सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकण्याची ओढ कधी आणि कशी लागली हे आता नक्की
आठवत नाही... वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही असं म्हणतात, पण सह्याद्रीच्या या
भटकंतीनं मला मात्र इतिहासाचं वेड लावलं. त्याच वेडात मग इतिहासात पदवी तर मग
प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये एम ए केलं.
माझा पहिला ट्रेक होता तो किल्ले शिवनेरी, अष्टविनायकामधल्या
लेण्याद्रीच्या डोंगररांगांमधला, जुन्नर
खोऱ्यातला किल्ले ह़डसर, नानाचा अंगठा आणि नाणेघाट... त्या पहिल्या ट्रेकनंतर मग
सह्याद्रीनं वेडच लावलं. शनिवार, रविवारी खांद्यावर सॅक घेऊन नेहमीच सह्याद्रीच्या
अंगाखांद्यावर वेड्यासारखं भटकलो.
सुरुवातीला एक मोठ्ठा ग्रुप होता, पण कालांतराने मग एकट्यानंच सुरुवात झाली.
आणि ट्रेकिंगमधला माझा भरवशाचा साथीदार झाला होता तो म्हणजे संदीप लाड. भाभा
अणुसंशोधन केंद्रात (BARC, Central Govt. Of India )
नोकरी करत
असताना शनिवार, रविवारची हमखास सुट्टी असायची. त्या सुट्ट्यांचा आम्ही पुरेपूर
फायदा उठवला. शुक्रवारी रात्रीच आमची जोडगोडी खांद्याला सॅक अ़डकवून कुठच्या तरी
किल्ल्याच्या मोहिमेवर निघालेली असायची. त्या चार वर्षात किती किल्ले पालथे घातले
आता आठवतही नाही. पण एका किल्ल्यानं मात्र नेहमीच वेड लावलं. तो म्हणजे 'राजांचा गड
आणि गडांचा राजा' राजगड...
‘किल्ले
रायगड’ ही हिंदवी स्वराज्याची
अधिकृत राजधानी. पण त्याआधी राजगडनं राजधानीचं काम पाहिलं होतं. किल्ले
रायगडपेक्षा राजगड सर करण्यासही कठीण. पण नेहमीच वेगवेगळ्या वाटांनी राजगड सर
करायला मज्जा आली. कधी चोर दरवाजानं, कधी गुंजवणे तर कधी पाली दरवाज्यातून...
राजगडावर आतापर्यंत आठवेळा भेट दिली, पण प्रत्येक वेळी त्याचं रुप वेगळंच भासतं.
गुगल मॅपमध्ये किंवा हेलिकॉप्टरनं पाहायचं तर राजगड म्हणजे एखाद्या सिलिंग फॅनसारखा
दिसतो. तीन माच्या आणि अभेद्य असा बालेकिल्ला..
महाराजांनी तोरणा किल्ला घेतल्यावर त्यांचं लक्ष मुरुंबदेवाच्या या डोंगराकडे
गेलं, आणि वयाच्या सोळाव्या वर्षी महाराजांनी एखाद्या निष्णात architect सारखी या गडाच्या
बांधकामाची रेखाटनं केली. आणि तयार झाला अभेद्य असा किल्ले राजगड...
महाराजांसह जिजाऊसाहेब आणि त्यांचा कबीला तब्बल पंचवीस वर्ष या गडावर नांदला. स्वराज्याच्या
सर्वच महत्वाच्या मोहिमा इथूनंच निघाल्या. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे
सईबाईंसोबत राजांचा संसार फुलला, बहरला तो इथंच.
सईबाई म्हणजे राजांच्या पहिल्या पत्नी आणि सर्वात आवडत्या. सईबाई आणि
राजांच्या संसारवेलीवर सखुबाईंच्या रुपानं पहिली कळी उमलली ती राजगडावरच.. संभाजी
राजांच्या बाळंतपणाचं निमित्त झालं आणि अगोदरच नाजूक असलेल्या सईबाईंची तब्येत
आणखीनंच खालावली.
सईबाई आजारी असतानाच अफझलखान नावाचा दैत्य स्वराज्यावर चालून आला. जीवापाड
प्रेम केलेल्या सईबाईंना आजारपणात तसंच सोडून महाराजांना प्रतापगडावर मोहिमेवर कूच
करावी लागली. राजांना ज्या विचाराची कल्पनाही करवत नव्हती तो विचार अखेर खरा ठरला,
नियतीनं डाव साधला.
