच्या वल्लभा विठोबा पावे जीवलगा असं उच्चस्वरात वेगळ्याच चालीवर विठोबाला आळवलं जातं.
कोकणातल्या भजनांचीही तीच गत. प्रत्येक घराघरांत गणपतीसमोर भजनंही व्हायलाच हवीत. रात्र रात्र जागून अनेक वाड्यांमधले उंबरे पालथे घालणं हा सर्वात आवडता प्रकार. गाई गोपाळ सवंगडी वना अशी गौळण टीपेला पोहोचलेली असते आणि गावच्या झिलग्यांचो लक्ष मात्र चुलीसमोर काय रांधतायत याकडं लागलेलं असतं.
चाकरमान्यांच्या ऐपतीप्रमाणे भजनानंतरचा नाश्ता अवलंबून. कोकणात एकेकाळी भजनानंतर प्रसिद्ध असे खडखडे लाडू मिळत. पण आता त्याला कोणी हातसुद्धा लावत नाहीत. मग हळूहळू बुंदीचे लाडू, फरसाण यांनी खडखड्या लाडूंची जागा घेतली. नंतर - नंतर तर थेट उसळपाव, मिसळपावापर्यंत त्याची प्रगती झाली. त्यामुळे तुमच्या घरातलं भजन किती रंगेल याचा निकाल या नाश्त्यावर अवलंबून. पण कधीकधी कोणतीच आशा न बाळगता गावोगावच्या वाड्यांमध्ये ही भजनी मंडळं अख्खी वाडी दणाणून सोडतात. त्याला कोकणातला खास असा गोडवा असतो. रात्रं रात्र जागून भक्तीनं केलेल्या त्या भजनाचा आनंद चाकरमान्यांना वर्षाची बेगमी करून देतो. तो नाद, तो ताल मुंबईत आल्यावरही कानात घुमत असतो.
चाकरमान्यांच्याच खिशाच्या ताकदीवर गणपती बाप्पा किती दिवस मुक्काम ठोकणार हेसुद्धा अवलंबून असतं. पण बाप्पा असताना दिवस कसे सरतात कधीच समजत नाही. अख्ख्या घरावर भक्तीचा नवा रंग चढलेला असतो. भजनं, फुगड्या, आरती यामध्ये दिवस मात्र सरतात. गणपतीबरोबरच गौरीही आपला निरोप घेण्यासाठी निघतात.
कोकणातही विसर्जनाची पद्धतही निराळीच. एखाद्या बांधावर, नदीवर किंवा तलावावर सगळ्या वाडीचे गणपती एकत्र येणार. मानाप्रमाणे त्यांचा नंबर ठरलेला असतो. पुन्हा एकदा सर्वांचीच सार्वजनिक आरती होणार. प्रत्येकानं आणलेला प्रसाद एकत्र केला जाणार. शिरवणी वाटली जाणार. बाप्पाला अखेरचा निरोप देताना डोळेही पाणावतात. हा प्रसंग येऊच नये असंच वाटत राहतं. पण पुढच्या वर्षी लवकर यायचं तर आता मात्र निरोप द्यायलाच हवा.
निरनिराळ्या स्वभावाची, एकमेकांशी द्वेषानं वागणारी माणसं गेले काही दिवस मनानंही एकत्र आलेली असतात. एक बंधूभाव त्यांच्यात निर्माण झालेला असतो. पण बाप्पा जातो आणि पुन्हा ही माणसं आपल्या मूळ पदावर येतात. बाप्पांना निरोप देण्यापेक्षाही माणसाच्या या स्वभावाचं फार वाईट वाटतं. बाप्पा कायमच इथं राहावेत असं वाटतं आणि डोळ्यांच्या कडाही ओल्या होतात.


No comments:
Post a Comment