सईबाई राजगडावर अखेरच्या घटका मोजत होत्या. शिवाजी सावंतांनी आपल्या कादंबरीत
हा अखेरचा क्षण अगदी जिवंत केलाय. सईबाईंचा कोमेजलेला हात राजांनी आपल्या हातात
घेतला. अखेरच्या क्षणी सईबाईंनी राजांकडे एकच वचन मागितलं. माझ्या शंभूला
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपा. एवढं बोलूनंच सईबाईंनी अखेरचा श्वास घेतला.
सईबाई गेल्यानंतर त्या रात्री राजांनी अन्नपाणी घेतलंच नाही. राजमहालात उभे
असताना राजांना अचानक सईबाईंचा भास झाला. राजांनी सईबाईंना प्रेमानं दिलेल्या
पैंजणांचा नाद हलकेच ऐकू येऊ लागला. सईबाईंचे ते अखेरचे बोल राजांना आठवले. राजे
गहिवरले... राजांनी पुन्हा एकवार आश्वासन दिलं. सई, तू काळजी करु नकोस. शंभूला मी माझ्या
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेन. एवढं बोलल्यावर पैजणांचा तो नाद हवेत विरला. राजांनी टाहो
फोडला, सई तू जाऊन शंभू पोरका झाला नाही, आम्ही पोरके झालो, सई... आम्हीं...
राजगड सोडतानाही सईंबाईंच्या आठवणीनं राजांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या
होत्या.
किल्ले रायगडाच्या राजधानीचं बांधकाम पूर्ण झालं. भव्य प्रवेशद्वार, राजवाडा,
नगाऱखाना, तटबंदीयुक्त शेला पागोट्यांनी नटलेला रायगड पाहिल्यावर राजेही भारावून
गेले. पण राजवाड्याच्या पाठीमागं असलेला राणीमहाल न्याहाळताना राजांच्या डोळ्यांत
पुन्हा पाणी दाटलं. कारण तिथं फक्त सातच राणीमहाल होते. राजांच्या मनातला सईबाईंचा
राणीमहाल तिथं नव्हता.. कदाचित सईबाई असत्या तर शिवाजी महाराजांच्या इतिहासाला
वेगळं वळण लागतं... पण सईबाई गेल्या आणि राजे खऱ्या अर्थानं पोरके झाले. म्हणूनच
रायगडापेक्षा माझंही मन रमंत ते राजगडावरच. राजगडावर सईबाईंच्या समाधीपुढं डोकं
ठेवल्याशिवाय माझं पाऊलही हलत नाही.
राजगडावर सईबाईंची ही आठवण नेहमीच माझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या करते. पण राजगडाचं
रौद्र रुपही कधीकधी आपल्या डोळ्यांतून पाणी आणायला कमी करत नाही. असच एकदा आषाढात
मी आणि संदीपनं राजगडची वाट धरली होती. कांदेपोह्यासारखा नाश्ता करुन
गुंजवणेमार्गे चोरदरवाजानं राजगड सर करायचा असा बेत ठरला. पुणे वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या
गावी उतरून तिथून
साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते.ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास
अडीच तास लागतात.माहितगारा शिवाय या वाटेचा उपयोग करू नये अशी नोंद अनेक ठिकाणी
आढळते. पण आव्हान पेलणं ही आमची जूनी खोड. यावेळेस मात्र निसर्गानं आम्हांला
त्याच्या ताकदीची कल्पना दाखवून दिली.
ऐन आषाढात गुंजवणेचा परिसर मात्र वैशाख वणव्यासारखा भासत होता. पावसाचा मागमुस
नव्हता. त्यातच वाटेत खाल्लेले कांदेपोहे आता भारी पडू लागलेले. घटाघटा पाणी पिऊन
सुद्धा तहान भागत नव्हती. जवळची इलेक्ट्रोलची तीन पाकिटंसुद्धा घशाखाली रिचवली. पण
घसा पुन्हा पुन्हा कोरडा पडत होता. वाट अवघड आणि त्यात ही नामुष्की. संदीपनं ऐन
मध्यावरती हार मानली. बस्स झालं असं म्हणत एका जागी त्यानं अंग टाकलं. पण इतक्यात
हार मानणं हे कबुल नव्हतं.
चादरी अंथरल्या. संदीपला तासभर विश्रांती कर म्हणालो. माझ्या डोक्य़ात मात्र
पुढे काय करायचं याचाच विचार सुरु होता. तासभर विश्रांती केल्यानं संदीपही
ताजातवाना झाला. मग पुन्हा पुढचं मार्गक्रमण सुरु झालं. माझ्या सॅकबरोबरच संदीपची सॅकही माझ्याच खांद्यावर अडकवली होती. झपाझप पावलं
टाकत चोरदरवाजा गाठला... गोब्राम्हण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक प्रौढ
प्रताप पुरंदर शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय!!!! जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेवचा घोष घुमला आणि अंगात
नवचैतन्य संचारलं. समोरच काठोकाठ भरलेला पद्मावती तलाव होता. एखाद्या जंगली
श्वापदासारखं अगं झोकून घटाघटा पाणी प्यायलो..
पण संदीप मात्र खरोखरच थकला होता. पद्मावती मंदिरात दर्शन घेतलं. खरंतर
राजगडावर राहायचा बेत होता, पण संदीपची अवस्था केविलवाणी झाली होती. सॅकमधला खाऊ
बाहेर काढला आणि त्याच्यावर ताव मारला. थोडा वेळ पुन्हा विश्रांती घेतली. आणि पाली
दरवाजाच्या दिशेनं कूच केली. संध्याकाळचे चार वाजलेले, त्यामुळं झपाझप पावलं टाकणं
क्रमप्राप्त होतं. वेल्ह्याहून पुण्याला जाणारी संध्याकाळी सा़डेपाचची शेवटची एस
टी होती.
पण आज राजगडानं आमची परिक्षा घ्यायचीच असं बहुदा ठरवलं होतं. मघाशी पावसाचा
मागमुसही नसलेला राजगडचा परिरस काळ्याकुट्ट ढगांनी वेढला गेला. आणि अपेक्षेप्रमाणे
त्यानं धो धो बरसायला सुरुवात केली. त्यामुळे आधीच कठिण उतरण असलेला पाली दरवाजाचा
रस्ता आणखीनंच कठीण होऊ लागला. पाण्याचे लोट अनेक ठिकाणी मार्गात अडथळा आणत होते,
आणि होऊ नये तेच झालं. संदीपला बुट लागला आणि रक्ताचा प्रवाह वाहु लागला. पुढे
मार्गक्रमण करणं अतंत्य कठीणंच होतं.
कसंबसं करत वेल्हे गावी पोहोचलो. संध्याकाळचे पावणे सात वाजले होते. अंधार
दाटून आला होता. पुण्याला जायची शेवटची एस टी तर कधीच निघून गेली होती. गुरं ढोरं
आपापल्या घरी परतत होती. एक टाटा सुमो दिसली आणि हायसं वाटलं. पण कसलं काय,
पुण्याला जायचं तर म्हणे हजार रुपये काढा. संदीप तयार झाला, पण मी मात्र ठाम विरोध
केला. संदिपला म्हटलं एखाद वेळी एखाद्या गरजू माणसाला
हजार रुपये देऊ, पण अडचणीत असताना लुटणाऱ्यांना काहीच देणार नाही. जवळंच एक मंदिर दिसत होतं. निश्चय पक्का केला, त्या मंदिरात
रात्र काढण्याचा. आणि देवच पावला. रस्त्यांवर अनेक गावकरी दुधाची भांडी घेऊन जमा होताना
दिसत होते. म्हटलं प्रकार तरी काय आहे बघु तरी.
तर असं होतं की या परिसरातल्या गावांतून दुध गोळा करणारी एक गाडी यायची सारेजण
वाट बघत होते. त्यांच्याकडे चौकशी केली, तर लॉटरीच लागली. ती गाडी हे दुध घेऊन
पुणे रेल्वे स्थानकाला जाते असं कळलं. त्या अंधारात ट्रकच्या मोठ्या हेडलाईट्सनी आशेचा
किरण दाखवला.
क्लिनरकडे चौकशी केली. तो म्हटला सोडतो की साहेब... किती घेणार? माझा प्रश्न.. दहा रुपये
द्या की प्रत्येकाचे... संदीप तर चक्क उडालाच... मघाशी हजार रुपये घेणारा तो आणि
आता फक्त दहा रुपये घेणारा हा.. पुढच्या तीन तासांत आम्ही एशियाड पकडण्यासाठी पुणे
रेल्वे स्टँडवर पोहोचलो होतो. क्लिनरच्या हाती शंभरची नोट टेकवली आणि एसटी
महामंडळाच्या एशियाडमध्ये थकलं भागलेलं शरीर हवाली केलं.



No comments:
Post a Comment